दत्ता जाधव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियात जगातील पहिले जनुकीय सुधारित (जीएम) वाण विकसित करण्यात आले आहे. या वाणामुळे जगातून केळी नामशेष होण्याची भीती संपली आहे. त्या विषयी…

जगातील केळीचे पहिले जीएम वाण विकसित?

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केळीचे जगातील पहिले जनुकीय सुधारित (जीएम) वाण विकसित केले आहे. या केळीच्या वाणात केळी पिकास सर्वाधिक धोकादायक ठरलेल्या पनामा या बुरशीजन्य रोगास सक्षमपणे प्रतिकार करण्याची क्षमता असल्याचा दावा केला जात आहे. या जीएम वाणाचा व्यावसायिक प्रसार करण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात भारतासह अन्य आशियायी देशांसह जगातील अन्य देशांत या वाणाच्या चाचण्या सुरू होणार आहेत.

केळीचे जीएम वाण किती महत्त्वाचे ?

पनामा (ट्रॉपिकल रेसफोर – टीआरफोर) हा जगभरातील केळी पिकातील महत्त्वाचा व नियंत्रणात नसलेला आणि आजवर कोणताही ठोस उपाय न सापडलेला हा बुरशीजन्य रोग आहे. केळी उत्पादकांना त्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे या रोगावर जगभरात संशोधन सुरू आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठात मागील वीस वर्षांहून अधिक काळ केळीवर संशोधन सुरू होते. संशोधन प्रकल्प प्रमुख जेम्स डेल यांच्या नेतृत्वाखालील पथकाला जनुकीय सुधारित (जीएम) जात विकसित करण्यात यश मिळाले आहे. नव्या जीएम वाणाचे नाव क्यूसीएव्ही – ४, असे आहे. जैवअभियांत्रिकी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित झालेले हे केळीचे जगातील पहिले वाण असल्याचा दावा केला जात आहे. ऑस्ट्रेलियातील एका जंगली वाणाच्या केळीतील पनामा (टीआरफोर) या बुरशीजन्य रोगाला प्रतिकार करणारे ‘आरजीएटू’ हे जनुक कॅव्हेंडिश वाणाच्या केळीत परावर्तित करून नवे वाण संशोधित करण्यात आले आहे. या नव्या जीएम वाणामध्ये पनामा (टीआरफोर) या बुरशीजन्य रोगाला प्रतिकार करण्याची उच्च क्षमता आहे. हे नवे वाण भविष्यातील केळी पिकाची लागवड आणि उत्पादन निश्चित करणारे ठरणार आहे.

आणखी वाचा- सिद्धिविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिरांचे सुशोभीकरण मुंबई महापालिकेच्या निधीतून…पण हा निर्णय वादग्रस्त का ठरतोय?

नवे संशोधन भारतासाठी का महत्त्वाचे?

जगभरात लागवडीस, खाण्यास कॅव्हेंडिश गटातील केळींच्या वाणाच्या लागवडीला पसंती दिली जाते. भारतात कॅव्हेंडिश गटातीलच ग्रँड नैन वाणाच्या केळीची लागवड केली जाते. या वाणाच्या केळींवर प्रादुर्भाव होणाऱ्या पनामा (टीआरफोर) रोगाचा प्रतिबंध करण्यास अद्याप ठोस उपाय सापडलेला नाही. पनामा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जगातील अनेक देशांत केळी लावगड प्रभावित झाली आहे. देशोदेशी विविध संशोधन सुरू असतानाही पनामा रोगाला प्रतिबंध करण्याच्या प्रयत्नांना फारसे यश आले नाही. त्यामुळे जनुकीय सुधारणा केलेल्या वाणाला कोणताही पर्याय सध्या दिसत नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियात झालेले संशोधन त्या दिशेने पडलेले महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. पनामा, या बुरशीजन्य रोगाने भारतातही शिरकाव केला असून, प्रामुख्याने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, केरळ, कर्नाटकात अनेक ठिकाणी प्रादुर्भाव आढळून आला आहे. महाराष्ट्रात अद्याप शिरकाव झाला नसला तरीही प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पनामा बुरशीजन्य रोगाची इतकी भीती का?

केळीवरील पनामा (आरटीफोर) रोगाच्या प्रादुर्भावामुळे भविष्यात जगातून केळीचे पीकच नाहीसे होण्याची भीती शास्त्रज्ञ व्यक्त करीत होते. मात्र, जीएम केळीच्या संशोधानामुळे केळीचे पीक जगातून नाहीसे होण्याची भीती संपली आहे, असे म्हणण्यास मोठा वाव आहे. पनामा टीआरफोर हा बुरशीजन्य रोगाचा संसर्ग मातीतून होतो. कोणत्याही पिकावर प्रादुर्भाव न होता ही बुरशी अनेक वर्षांपर्यंत मातीत जीवंत राहू शकते. तसेच माती, पाणी, मानवी हस्तक्षेप, वाहतूक, जनावरे आणि यंत्र सामुग्रीच्या माध्यमातून पनामा बुरशीचा प्रादुर्भाव, प्रसार होऊ शकतो. त्यामुळेच या बुरशीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. आजघडीला तरी या बुरशीजन्य रोगावर कोणताही ठोस, प्रभावी उपाय सापडलेला नाही. भारतासह जगातील अनेक केळी उत्पादक देशांत या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

आणखी वाचा- विश्लेषण : टेस्ला पाण्यात, कोट्यधीश उद्योगपतीचा मृत्यू; गाडी खरंच सुरक्षित ठेवते?

केळी उत्पादनात भारत कुठे?

जगभरात दरवर्षी सुमारे ५१ ते ५५ लाख हेक्टरवर केळीची लागवड होते. २०२२मधील आकडेवारीनुसार जागतिक केळी उत्पादन १३५२ लाख टनांवर गेले आहे. भारत जागतिक केळी उत्पादनात अग्रेसर देश आहे. भारतात ३०५ लाख टन, चीनमध्ये १२० लाख टन, इंडोनेशियात ७३ लाख टन, ब्राझीलमध्ये ६८ लाख टन, इक्वेडोर ६६ लाख टन, फिलिपिन्समध्ये ६० लाख टन, ग्वाटेमालात ४३ लाख टन, ओंगोलात ४० लाख टन, टांझानिया ३४ लाख टन, कोलंबियात २९ लाख टन केळीचे उत्पादन होते. भारतातून युरोपसह आखाती आणि शेजारील देशांना केळींची निर्यात होते. जगभरात एक हजारांहून अधिक केळींच्या जाती आहेत. त्यापैकी भारतात बसराई, श्रीमंती, वेलची, सोनकेळी, लाल केळी, चक्रकेळी, कुन्नन, अमृतसागर, बोंथा, विरूपाक्षी, हरिसाल, सफेद वेलची, लाल वेलची, वामन केळी, ग्रोमिशेल, पिसांग लिलीन, जायंट गव्हर्नर, कॅव्हेन्डीशी, ग्रॅन्ड नैन, राजापुरी, बनकेळ, भुरकेळ, मुधेली, राजेळी आदी जातींच्या केळींची लागवड होते.

dattatray.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is fear of banana extinction over genetic variety developed in australia will be decisive print exp mrj