काहींच्या आरोग्याशी निगडित समस्या वगळता पाळी ही सर्व स्त्रियांना येते. हे एक निसर्ग चक्रच आहे. सृष्टीच्या मुळाशी असलेली सृजनता याच माध्यमातून प्रकट होते. म्हणूनच चातुर्मासात अवनीच्या सृजनतेचा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केला जाते. शेतकरी पेरणी करून या काळात नवीन उत्पादनाच्या प्रतीक्षेत असतो. म्हणजे एकूणच भारतीय संस्कृतीत स्त्रीरुपी शक्तीच्या सर्जनाच्या प्रक्रियेला विशेषच महत्त्व देण्यात आले आहे. मग ती सामान्य स्त्री असो की साक्षात जगन्माता महाकाली असो, या नैसर्गिक चक्राच्या पुर्तीशिवाय नवा जन्म, नवी उत्पत्ती नाही. कदाचित याचमुळे सर्जनाचे सोहळे साजरे करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत निर्माण झाली असावी. म्हणूनच ‘मानवमात्रांचा गर्भ वाहणारी स्त्री आणि वनस्पतींचा गर्भ वाहणारी पृथ्वी तसेच संपूर्ण जगाचा गर्भ वाहणारी जगन्माता यांच्यात आदिम काळापासून समानता कल्पिलेली आहे. किंबहुना आजही अनेक ठिकाणी साक्षात जगन्मातेच्या ऋतुस्नानाचे सोहळे मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. त्याच निमित्ताने अशा स्वरूपाचे सोहळे कुठे साजरे केले जातात, हे जाणून घेणे समयोचित ठरावे!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रजस्वलावस्था आणि सुफलन

पृथ्वीच्या किंवा जगन्मातेच्या सुफलनाची प्रक्रिया वर्णिताना तिच्यावर स्त्रीचे देहधर्म आरोपिले जातात. स्त्रीचे देहधर्म पृथ्वीच्या/ जगन्मातेच्या सर्जनशीलतेशी निगडित करण्याची परंपरा अनेक समूहांमध्ये आदिम काळापासून आढळते. ज्याप्रमाणे स्त्री ऋतुस्नान झाल्यावाचून, रजस्वलावस्था अनुभवल्यावाचून सुफलनक्षम होवू शकत नाही; त्याच प्रमाणे नवसृष्टीचा-जगाचा गर्भ वाचण्यापूर्वी स्त्रीप्रमाणे पृथ्वी-जगन्माता रजस्वला होते’ अशी धारणा आजही टिकून आहे (संदर्भ: लज्जागौरी- रा.चिं. ढेरे, २०१५).

आणखी वाचा : स्वातंत्र्य दिन विशेष: इंग्रजांविरोधात स्वातंत्र्य लढ्यात पहिला मानवी बॉम्ब वापरणारी राणी ‘वेलू नचियार’! 

आसामचे कामाख्या मंदिर

आसामचे कामाख्या मंदिर हे भारतातील शक्तिपीठांपैकी एक आहे. पौराणिक संदर्भानुसार सतीने आत्मदहन केल्यानंतर तिच्या योनीचा भाग या ठिकाणी गळून पडला, असे मानले जाते. या मंदिरातील देवी योनीरूपा आहे. आषाढ महिन्यात या मंदिरातील देवी रजस्वला होते. इतकेच नाही तर हा काळ या मंदिरात ‘अंबुवाची पर्व’ म्हणून साजरा केला जातो. या काळात तीन दिवस देवीच्या गर्भगृहाचे दरवाजे बंद असतात. त्या तीन दिवसांसाठी, भक्तांना मंदिराच्या आवारात बागकाम, स्वयंपाक, धार्मिक प्रथा किंवा पूजा न करण्याची सूचना देण्यात आली आहे. चौथ्या दिवशी मंदिराचे दरवाजे उघडले जातात. देवीचे स्नान पूजादी उपचार झाल्यानंतर भाविकांना देवीच्या दर्शनाची अनुमती देण्यात येते. किंबहुना देवीच्या प्रसादामध्ये रक्तवस्त्राचा तुकडा आशीर्वाद म्हणून देण्यात येतो. हा वस्त्रप्रसाद प्राप्त झाल्यावर मनोवांच्छित फळाचा लाभ होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. जरी हा सोहळा वर्षातून एकदा साजरा करण्यात येत असला, तरी प्रत्येक महिन्याला देवी रजस्वला होते अशी स्थानिक धारणा आहे.

काश्मीरमधील राज्ञीस्नापन

काश्मीर मध्ये पारंपरिकरित्या पाळण्यात येणारे एक व्रत म्हणजे राज्ञीस्नापन. राज्ञी ही येथे सूर्यपत्नी असल्याची धारणा रूढ आहे. परंतु देवीचे हे रूप भूमातेचेच आहे. हे व्रत चैत्र महिन्यात करण्यात येते. या व्रताचा कालावधी हा चार दिवसांचा असतो. नीलमतपुराणात या व्रताचे सविस्तर वर्णन करण्यात आलेले आहे. नीलमतपुराण हे काश्मीरच्या सांस्कृतिक परंपरांचे सविस्तर वर्णन करते. या व्रताच्या माहात्म्यानुसार ‘काश्मिरा भूमी’ ही तीन दिवसांसाठी रजस्वला होते. हे व्रत मुख्यतः स्त्रियांनी करावयाचे असते. या व्रतात कश्मीरा भूमीची मातीची मूर्ती करून पुजली जाते. चौथ्या दिवशी देवीला स्नान घालून गंध, पुष्प, धान्य, फळे, वस्रालंकारानी पूजा केली जाते.

