भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पुन्हा बंडाचे संकेत दिले आहेत. बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात सरकार तसेच भाजपलाही त्यांनी अप्रत्यक्ष लक्ष्य केले. पंकजा या बऱ्याच काळापासून अस्वस्थ दिसतात. पक्षात त्यांचा सन्मान होत नाही ही खदखद आहे. आताही त्यांनी चारित्र्यहीन तसेच पैशाचे राजकारण करणाऱ्यांचा पाडाव करणार अशी घोषणा मेळाव्यात केली. पण कुणाचेही नाव घेतले नाही. उमेदवार पाडण्याची भाषा त्यांनी पहिल्यांदा केली आहे. आता पंकजा भाजपपासून वेगळी वाट धरणार काय, त्यांच्या पुढे पर्याय काय आहेत, पक्षनेतृत्व त्यांची नाराजी दूर करणार का असे प्रश्न त्यांच्या भाषणातून निर्माण झाले. अर्थात त्यांनी आपली निष्ठा तकलादू नाही हे जाहीर करत भाजपमध्येच राहणार असल्याचे सूचित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंडाचा झेंडा हाती घेणार?

पंकजा मुंडे यांचे पिता गोपीनाथ मुंडे यांचे राज्यात भाजपच्या वाढीत निर्विवाद योगदान आहे. पक्षाची प्रतिमा बदलण्यात त्यांना यश आले. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर आपल्याला पक्षाने महत्त्व द्यावे ही पंकजांची अपेक्षा. मात्र गेल्या दोन दशकांत भाजपचा झालेला विस्तार, त्यात मोठ्या प्रमाणात इतर मागासवर्गीयांचे पाळबळ यामुळे जिल्हावार नेते निर्माण झाले. अगदी पंकजांच्या बीड जिल्ह्यातही पक्षात पर्यायी नेतृत्व तयार झाले. त्यातच विधानसभेला पंकजांचा पराभव झाला. पाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही पंकजांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी वर्चस्व निर्माण केले. धनंजय यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत प्रभाव वाढवला. आता धनंजय यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले असून, ते अजित पवार यांच्याबरोबर आहेत. विधानसभा निवडणुकीत जर भाजप, शिंदे व अजित पवार यांच्या गटाबरोबर महायुतीतून निवडणुकीला सामोरा गेला तर, परळीच्या जागेवर धनंजय यांचाच दावा भक्कम राहील. मग पंकजांना लोकसभा किंवा विधान परिषदेशिवाय पर्याय नाही. लोकसभेचा पर्याय पंकजांनी फेटाळला आहे. त्यांची बहीण बीडची खासदार आहे. मग अशा वेळेस बंडाचा झेंडा पंकजा हाती घेणार काय, हाच प्रश्न आहे. राज्यभर दौऱ्याची घोषणा त्यांनी केली. भाषणात त्यांनी पाथर्डीचा उल्लेख केला. बीडलगतचा नगर जिल्ह्यातील हा भाग. या मतदारसंघात वंजारी समाजाचे मोठ्या प्रमाणात मतदान आहे. मतदारसंघ फेररचनेनंतर हा भाग शेवगावमध्ये समाविष्ट झाला आहे. हा मतदारसंघ त्यांना द्यायचा झाल्यास येथील भाजप आमदाराचे काय? कारण या मतदारसंघात नेहमीच मराठा-वंजारी असा सुप्त संघर्ष आहे.

हेही वाचा : विश्लेषण : रब्बी शेतीमालाचा हमीभाव समाधानकारक?

