Indian origin US Vice President Kamala Harris अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि डेमोक्रॅटिक पक्षातर्फे कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काही महिने शिल्लक असताना बायडेन यांनी हा निर्णय घेतल्याने अमेरिकेतील निवडणुकीचे चित्रच बदलले आहे. बायडेन यांच्या पाठिंब्यामुळे कमला हॅरिस या डेमोक्रेटिक पक्षाच्या सर्वांत प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.
“२०२० मध्ये पक्षाचे उमेदवार म्हणून माझा पहिला निर्णय म्हणजे कमला हॅरिस यांची उपाध्यक्षपदी निवड करण्याचा होता आणि हा मी घेतलेला सर्वोत्तम निर्णय होता,” असे बायडेन यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये लिहिले. ते पुढे म्हणाले, “या वर्षी आमच्या पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून कमला यांना माझा पूर्ण पाठिंबा आणि समर्थन देऊ इच्छितो.” त्यावर हॅरिस यांनी प्रतिक्रिया देत पोस्ट केले की, त्यांचा हेतू हे नामांकन मिळवणे आणि निवडणूक जिंकणे आहे. डेमोक्रॅटिक पक्ष हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार मानून तयारीला लागला आहे.
हेही वाचा : Nipah, Zika, Chandipura; हे प्राणघातक विषाणू भारतासाठी चिंतेचा विषय का ठरत आहेत?
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत करण्यासाठी एक कृष्णवर्णीय महिला वर्णद्वेष, लैंगिकता आणि त्यांच्या राजकीय इतिहासाच्या आव्हानांवर मात करू शकणार का, असा प्रश्न अनेकांसमोर आहे. आतापर्यंत अमेरिकेत मतदारांनी केवळ एकच कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष निवडला आहे. विशेष म्हणजे आजवर कोणत्याही महिलेला राष्ट्राध्यक्षपदी निवडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे हॅरिस यांच्यापुढे अनेक अडथळे आहेत. या अडथळ्यांबद्दल काही कृष्णवर्णीय मतदारांमध्येही शंका आहे. अमेरिकेत महिला राष्ट्राध्यक्ष निवडीची एकूण परिस्थिती आणि इतिहास काय? यावर एक नजर टाकू.
हॅरिसची संभाव्य उमेदवारीकडे कसे पाहिले जात आहे?
राष्ट्राध्यक्षपदाच्या डीबेटमध्ये बायडेन यांची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यानंतर उमेदवारी सोडण्यासाठी त्यांच्यावरील दबाव वाढू लागला. अखेर त्यांनी उमेदवारीतून माघार घेतली आणि कमला हॅरिस यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला. मात्र, हॅरिस यांच्यासमोर मोठी आणि महत्त्वाची आव्हाने आहेत. प्रचारासाठी अवघे काही महिने शिल्लक असताना, त्यांना पक्ष आणि देणगीदारांना त्वरित एकत्र करणे आवश्यक आहे. अमेरिकेत हॅरिस यांना समर्थन देणार्यांची संख्या बायडेन यांच्या तुलनेत किंचित बरी आहे. ‘फाइव्ह थर्टी एट’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार ३८.६ टक्के अमेरिकन नागरिक हॅरिस यांना समर्थन देतात; तर ५०.४ टक्के नागरिक नापसंती दर्शवितात. बायडेन यांना ३८.५ टक्के नागरिक समर्थन देतात; तर ५६.२ टक्के नागरिकांची त्यांना नापसंती आहे.
ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न केल्यानंतर १५-१६ जुलै रोजी झालेल्या रॉयटर्स/इप्सोस सर्वेक्षणानुसार हॅरिस आणि ट्रम्प यांना प्रत्येकी ४४ टक्के लोकांचे समर्थन मिळाले होते. मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनी २०२३ च्या ‘टाइम’मधील लेखात सरकारमध्ये महिलांची अधिक गरज असण्याविषयी लिहिले होते. त्यांनी असे म्हटले होते, “स्त्रिया वेगळ्या पद्धतीने शासन करतात. त्या स्वतःला झोकून देऊन काम करतात याचे अनेक पुरावे आहेत. स्त्रिया ऐतिहासिकदृष्ट्या दुर्लक्षित राहिलेल्या मुद्द्यांवरही आपले लक्ष केंद्रित करतात.”
