सध्या श्रीराम, अयोध्या आणि मंदिर अशा वेगवेगळ्या मुद्यांवरून भारतीय राजकारण तापलेले आहे. भाजपाने राम जन्मभूमीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून राजकारणातील आपली पकड मजबूत केल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एका योजनेने आणखी एक मुद्दा पुढे येऊ घातला आहे. अलीकडेच नितीश कुमार यांनी सुमारे ७२ कोटी रुपयांच्या योजनेचा प्रारंभ केला. ही योजना पुनौरा धाम येथील देवी सीतेच्या जन्मस्थानाशी संबंधित आहे. इतकेच नाही तर केंद्र सरकारवर टीका करत असताना त्यांच्या पक्षाने, जेडी(यू) ने म्हटले, ‘केंद्राने केवळ अयोध्या मंदिर आणि भगवान रामांवरच लक्ष केंद्रित केले आहे. तर सीतेकडे दुर्लक्ष केले आहे.’ याच पार्श्वभूमीवर बिहार ही खरंच सीतेची जन्मभूमी आहे का? हे समजून घेणे महत्त्वाचे ठरणारे आहे.
आचार्य किशोर कुणाल हे माजी आयपीएस अधिकारी आणि बिहार स्टेट बोर्ड ऑफ रिलिजियस ट्रस्टचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसारच पुनौरा धामचा केंद्राच्या रामायण सर्किटमध्ये समावेश करण्यात आला होता. द इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या बाबींवर प्रकाशझोत टाकला. बिहारमधील मिथिलेचा इतिहास आणि पौराणिक कथा तसेच त्यांचा सीतेशी असलेला संबंध यावर ते सविस्तर उत्तरे देतात, ती पुढीलप्रमाणे:
प्रश्न १: रामायणात सध्याच्या बिहारचे कोणते उल्लेख आहेत?
एक संशोधक आणि अभ्यासक या नात्याने, मी प्रथम वाल्मिकी रामायण या मुख्य स्त्रोत असलेल्या ग्रंथाकडे वळतो, कारण याच ग्रंथावर तुलसीदासांच्या रामचरितमानस प्रमाणेच रामायणाच्या अनेक आवृत्त्या आधारित आहेत. वाल्मिकी रामायणात सीतेचा संदर्भ देण्यासाठी चार विशेष नामं वापरली आहेत, यात वैदेही, जानकी, सीता आणि मिथिलापुरी यांचा समावेश होतो. मिथिलापुरी हा मिथिलेचा स्पष्ट संदर्भ आहे, तर वैदेही आणि जानकी ही नावे सीतेचे वडील, राजा जनक, ज्यांना विदेह देखील म्हणतात, यावरून आलेली नावे आहेत. चित्रकूट येथे रामाच्या वनवासाच्या वेळी सीता स्वत: तिच्या जन्माची कथा अनुसुया (ऋषी अत्री यांची पत्नी) यांना सांगते, या कथेनुसार ती जनकाने नांगरलेल्या शेतात सापडली होती.
अधिक वाचा: इस्लामपेक्षाही मृत्यूला जवळ करणारे गुरू तेग बहादूर कोण होते?
महर्षी विश्वामित्र यांच्यासोबत प्रवास करताना राम आणि लक्ष्मण यांनी बिहारमधील अनेक स्थळांना भेटी दिल्याचे मानले जाते. वाल्मिकींच्या संदर्भानुसार, अयोध्या सोडल्यानंतर, चित्रकूट हे त्यांचे पहिले मुक्कामाचे स्थान होते. त्यांचा दुसरा मुक्काम सध्याच्या सारण जिल्ह्यातील गंगा आणि सरयूच्या संगमाजवळ होता. ते तिसर्या ठिकाणी गेले ते म्हणजे सध्याच्या बक्सरमधील गंगाजवळील सिद्धाश्रम. नंतर ते बैलगाडीने पाटली (पाटणा) जवळ असलेल्या गंगा आणि सोनच्या संगमापर्यंत गेले. सोन-गंगा संगम मार्ग गेल्या काही वर्षांत पाटण्यापासून दूर गेला आहे. राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र यांनी गंगा पार केली आणि त्यावेळी वैशालीचा राजा सुमतीने त्यांचे स्वागत केले. तिघेही नंतर अहिल्येच्या आश्रमात गेले, ज्याला आता मिथिलापुरी (सध्याचे दरभंगा) येथील अहिरौरी म्हणून ओळखले जाते. मिथिलेचे वर्णन राम आणि सीतेच्या विवाहाच्या वेळी देखील येते. रामाची वरात (लग्नाची मिरवणूक) चार दिवसांत अयोध्येहून मिथिलापुरीला पोहोचते आणि तीन दिवसांत परतते असा उल्लेख आहे. वाल्मिकींनी रामाने मिथिलापुरीला फक्त एकदाच भेट दिल्याचा उल्लेख केला आहे, तर रामायण महाकाव्याच्या नंतरच्या काही आवृत्त्यांमध्ये दावा केल्याप्रमाणे, राज्याभिषेकानंतरही रामाने येथे भेट दिली होती.
प्रश्न २: मिथिलेची भौगोलिक व्याप्ती किती आहे?
विष्णु पुराणात मिथिलेचे वर्णन गंगेच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला असलेले ठिकाण असे केले आहे. ऐन-ए-अकबरी मधील अबुल फझलने मिथिला एक परगणा (प्रशासकीय विभाग) म्हणून स्पष्टपणे उल्लेख केला आहे, त्याचे स्थान आणि विस्तार निश्चित केला आहे, ज्यामध्ये सध्याचे दरभंगा, मधुबनी, सीतामढी, सुपौल, सहरसा, मधेपुरा आणि बिहारच्या काही लगतच्या भागांचा आणि नेपाळचा समावेश आहे. मिथिला या भागाला महला असेही म्हटले जाते. बिहार, बंगाल आणि ओरिसा या पूर्वीच्या संयुक्त प्रांताच्या महसूल नोंदींमध्ये त्याचा उल्लेख आढळतो.