सरकारवर अप्रत्यक्ष टीका

मेळाव्यात त्यांनी सरकारवर टीका केली. गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक दहा वर्षे रखडले आहे, त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेतकरी तसेच ऊसतोड कामगारांच्या समस्यांनाही हात घातला. गोपीनाथ मुंडे हे ऊसतोडणी कामगारांचे नेते होते. त्यानंतर पंकजा नेतृत्व करू पाहत आहेत. मात्र भाजपमधूनच त्यांना पर्याय देण्याचा प्रयत्न होत आहे. ही बाब त्यांना खटकली. म्हणूनच संयम दाखवणार नाही, मी २०२४ च्या मैदानात उतरणारच असा इशाराच त्यांनी दिला. सरकारकडून अपेक्षा आहेत, मात्र आता निराशा सहन होत नाही हे सांगत, ज्यांना पद दिले ते मेळाव्यापासून दूर गेले असा टोला लगावला. पंकजांच्या मेळाव्यात भाजपचे प्रमुख नेते उपस्थित नव्हते. यापूर्वी राज्यपातळीवरील अनेक नेते आवर्जून हजेरी लावायचे, मात्र यंदा बीड तसेच नगरमधील जिल्हास्तरावरील काही मोजके नेतेच उपस्थित होते. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गैरहजेरीचा संदेशही पंकजांच्या लक्षात आला. एकाकी पाडले जात असल्याची भावना त्यांना सतावतेय. यातून त्यांनी राज्य सरकार वा पक्षसंघटना यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यातच वैजनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत मिळाली नसल्याने त्यांची नाराजी वाढली आहे.

हेही वाचा : ओलिस ठेवलेल्यांचा ठावठिकाणा अद्याप का लागला नाही? इस्रायली लष्कराकडून काय प्रयत्न केले जात आहेत?

पक्षाला इशारा

भाजपच्या पक्ष संघटनेत सरचिटणीस तसेच सचिव या पदांना महत्त्व आहे. त्या दृष्टीने पंकजांकडे राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नव्या कार्यकारिणीतही तेच पद दिले. सरचिटणीसपदी बढती मिळाली नाही. मध्य प्रदेशमध्ये प्रभारी म्हणूनही पाच वर्षे काम केले. विधान परिषदेसाठी उमेदवार निवडताना पंकजांच्या नावाची चर्चा सुरू असते. मात्र उमेदवारी मिळत नाही. त्याचा संदर्भ देत समर्थक एखादे पद मिळेल याची अपेक्षा ठेवतात. प्रत्यक्षात निराशा होते. आता माझे लोक संयम राखणार नाहीत असे जाहीर करत त्यांनी पक्षालाच इशारा दिला. २०१९ मध्ये विधानसभेला पराभव झाल्यापासून आतापर्यंत पक्षाने अन्याय केल्याचे त्या सांगत आहेत, मात्र कोणताच निर्णय घेत नसल्याचे एका विश्लेषकाने नमूद केले. त्यांनी राज्यव्यापी परिक्रमा केली आता दौऱ्याची घोषणा केली आहे पण काही निर्णय घेणार काय, हा मुद्दा आहे.

हेही वाचा : ‘घोस्ट पार्टिकल’चा शोध घेण्यासाठी चीन तयार करतोय समुद्रातील सर्वांत मोठी दुर्बीण, जाणून घ्या सविस्तर

भाजपपुढील समस्या

पंकजांनी जर काही वेगळा निर्णय घेतला तर, राजकारणात वेगळा संदेश जाईल याची भाजपला चिंता सतावतेय. पंकजांना मानणारा मोठा वर्ग आहे. विशेषत: समाजमाध्यमात हा वर्ग सक्रिय दिसतो. भाजपला इतर मागासवर्गीय नेत्यांचा सन्मान राखता आला नाही असा प्रचार सुरू झाला तर, पक्षाला कठीण जाईल. बीड तसेच नगरमधील काही मतदारसंघांत त्याचा फटका बसू शकतो. इतर मागासवर्गीय मतदार हा गेल्या वर्षांत भाजपचा भक्कम पाठीराखा असल्याचे गेल्या काही निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. पंकजांच्या मुद्द्यावर या वर्गाची नाराजी भाजपला महाग पडू शकते. ओबीसींमधील माळी, धनगर तसेच वंजारी या तीन जाती निवडणुकीच्या राजकारणात प्रबळ आहेत. या समूहातील इतर छोट्या जातींना भाजपने प्रतिनिधित्व देत आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पंकजांच्या नाराजीने या समीकरणाला फटका बसू शकतो. त्यामुळेच भाजपही सावध आहे. आता भाजप वरिष्ठ पातळीवर त्यांच्या नाराजीची दखल घेणार काय, यावर पुढील चित्र अवलंबून असेल.

hrishikesh.deshpande@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is displeased pankaja munde going to take different decision bjp worried about votebank print exp css
Show comments