अमेरिकेच्या ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्न्मेंट इफिशियन्सी’चे (डॉज) प्रमुख एलॉन मस्क लवकरच प्रमुखपद सोडणार असल्याची माहिती आहे. हे सुतोवाच स्वतः ट्रम्प यांनी केले आहे. त्यामुळे सरकारमधील ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्न्मेंट इफिशियन्सी’ संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्न्मेंट इफिशियन्सी’ (डॉज) हा नवा विभाग तयार करण्यात आला होता. सरकारी पैशांची उधळपट्टी थांबवणे, हा त्यामागील हेतू असल्याचे सांगण्यात आले होते.
परंतु, प्रत्येक जण त्यांच्याशी सहमत नाही. खर्चात कपात, विभाग बंद करण्यासाठी आणि फेडरल नोकऱ्या गमावल्यामुळे या विभागला विरोधाचा सामना करावा लागला आहे. एलॉन मस्क ‘डॉज’चे प्रमुखपद सोडणार आहेत का? त्यांच्या जाण्यानंतर या विभागाचे भविष्य काय आहे? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मस्क हा विभाग कोणत्या कारणांमुळे सोडत आहेत? त्याविषयी जाणून घेऊ…
मस्क ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्न्मेंट इफिशियन्सी’ का सोडतायत?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे सुतोवाच केले आहे की, एलॉन मस्क हे व्हाईट हाऊसमधील ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्न्मेंट इफिशियन्सी’च्या वरिष्ठ सल्लागाराच्या भूमिकेतून पायउतार होऊ शकतात आणि पूर्णवेळ त्यांच्या व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करू शकतात. ट्रम्प म्हणाले, “मस्क जोपर्यंत एजन्सीचे नेतृत्व करण्यास इच्छुक आहेत तोपर्यंत त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये राहावे, अशी त्यांची इच्छा आहे. “मला माहीत आहे की, ती अद्भुत व्यक्ती आहे; परंतु मला हेदेखील माहीत आहे की, त्याच्याकडे चालवण्यासाठी एक मोठी कंपनी आहे”. त्यांनी सोमवारी ओव्हल ऑफिसमध्ये एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करण्यापूर्वी यासंबंधीची माहिती पत्रकारांना दिली.
“कधीतरी, ते परत जाणार आहेत. ते परत जाऊ इच्छितात,” असे ते म्हणाले. ही भूमिका स्वीकारल्यापासून, मस्कने संघीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात केली आहे. त्यांनी युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट आणि युनायटेड स्टेट्स इन्स्टिट्यूट ऑफ पीस यांसारख्या एजन्सी बंद करण्याचाही प्रयत्न केला आहे. परंतु, या निर्णयांना अनेक स्तरांवरून विरोधही झाला आहे. अलीकडील क्विनिपियाक सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, अर्ध्याहून अधिक मतदारांचा असा विश्वास आहे की, मस्क आणि डिपार्टमेंट ऑफ गव्हर्न्मेंट इफिशियन्सी फायदा करण्यापेक्षा जास्त नुकसान करीत आहेत, असे ‘पॉलिटिको’ने म्हटले आहे. १ एप्रिलपर्यंत डिपार्टमेंट ऑफ गव्हर्न्मेंट इफिशियन्सीने अमेरिकन करदात्यांचे १४० अब्ज डॉलर्स वाचवल्याचा दावा केला आहे. प्रतिव्यक्ती हा सरासरी आकडा ८६९.५७ डॉलर्स आहे, असे त्यांच्या वेबसाइटवर सांगण्यात आले आहे.
एलॉन मस्क ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्न्मेंट इफिशियन्सी’ का सोडतील?