इतिहास काय सांगतो?
अमेरिकेने २००८ मध्ये बराक ओबामा यांना निवडून देत इतिहास रचला होता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणारे ते पहिले कृष्णवर्णीय ठरले. पक्षाचे अध्यक्षीय तिकीट मिळणार्या हिलरी क्लिंटन या एकमेव महिला २०१६ मध्ये ट्रम्प यांच्याकडून पराभूत झाल्या. कमला हॅरिस या उपाध्यक्ष म्हणून काम करणार्या पहिल्या कृष्णवर्णीय व दक्षिण आशियाई महिला ठरल्या. त्यांना वंश व लिंगसंबंधित अन्यायकारक गोष्टींना तोंड द्यावे लागले आहे आणि अमेरिकेत ही सामान्य बाब मानली जाते. असे असूनही कमला हॅरिस यांच्या समर्थकांना असा विश्वास आहे की, त्या या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार आहेत. हॅरिस यांना उपाध्यक्षपदी निवडून आल्यानंतर वांशिक व लैंगिक भेदभाव आणि टीका यांचा सामना करावा लागला आहे. परंतु, पक्षातील त्यांची स्थिती आता सुधारली आहे.
डेमोक्रॅटिक पक्ष हॅरिस यांना पाठिंबा देण्यास तयार आहे का?
डेमोक्रॅटिक पक्षातील काही लोकप्रतिनिधींनी कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून उभे करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे; तर काही लोकप्रतिनिधी या निर्णयावर नाराज आहेत. प्रतिनिधी अलेक्झांड्रा ओकासिओ-कॉर्टेझ यांनी इन्स्टाग्रामवर एका पोस्टमध्ये लिहिले, “जर तुम्हाला असे वाटत असेल की, जो बायडेन यांना माघार घेण्यास सांगणाऱ्या व्यक्ती कमला हॅरिस यांना समर्थन देतील, तर असे काहीही नाही. कमला हॅरिस यांना उमेदवारी देणे सुरक्षित नाही.” हॅरिसच यांच्या पूर्वीच्या राजकीय चुका, वर्णद्वेष व लिंगभेदाच्या व्यापक सामाजिक समस्या या बाबी पक्षाच्या चिंतेचे कारण आहेत.
कमला हॅरिस यांच्या समर्थकांनुसार, कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूजम व मिशिगनचे गव्हर्नर ग्रेचेन व्हिटमर यांसारख्या इतर संभाव्य डेमोक्रॅटिक उमेदवारांच्या तुलनेत कमला हॅरिस यांचा लोकांवर जास्त प्रभाव आहे. हॅरिस यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत; परंतु प्रचाराद्वारे या बाबी व्यवस्थापित केल्या जाऊ शकतात.
हेही वाचा : ब्रीफकेस ते टॅबलेट व्हाया बही खाता: निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचं सादरीकरण कसं बदललं?
हॅरिसविषयी ट्रम्प यांचा द्वेष
ट्रम्प यांनी हॅरिस यांच्याविरोधात सातत्याने वर्णद्वेषी व लैंगिकतावादी शब्दांचा वापर केला आहे. २०२० मध्ये त्यांनी हे वक्तव्य केले होते की, कॅलिफोर्नियामध्ये जन्मलेल्या हॅरिस उपाध्यक्षपदाच्या उमेदवार होण्यास पात्र नाहीत. मिशिगनमध्ये नुकत्याच झालेल्या सभेत ट्रम्प यांनी हॅरिस यांची खिल्ली उडवीत म्हटले, “मी त्यांना लाफिंग कमला म्हणतो. तुम्ही त्यांना हसताना पाहिलंत का? त्या वेड्या आहेत.” ट्रम्प यांनी असे वक्तव्य आणि आरोप ओबामा यांच्यावरदेखील केले होते. समीक्षकांनी ट्रम्प यांच्यावर वांशिक आणि लैंगिक पूर्वग्रह कायम ठेवल्याचा आरोप केला आहे; ज्यामुळे मतदारांवर प्रभाव पडू शकतो.