बुरशीजन्य आजारांचा औषधांना प्रतिरोध वाढू लागला असून, तो जागतिक आरोग्यासाठी धोका बनू लागला आहे. हे आजार औषधांना जुमानत नसल्याने त्यावर उपचार करणे दिवसेंदिवस अवघड बनत आहे. प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तींना या आजारांपासून सर्वाधिक धोका आहे. गेल्या दशकभरात केवळ चार नवीन बुरशी प्रतिबंधक औषधांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे अखेर जागतिक आरोग्य संघटनेवर बुरशीजन्य आजारांबाबत धोक्याचा इशारा देण्याची वेळ आली आहे. संघटनेने पहिल्यांदाच या आजारांवरील औषधे आणि निदानाच्या पद्धतींबाबत अहवाल जाहीर केला आहे. त्यात या आजारांवरील प्रभावी उपचारांसाठी संशोधनाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

नेमकी स्थिती काय?

बुरशीजन्य आजार हे सार्वजनिक आरोग्यासाठी चिंतेची बाब बनले आहेत. त्यात कॅन्डिडा या बुरशी संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. यात मुख आणि योनीमार्गात संसर्ग होतो. या संसर्गाचा औषधांना प्रतिरोध दिवसेंदिवस वाढत आहे. बुरशीजन्य आजारांपैकी काहींमध्ये मृत्युदर ८८ टक्क्यांपर्यंत आहे. अनेक गंभीर आजार असलेल्या व्यक्ती आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना यामुळे सर्वाधिक धोका आहे. त्यात कर्करोगावरील केमोथेरपी घेणारे रुग्ण, एचआयव्हीचे रुग्ण आणि अवयव प्रत्यारोप झालेले रुग्ण यांचा समावेश आहे. सध्या उपलब्ध असणाऱ्या औषधांना प्रतिरोध निर्माण होत असल्याने या रुग्णांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

निदानाच्या सुविधा अपुऱ्या?

बुरशीजन्य आजारांमुळे आरोग्य व्यवस्था सक्षम नसलेल्या देशांना सर्वाधिक फटका बसत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याची गंभीर समस्या झाली आहे. बुरशीजन्य आजारांच्या निदानाच्या सुविधा अपुऱ्या आहेत. जगभरातील अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांतील देशांमध्ये बुरशीजन्य आजारांच्या निदानाच्या सुविधा पुरेशा नाहीत. या देशांतील अगदी जिल्हा रुग्णालयांमध्ये अशा निदान सुविधा उपलब्ध नाहीत. निदानाची सुविधा नसल्याने रुग्णांना नेमका कशाचा संसर्ग झाला हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे योग्य उपचारांअभावी रुग्णाचे हाल होतात.

नवीन औषधांची कमतरता का?

बुरशी प्रतिबंधक नवीन औषधांच्या उपलब्धतेवर जागतिक आरोग्य संघटनेने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. गेल्या दशकभरात केवळ चार नवीन बुरशी प्रतिबंधक औषधांना अमेरिका, युरोपीय समुदाय आणि चीनमधील नियामकांकडून मंजुरी मिळाली आहे. जीवघेण्या बुरशी संसर्गावर उपचारासाठी नऊ औषधांच्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. त्यातील केवळ तीन औषधे वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे पुढील दशकभरात अगदी मोजक्या नवीन औषधांना मंजुरी मिळून ती रुग्णांपर्यंत पोहोचतील. याचबरोबर पूर्ववैद्यकीय पातळीवर २२ औषधांची चाचणी सुरू आहे. त्यातून नेमकी किती औषधे वैद्यकीय चाचणीच्या पुढील टप्प्यावर जातील, याबद्दलही साशंकता आहे.

उपचारातील अडचणी कोणत्या?

सध्या बुरशी प्रतिबंधक उपचारांचे अनेक गंभीर दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यात विविध औषधांचा एकत्र वापर, औषधांची मर्यादित मात्रा आणि रुग्णालयात दीर्घकालीन उपचार या अडचणींचा सामना सध्या रुग्णांना करावा लागत आहे. त्यामुळे सुरक्षित बुरशी प्रतिबंधक औषधांची गरज निर्माण झालेली आहे. सुरक्षित औषधांमुळे रुग्णांना दीर्घकाळ औषधे घ्यावी लागणार नाहीत आणि त्यांना जास्त कालावधीसाठी रुग्णालयात राहावे लागणार नाही. धोकादायक असलेल्या बुरशी संसर्ग प्रकारांच्या विरोधात ही औषधे प्रभावी ठरतील, याची काळजी घ्यावी लागेल. विशेषत: लहान मुलांमध्ये त्यांच्या वयानुसार प्रभावी ठरणारी औषधे विकसित करून उपचार करावे लागतील, यावर जागतिक आरोग्य संघटनेने भर दिला आहे.

आव्हाने कोणती?

बुरशीजन्य आजारांचे निदान करण्यात अनेक आव्हाने आहेत. बुरशीजन्य आजारांपैकी मोजक्या रोगाणूंचे (पॅथोजन) निदान सध्या होते. त्यातही निदानाचा निष्कर्ष हाती येण्यास लागणारा कालावधी अधिक आहे. अनेक निदानाच्या पद्धती या प्राथमिकसह इतर आरोग्य सुविधांमध्ये उपलब्ध करून देता येत नाहीत. कारण या निदानासाठी अखंडित वीजपुरवठा लागतो आणि प्रयोगशाळाही सुसज्ज असावी लागते. याचबरोबर डॉक्टरांनाही बुरशी संसर्गाचे निदान करण्याचे पुरेसे ज्ञान नसते. औषधांना या आजारांचा प्रतिरोध वाढल्याने त्यावरील औषधोपचारात मर्यादा येतात. त्यामुळे जागतिक पातळीवर बुरशीजन्य आजारांच्या विरोधात संघटितपणे काम करून त्यावरील उपचारांसाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.

sanjay.jadhav@expressindia.com