टेस्ला व स्पेसएक्सचे सीईओ आणि व्हाईट हाऊसचे वरिष्ठ सल्लागार एलॉन मस्क हे ट्रम्प प्रशासनात विशेष सरकारी कर्मचारी म्हणूनही काम करीत आहेत. याचा अर्थ असा की, विशेष सरकारी कर्मचारी, हे एक पदनाम आहे. या पदावर असणारी व्यक्ती एका कॅलेंडर वर्षात १३० दिवसांपेक्षा जास्त सेवा देत नाही. ‘न्यूजवीक’ने वृत्त दिले आहे की, हा दर्जा सामान्यतः अल्पकालीन प्रकल्पांसाठी आणलेल्या सल्लागारांसाठी वापरला जातो. जर व्हाईट हाऊस संघीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करीत असेल, तर एलॉन मस्क यांचा कार्यकाळ मेमध्ये संपेल.
मुख्य म्हणजे मस्क यांनी ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ते कायद्याने ठरवलेल्या १३० दिवसांच्या मर्यादित कार्यकाळात संघीय खर्चात एक ट्रिलियन डॉलर्सची कपात करण्याचे विभागाचे ध्येय पूर्ण करतील, अशी अपेक्षा करतात. ब्रेट बायर यांच्या मुलाखतीदरम्यान, मस्क यांना विचारण्यात आले की, तुम्ही तांत्रिकदृष्ट्या एक विशेष सरकारी कर्मचारी आहात आणि तुम्ही १३० दिवस या पदावर असायला हवे, तुम्ही त्यापुढेही काम करीत राहणार आहात का, या प्रश्नावर मस्क यांनी उत्तर दिले की, त्यांना विश्वास आहे त्यांच्या टीमने ठरावीक वेळेत एक ट्रिलियन डॉलर्सने तूट कमी करण्यासाठी आवश्यक असलेले बहुतेक काम साध्य केले असेल. याचाच अर्थ डॉज विभागातील त्यांचे काम मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. “मला वाटते की, आम्ही त्या वेळेत एक ट्रिलियन डॉलर्सने तूट कमी करण्यासाठी आवश्यक असलेले बहुतेक काम पूर्ण केले असेल,” असे त्यांनी सांगितले.
मस्क निघून गेल्यास ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्न्मेंट इफिशियन्सी’चे काय होणार?
डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी स्वाक्षरी केलेल्या कार्यकारी आदेशानुसार, ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्न्मेंट इफिशियन्सी’ १८ महिन्यांनंतर बंद होणार आहे. अधिकृतपणे त्याचे कामकाज ४ जुलै २०२६ रोजी संपेल. ३१ मार्च २०२५ रोजी एका पत्रकाराने ट्रम्प यांना विचारले की, हा विभाग मस्क यांच्याशिवाय सुरू राहील का? यावर त्यांनी उत्तर दिले की, मी तुम्हाला ते सांगू शकत नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, या विभागाचे कॅबिनेट सचिव खर्च कमी करण्याची जबाबदारी घेऊ शकतात.
“एका विशिष्ट टप्प्यावर आल्यावर विभागातील सचिवदेखील तयार होतील. असा एक टप्पा येईल जेव्हा सचिव हे काम करू शकतील आणि आपल्याला तेच हवे आहे,” असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या पदभार स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी एका कार्यकारी आदेशाद्वारे सरकारी कार्यक्षमता विभाग तयार करण्यात आला होता. या विभागाचे स्पष्ट उद्दिष्ट १८ महिन्यांत संघीय खर्चात एक ट्रिलियन डॉलर्सची कपात करणे हे होते.
एलॉन मस्क हे सरकारी विभागांमध्ये खर्चाचे ऑडिट, एजन्सी विलीनीकरण व डिजिटल पुनर्रचना यांचे निरीक्षण करणारे प्रमुख आहेत. परंतु, या विभागातील त्यांच्या नेतृत्वावरही टीका झाली आहे. डेमोक्रॅट्स आणि इतर विरोधकांचा असा दावा आहे की, व्हाईट हाऊसमध्ये मस्क यांची मध्यवर्ती भूमिका जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींसाठी आहे आणि हा चिंतेचा विषय आहे. स्पेसएक्सचे संघीय सरकारबरोबर झालेले अब्जावधी डॉलर्सचे करार पाहता, त्यांच्यावर विरोधकांनी ही टीका केली आहे.