Is 5000 years old Indus script about to be deciphered? सिंधू संस्कृतीच्या शोधाला अलीकडेच १०० वर्षे पूर्ण झाली. सिंधू संस्कृतीच्या शोधाच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने चेन्नई येथे आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सिंधू संस्कृतीची लिपी उलगडण्यासाठी १० लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. या लिपीचा उगम कोणता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आजही ही लिपी गूढ आहे. त्याच पार्श्वभूमीवर सिंधू संस्कृतीच्या लिपीचे रहस्य उलगडण्यासाठी विद्वान आणि संशोधकांची नवी लाट AI आणि प्रगत पद्धतींचा वापर करत आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही प्राचीन भाषा लवकरच उलगडली जाईल अशी आशा निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संशोधक AI अल्गोरिदमचा वापर करून सिंधू लिपीत वारंवार येणाऱ्या चिन्हांचे विश्लेषण करत आहेत अशी माहिती द हिंदूने दिली आहे. यामुळे भाषेची संरचना आणि अर्थ समजून घेण्यात मदत होऊ शकते. मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या माहितीवर प्रक्रिया करून त्यातील विशिष्ट पद्धतीचे नमुने एकत्र करण्याची AI ची क्षमता ही या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

सुमारे ५००० वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात सिंधू नदीच्या खोऱ्यात एक प्राचीन संस्कृती बहरास आली होती. या संस्कृतीशी संबंधित पुरातत्त्वीय स्थळांवर झालेल्या सर्वेक्षण, उत्खनन आणि संशोधनातून तिच्या समृद्ध इतिहासाविषयी समजण्यास मदत होते. तत्कालीन कालखंडातील राहणीमान, वेशभूषा, खाद्यसंस्कृती, व्यापार, स्थापत्य अशा अनेक अंगांविषयी माहिती मिळते. असे असले तरी या संस्कृतीच्या लिपीचे वाचन अद्याप झालेले नाही. परंतु, उपलब्ध पुरातत्त्वीय अवशेषांवरून त्या काळात प्रगत लेखन प्रणाली होती हे मात्र निश्चित असे मत अभ्यासक व्यक्त करतात.

लिपी अजूनही एक गूढच आहे

गेल्या १०० वर्षांपासून पुरातत्त्वज्ञ, भाषातज्ज्ञ, इतिहासकार आणि विज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी सिंधू लिपीचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला. पण, अद्याप त्यात त्यांना यश आले नाही. ही लिपी उलगडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या संशोधन पद्धतीत बदल झाले. पारंपरिक तंत्रांपासून ते आधुनिक संगणक आणि सांख्यिकी विश्लेषण अशा अनेक पद्धतींचा वापर करण्यात असला तरी ही लिपी अद्याप गूढच राहिली आहे.

लिपीचे विश्लेषण करण्यासाठी AI चा वापर

सिंधू संस्कृतीच्या लिपीचे रहस्य उलगडण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विद्वान आणि संशोधकांना मदत करू शकते तसेच त्यामुळे अधिक माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवू शकते, असे ओमर खान यांनी द हिंदूला सांगितले. खान हे सॅन फ्रान्सिस्को येथील सिंधू संस्कृतीचे अभ्यासक आहेत. ते harappa.com या संकेत स्थळाचे संस्थापक आहेत. हे संकेत स्थळ गेल्या तीन दशकांपासून सिंधू संस्कृतीवर संशोधनपर शास्त्रीय लेख प्रकाशित करत आहे. बहाता मुखोपाध्याय आणि क्रिप्टोग्राफर भरत राव हे या रहस्यमय लिपीचे रहस्य उलगडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रांतील स्वतंत्र संशोधक आहेत. राव क्रिप्टोग्राफर आहेत, तर मुखोपाध्याय सॉफ्टवेअर अभियंत्या आहेत. “२०१० पासून मी या लिपीने भारावून गेलो आहे आणि ती समजून घेण्यासाठी शास्त्रीय विश्लेषणाचा शोध घेत आहे,” असे मुखोपाध्याय यांनी द प्रिंटला सांगितले.

स्टॅलिन यांनी जाहीर केला मिलियन डॉलरचा पुरस्कार

अलीकडेच, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी सिंधू लिपी उलगडणाऱ्यासाठी १० लाख डॉलर्सचा पुरस्कार जाहीर केला आहे.
“कधीकाळी समृद्ध असलेल्या सिंधू खोऱ्याच्या लेखन प्रणालीला आपण अद्याप समजू शकलेलो नाही. देशाच्या इतिहासात तामिळनाडूला योग्य स्थान मिळावे यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न आहेत,” असे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी कार्यक्रमात सांगितले. सिंधू संस्कृतीच्या शोधला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. मुखोपाध्याय या चेन्नईतील तीन दिवसीय परिषदेत सहभागी झाल्या होत्या. या सेमिनारमध्ये मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सिंधू लिपीवर काम करणाऱ्या संशोधकांसाठी पुरस्कार जाहीर केला. मुखोपाध्याय यांनी या घोषणेचे स्वागत केले आणि या प्रोत्साहनामुळे अनेक विद्वानांना लिपी उलगडण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे सांगितले.

२०२४ मध्ये डिसेंबर महिन्यात राज्यसभेत चर्चेचा मुद्दा

२०२४ मध्ये डिसेंबर महिन्यात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सिंधू लिपी उलगडण्याच्या प्रयत्नांबाबत राज्यसभेत प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांनी सांगितले की, “दक्षिण आशियाच्या लोकसंख्येच्या इतिहासाचा शोध घेण्यासाठी जीनोमिक्स वापरून कोणताही वैज्ञानिक अभ्यास हाती घेण्याचा प्रस्ताव नाही कारण त्यावर मतभेद आहेत.”

द्रविड भाषा आणि ब्राह्मी लिपीशी संबंध

सिंधू लिपी समजणे कठीण आहे. कारण रोसेट्टा स्टोनसारखा किंवा द्विभाषिक मजकूरासारखा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. या भाषेतील प्रत्येक चिन्हाचे स्वरूप आणि शैली वेगवेगळे आहेत. तसेच बहुतेक उपलब्ध लेख खूप लहान आहेत. हे लेख प्रामुख्याने मृण्मय मुद्रा, मातीची भांडी आणि इतर पुराव्यांवर आढळले आहेत. अनेकांनी प्रयत्न करूनही ही लिपी अद्याप उलगडलेली नाही. काही विद्वान तिचा संभाव्य संबंध द्रविड भाषांबरोबर किंवा ब्राह्मी लिपीशी असल्याचे सूचित करतात. परंतु याला कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is 5000 years old indus script about to be deciphered buzz around ai driven research svs