गाझापट्टीमधील हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलने देशात तातडीची परिस्थिती जाहीर करून प्रतिहल्ला केला. मात्र, १८ दिवस गाझापट्टीवर बॉम्ब हल्ले केल्यानंतरही अद्याप जमिनीवरील कारवाई करण्यास सुरुवात झालेली नाही. आणखी काही दिवस तरी जमिनीवरून आक्रमण केले जाणार नाही, अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. हमासच्या ताब्यात असलेल्या ओलिसांची सुटका करणे, आंतरराष्ट्रीय दबाव आणि राजकीय-लष्करी मतभेद निर्माण झाल्यामुळे आक्रमणास उशीर होत असल्याचे पुढे आले आहे. इस्रायली सैन्य मागच्या १८ दिवसांपासून अखंडपणे गाझापट्टीवर जोरदार बॉम्बवर्षाव करत आहे. मात्र, अद्याप त्यांनी जमिनीवरील आक्रमणाला सुरुवात केलेली नाही. यामागची कारणे काय आहेत? याचा घेतलेला हा आढावा ….
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने जमिनीवरील आक्रमण पुढे ढकलण्यासाठी इस्रायलचे मन वळविले आहे. या युद्धात इराणचा पाठिंबा असलेल्या हेजबोलाने उतरू नये, यासाठी अमेरिकेकडून इस्रायलला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करून मदतीचा हात पुढे केला जात आहे. हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर अचानक हल्ला चढवून २०० हून अधिक नागरिकांना गाझापट्टीत ओलिस ठेवले आहे. इस्रायली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जमिनीवरील आक्रमण सुरू केल्यास ओलिसांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हमासशी कोणताही करार करणे अशक्य होईल.
हे वाचा >> विश्लेषण: हमास-इस्रायल संघर्षात आंतरराष्ट्रीय युद्धनियमांचे किती उल्लंघन?
“इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आणि इस्रायल संरक्षण फोर्स (IDF) यांच्यातील एकमेकांवरचा विश्वास कमी झालेला आहे”, असे इस्रायलच्या येडिओथ अहरोनथ दैनिकातील संपादकीयमध्ये लेखक नहुम बर्निया यांनी नमूद केले असल्याची माहिती फर्स्टपोस्ट या संकेतस्थळाने दिली. “सरकारला महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत, ही बाब आता सर्वच मान्य करत आहेत”, असेही संपादकीय लेखात म्हटले आहे.
लेखक बर्निया यांनी सरकार आणि लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली की, नेत्यानाहू हे लष्करी अधिकाऱ्यांवर संतापले असून ७ ऑक्टोबरला जो लाजिरवाणा हल्ला झाला, त्याबद्दल ते लष्काराला दोष देत आहेत. ७ ऑक्टोबरच्या मध्यरात्री हमासच्या दहशतवाद्यांनी तीनही बाजूंनी इस्रायलमध्ये घुसखोरी करून अक्षरश: थैमान घातले. इस्रायली अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हमासने केलेल्या या हल्ल्यात जवळपास १,४०० इस्रायली नागरिक मारले गेले आहेत.
हमासने अचानक हल्ला करून हजारो नागरिकांची हत्या केलीच, त्याशिवाय २०० हून अधिक नागरिकांचे अपहरण करून त्यांना ओलिस ठेवले. इस्रायलच्या इतिहासातील आतापर्यंतचा हा सर्वात भीषण असा हल्ला ठरला आहे. ज्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या बॉम्बवर्षावात आतापर्यंत गाझापट्टीतील ५,७९१ नागरिक मारले गेले असल्याची माहिती, हमासच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या युद्धामुळे इस्रायलमधील मुख्य प्रवाहातील राजकारणात असलेल्या उजव्या आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये एकमत झाले आहे.
पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आणि संरक्षण मंत्री योव्ह गॅलेन्ट यांच्यामध्ये कारवाई करण्यावरून मतभेद असल्यामुळे तणाव आणखी वाढला आहे, अशी बातमी इस्रायलमधील डावीकडे झुकलेल्या हारेट्ज या दैनिकात अमोस हारेल यांनी दिली.
हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या नृशंस हल्ल्याला रोखण्यासाठी अयशस्वी झाल्याबद्दल लष्करी अधिकारी आणि पंतप्रधान एकमेकांवर आरोप करत आहेत.
