भक्ती बिसुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना विषाणू संसर्गाची तीव्रता कमी झाली असली तरी या विषाणूच्या नवनवीन प्रकारांचा जन्म होण्याची प्रक्रिया मात्र सुरूच आहे. जगभरामध्ये सातत्याने या विषाणूच्या मूळ प्रकारात बदल होऊन नवनवीन प्रकारांचा उगम होत असल्याचे गेल्या अडीच तीन वर्षांत आपण बघत आलो आहोत. आधी करोना, नंतर त्याचेच अल्फा, डेल्टासारखे प्रकार, त्यानंतर आलेला ओमायक्रॉन आणि ओमायक्रॉनचे कित्येक प्रकार अशी करोनाची पिढी विस्तारत चाललेली आपण पाहिली आहे. आता जगभर या ओमायक्रॉनच्या  ७ु.1.16 प्रकाराची किंवा ‘आर्कट्रस’ची चिंता आणि चर्चा पहायला मिळत आहे. त्यानिमित्ताने हे विश्लेषण.

विषाणूचा नवा प्रकार?

करोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचा  ७ु 1.5 हा प्रकार गेले काही महिने म्हणजे जवळजवळ जानेवारी २०२३ पासून जगभर अस्तित्वात आहे. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला त्याचे निदान झाले. त्यानंतर  ७ु 1.5 मध्ये होत गेलेल्या उत्परिवर्तनातून आता समोर आलेल्या ७ु.1.16 चा उगम झाला आहे. अमेरिका आणि भारतात याचे रुग्ण आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’ म्हणून या प्रकाराची दखल घेतल्यामुळे त्याच्याकडे जगातील सर्वच देशांचे लक्ष लागले आहे. बायोलॉजी रिसर्च वेबसाइट  ्रुफ७्र५ वर प्रकाशित झालेल्या टोकियो विद्यापीठाच्या अभ्यासानुसार हा प्रकार मूळ ओमायक्रॉनपेक्षा किमान दीडपट संसर्गजन्य असू शकतो. करोनाच्या आतापर्यंत समोर आलेल्या प्रकारांमध्ये ओमायक्रॉन हा सर्वात वेगवान संसर्ग करण्याची क्षमता असलेला तरी सर्वात सौम्य लक्षणे असलेला प्रकार होता, हे यानिमित्ताने लक्षात घेणे आवश्यक आहे.

लक्षणे काय? किती गंभीर?

ओमायक्रॉनचा नवा प्रकार असलेला  ७ु.1.16 चा संसर्ग आता पर्यंत जगातील २२ देशांमध्ये आढळल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन, भारत यांचा समावेश आहे. या प्रकाराच्या संसर्गामध्ये धाप लागणे, खोकला आणि डोळय़ांच्या बुबुळांचा दाह (कंजंक्टिव्हायटिस), डोळे चिकट होणे अशा लक्षणांचा समावेश आहे. लीड्स विद्यापीठाचे डॉ. स्टीफन ग्रिफिन यांनी या लक्षणांवर शिक्कामोर्तब केले असून भारतात लहान मुलांमध्ये झालेल्या विषाणू संसर्गातही ही लक्षणे दिसल्याचे स्पष्ट केले आहे. सुमारे २२ देशांमध्ये त्याचे संक्रमण होत असल्यामुळे तो चिंतेचा विषय (व्हेरियंट ऑफ कन्सर्न) ठरला असून संसर्ग टाळण्यासाठी मुखपट्टी वापराची गरज जागतिक स्तरावरील वैद्यकीय तज्ज्ञांकडून अधोरेखित करण्यात येत आहे. डोळय़ांचा दाह, डोळे लाल होणे, चुरचुरणे, सतत चोळावेसे वाटणे किंवा सूज येणे हे फार कमी वेळा करोनाच्या मुख्य लक्षणांमध्ये दिसले आहे. मात्र, आता याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचेही सांगितले जात आहे.

उत्परिवर्तन म्हणजे काय?

२०२० पासून करोना विषाणूने संपूर्ण जग वेठीस धरले आहे. एखादा विषाणू दीर्घकाळ वातावरणात असेल तर त्याला प्रतिकार करणारी सामूहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) तयार होते. या प्रतिकारशक्तीशी झुंज देऊन स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी विषाणू त्याच्या आंतर्गत रचनेत सातत्याने बदल करतो आणि स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवतो. याला उत्परिवर्तन (म्युटेशन) असे म्हणतात. करोना विषाणूमध्ये आतापर्यंत अक्षरश: शेकडो बदल झाले आहेत. त्यातून नवनव्या विषाणू प्रकारांची निर्मिती झाली आहे. विषाणूबाहेरील काटेरी आवरणामध्ये हे बदल झाल्याचे प्रामुख्याने दिसून आले आहे. जगभर करोना विषाणूला अवरोध करण्यासाठी विविध औषधांचा वापर प्रयोग म्हणून करण्यात आला. नागरिकांची सामूहिक प्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी लसीकरणाचा वापर मोठय़ा प्रमाणावर करण्यात आला. त्या सगळय़ांना तोंड देत विषाणूने स्वत:चे अस्तित्व कायम राखण्यासाठी केलेल्या अनेक बदलांमधून आताचा  ७ु.1.16 किंवा ‘आर्कट्रस’ हा प्रकार अस्तित्वात आला आहे.

प्रतिबंध हाच उपचार?

करोना विषाणू संसर्गाच्या साथीच्या सुरुवातीपासून जगभरात सर्वाधिक वेगाने पसरणारा करोना प्रकार म्हणून ओमायक्रॉन या प्रकाराची नोंद झाली. आता ७ु.1.16 किंवा ‘आर्कट्रस’ हा ओमायक्रॉनपेक्षा अधिक संक्रमणक्षम असल्याचे संशोधनातून समोर येत आहे. याचाच अर्थ आतापर्यंत येऊन गेलेल्या सर्व करोना प्रकारांमध्ये हा नवा प्रकार वेगवान संसर्ग करणारा आहे, हे स्पष्ट आहे. मात्र, त्याच्या तीव्रतेबाबत अद्याप कोणत्याही निष्कर्षांप्रत आल्याचे ठोस संशोधन पुढे आलेले नाही. त्यामुळे मुखपट्टीचा वापर, हात धुणे, अंतर राखणे, गर्दी टाळणे, वर्धक मात्रेसह लसीकरण पूर्ण करणे असे प्रतिबंधात्मक उपाय हेच उपचार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, सहव्याधीग्रस्त तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी झालेले रुग्ण यांनी विशेष खबरदारी घेऊन प्रतिबंधक उपायांची अंमलबजावणी करावी, असे आवाहनही डॉक्टर करत आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is corona new arctrus a concern corona virus infection print exp 0423 ysh
Show comments