अधिक वाचा: Mathura History: मथुरेतील कृष्ण जन्मस्थान: इतिहास नेमके काय सांगतो?
प्रश्न ३: सीतामढीमध्ये सीतेचे जन्मस्थान कोणते, जानकी मंदिर की पुनौरा धाम?
काहीजण सीतामढी येथील जानकी स्थान हे देवी सीतेचे जन्मस्थान मानतात. याठिकाणी तलाव आणि इतर काही धार्मिक वास्तू देखील आहेत. परंतु जवळपास १० वर्षांच्या आमच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की येथील जानकीचे मंदिर सुमारे २०० वर्षांपूर्वी एका ऋषींनी बांधले होते, त्यांनी त्यांच्या स्वप्नात हे ठिकाण सीतेचे जन्मस्थान म्हणून पाहिल्याचा दावा केल्यानंतर हे मंदिर बांधण्यात आले होते. आमचे संशोधन हे वाल्मिकी रामायण तसेच स्वकीय-परकीय प्रवाशांच्या नोंदींवर अवलंबून आहे, यातून पुनौरा धाम हेच सीतेचे जन्मस्थान असल्याचे सिद्ध झाले आहे. याठिकाणी सीताकुंड, सीता वाटिका आणि लव कुश वाटीकेसोबत १०० वर्षे जुन्या मंदिरांचाही समावेश होतो. रामायण सर्किटसाठी केंद्राने बिहार सरकारकडून सीतेच्या जन्मस्थानाचा अहवाल मागितला तेव्हा, मी आणि इतर संशोधकांच्या मदतीने पुनौरा धामचे नाव सादर केले. हे आता राज्य आणि केंद्र सरकारने मान्य केले आहे. पुनौरा धाम विकसित करण्याचा राज्याचा निर्णय या संशोधनानंतरच पुढे आला. सांख्यिकीशास्त्रज्ञ आणि इतिहासकार सर विल्यम विल्सन हंटर (१८७७), A Statistical Account of Bengal, Volume 13 मध्ये नमूद करतात, “Panaura (Pnaura), सीतामढीपासून तीन मैल दक्षिण-पश्चिमेस आहे, तसेच हे ठिकाण सीतेचे जन्मस्थान असल्याचा ते दावा करतात. “
प्रश्न ४: नेपाळमधील जनकपुरीचा इतिहास काय आहे?
जनकपुरी हे मिथिलापुरीचे तुलनेने आधुनिक नाव आहे, ज्याचा वाल्मिकी रामायणात उल्लेख आहे. आमच्या सरकारने नेपाळ सरकारच्या समन्वयाने जनकपुरीचा समावेश रामायण सर्किटमध्ये केला आहे. १८१६ सालच्या भारत-नेपाळ करारानंतर जनकपूर नेपाळचा भाग झाले. नेपाळमधील प्रमुख इतिहासकार फॅन्सिस बुकानन हॅमिल्टन यांनीही ‘जनकपुरी’ बद्दल काहीही लिहिलेले नाही. तर आपल्याकडे मिथिलापुरीचा उल्लेख आहे.
प्रश्न ५: सध्याच्या सीतामढीचे ऐतिहासिक संदर्भ कोणते आहेत?
प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ अलेक्झांडर कनिंगहॆम यांच्या अहवालानुसार, “सीता-मार्ही (मढी) हे थेट एका रेषेत दरभंगाच्या उत्तर-पश्चिमेस ४० मैलांपेक्षा जास्त अंतरावर आणि नेपाळच्या सीमेपासून १४ मैलांवर स्थित आहे.” हे “पूर्वेला सोवरुन नाल्याने वेढलेले आहे…. गावातील काही भाग असंख्य लहान-लहान प्रवाहांमुळे पाण्याखाली गेले आहेत, जिथे संगम होतो तिथे पुरग्रस्तस्थिती निर्माण होते. सीता-मार्ही येथील पुरातन वास्तूंबद्दल फारसे काही सांगता येत नाही, आणि सीतेला समर्पित काही मंदिरे वगळता हे ठिकाण पुरातत्वशास्त्रीय संशोधनापासून वंचित आहे.”
अधिक वाचा: काशी-तमिळ संगममचे उद्घाटन: काशी आणि तमिळ भूमीचा प्राचीन संबंध काय आहे?
प्रश्न ६: पुनौरासाठी बिहार सरकारच्या कोणत्या योजना आहेत?
धार्मिक ट्रस्टच्या मंडळाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, पुनौरा विकास योजनेत मंदिराचे नूतनीकरण, त्याभोवती छताचा प्रदक्षिणा मार्ग तयार करणे, लवकुश वाटिका, सीता वाटिका आणि सीता कुंड विकसित करणे समाविष्ट आहे. एक ध्यान मंडप देखील तयार केला जाईल आणि सीतेचा जीवन प्रवास दर्शविणारा थ्री-डी चित्रपट प्रदर्शित केला जाईल. याशिवाय, महावीर टेंपल ट्रस्ट सीताकुंडच्या आत १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये सीता मंदिर बांधणार आहे. जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येत राम मंदिराचे उद् घाटन झाल्यावर आम्ही या मंदिर प्रकल्पाला सुरुवात करू.