मतभेद, ओलिस ठेवलेले लोक आणि आंतरराष्ट्रीय कारस्थान
मंगळवारी (दि. २४ ऑक्टोबर) सरकारतर्फे काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि लष्कर प्रमुख आणि लष्कराचे वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी यांच्यात पूर्ण समन्वय आहे. हमासला कठोर उत्तर देऊन इस्रायलला मोठा विजय मिळवून देण्यासाठी हे लोक अहोरात्र काम करत आहेत. “पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि लष्करप्रमुख यांच्यात संपूर्ण आणि परस्पराप्रती विश्वासाची भावना असून ध्येयाप्रती त्यांचे एकमत आहे”, असेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले.
इस्रायलच्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी विरोधी संस्थेच्या गुप्तचर विषयातील तज्ज्ञ पॅट्रिक बेटेन यांनी मात्र जमिनीवरील आक्रमणावरून मतभेद आहेत, असे स्पष्ट केले. “गाझापट्टीत अजूनही मोठ्या संख्येने इस्रायली नागरिकांना ओलिस ठेवल्यामुळे जमिनीवरील आक्रमण करण्यास अडथळे निर्माण होत आहेत”, असेही बेटेन यांनी सांगितले.
ज्या लोकांना हमासने स्वतःच्या ताब्यात ठेवले आहे, त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट हे तेल अविवमध्ये सरंक्षण मंत्री गॅलेन्ट यांच्या घराबाहेर रोज आंदोलन करत आहेत. इस्रायली राजकारणाचे अभ्यासक अकिवा एल्डर यांनी सांगितले की, हमासच्या भीषण हत्याकांडानंतर निर्माण झालेल्या भावनांमुळे पंतप्रधान नेत्यानाहू आणि लष्करप्रमुख वेगवेगळा विचार करू लागले आहेत.
आंतरराष्ट्रीय नेत्यांकडून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
इस्रायलमधील राजकीय विश्लेषक डॅनियल बेन्सिमॉन यांनी सध्याच्या परिस्थितीचे विश्लेषण केले असून जमिनीवरील हल्ल्याला उशीर होत असल्याची कारणीमीमांसा समजावून सांगितली. फर्स्टपोस्ट या संकेतस्थळाने डॅनियल यांचे मत सविस्तरपणे मांडले आहे. “पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि लष्करप्रमुख यांच्यात मतभेद असो किंवा नसो, पण एक गोष्ट खरी आहे की, अमेरिकन्स आणि युरोपियन नेते इस्रायलच्या भूमीत येऊन आपल्या मधाळ शब्दांचा वापर करून इस्रायलला जमिनीवरील आक्रमण करण्यापासून रोखत आहेत”, असे डॅनियल यांनी सांगितले.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही मंगळवारी इस्रायलमध्ये येऊन पंतप्रधान नेत्यानाहू यांची भेट घेतली. या भेटीमागचे कारण विषद करताना डॅनियल म्हणाले, “इस्रायलने जमिनीवरील आक्रमण सुरू केल्यानंतर त्याच्या अनेक ठिकाणांहून प्रतिक्रिया उमटतील आणि हा संघर्ष संपूर्ण मध्य आशियाला वेढून टाकू शकतो, अशी भीती कदाचित आंतरराष्ट्रीय समुदायाला वाटत आहे.” मागच्या दोन आठवड्यात जागतिक पातळीवरील अनेक नेत्यांनी इस्रायलला भेट देऊन सहानुभूतीचे शब्द उच्चारले आहेत. १८ ऑक्टोबर रोजी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही इस्रायलला भेट देऊन इस्रायलच्या पाठिशी आहोत असे सांगितले.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनीही इस्रायलच्या लोकांना दिलासा दिला. दहशतवादाच्या लढाईत इस्रायल एकटे नाही, असे सांगताना हा संघर्ष फोफावू नये याचीही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला त्यांनी दिला. डॅनियल यांच्या मते, “जो बायडेन आणि मॅक्रॉन तोंडदेखले छान छान बोलत आहेत. पण, त्यांचा खरा उद्देश इस्रायलला गाझापट्टीत आक्रमण करण्यापासून रोखणे आणि इराणला या युद्धात सामील होण्यापासून दूर ठेवणे एवढाच आहे.”