आणखी वाचा : व्यथा नर्तिकेच्या आयुष्याची … कथा घुंगरांच्या सामर्थ्याची ! (भाग १)

चेंगन्नूर महादेवाचे मंदिर

चेंगन्नूर, केरळ येथे चेंगन्नूर महादेवाचे मंदिर एक प्रसिद्ध मंदिर आहे, हे देऊळ भगवान शिव आणि देवी भद्रकाली यांचे आहे. येथील भद्रकाली ही केरळ राज्याची मुख्य देवी मानली जाते. या देवळात भद्रकाली देवीचा ‘मासिक पाळी उत्सव’ साजरा साजरा करण्यात येतो आणि हे देऊळ देशभरात त्याच साठी प्रसिद्ध आहे. देवीच्या रजोकाळात हे मंदिर तीन दिवस बंद करण्यात येते. येथे देवीला अनियमित मासिक पाळी येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. एका पौराणिक कथेनुसार, शिव आणि पार्वती यांचा विवाह झाल्यानंतर ते या परिसरात आले होते, त्या दरम्यान देवी रजस्वला झाली होती. सुमारे २८ दिवस देवी रजस्वला होती, अशी स्थानिक मान्यता आहे.

या मंदिराशी निगडित दुसरी कथा अगस्त्य ऋषींशी संबंधित आहे. काही कारणास्तव, अगस्त्य ऋषी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह होताना पाहू शकले नाहीत. त्यामुळे या जोडप्याने ऋषींचे दर्शन घेण्याचे ठरवले. असे मानले जाते की, देवी पार्वती अगस्त्य ऋषींना भेटण्यासाठी जात असताना तिला मासिक पाळी आली. म्हणून, तिने ऋषींसमोर येवून आशीर्वाद देण्यापूर्वी मंदिराच्या ठिकाणी २८ दिवस वाट पाहिली. याखेरीज आणखी एक कथा सापडते ती म्हणजे, सतीने आत्मदहन केल्यानंतर तिच्या शरीराचा काही भाग या मंदिराच्या ठिकाणी पडला होता.

एके दिवशी येथील पुजारी देवीच्या मूर्तीचे आन्हिक उरकत असताना त्यांना रक्ताचे डाग दिसले आणि त्यांनी आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ स्त्रीशी संपर्क साधला आणि तिला हे दाखवले तेव्हा तिने पुष्टी केली की देवीला रक्तस्त्राव होत आहे. तेव्हापासून शहरात तीन दिवस मंदिर बंद ठेवून मूर्ती मंदिराच्या दुसऱ्या भागात नेण्याचा विधी सुरू झाला आहे. चौथ्या दिवशी, वाजतगाजत मिरवणूक काढली जाते ज्यामध्ये देवीची मूर्ती हत्तीवर बसविली जाते मीथरा नदीवर विधी स्नानासाठी नेली जाते. त्याच वेळी दुसऱ्या हत्तीवर भगवान शिवाची मूर्ती स्थापन केली जाते. देवीचे स्नान उरकल्यावर दोन्ही मूर्ती वाजतगाजत मंदिरात आणल्या जातात आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा केली जाते. या काळात भक्तगण देवीच्या रजस्वला कपड्याची उपासना करतात. यात सर्वात जास्त अपत्य उत्सुक जोडप्यांचा समावेश असतो. देवीला दर महिन्याला मासिक पाळी येत असे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तथापि, पुजारी अजूनही त्याच्या घरातील सर्वात ज्येष्ठ महिलेसह याची पुष्टी करण्याचा विधी पाळतात.

आणखी वाचा : विश्लेषण: प्राणी का ठरतात मानवी वासनेचे बळी? काय आहे झूफिलिया आणि बेस्टीयालीटी?

याशिवाय केरळ मध्ये ‘उछारल’ नावाचा उत्सव साजरा केला जातो. हा भगवतीच्या रजोत्सवाचा उत्सव आहे. यात घरातील धान्य कोठारे तीन दिवसासाठी बंद केली जातात. आणि चौथ्या दिवशी भगवतीचे स्नान उरकल्यावर धान्य कोठारे उघडली जातात. एकूणच या उत्सवातून भूमातेच्या ऋतूस्नानाचा उत्सव साजरा केला जातो.

भारतीय संस्कृतीत नेहमीच स्त्रीला देवतेसमान मानले जाते. किंबहुना स्त्री रुपी शक्तीच्या ऋतुस्नानाची आराधना केली जाते. असे असताना सामान्य स्त्रीला पाळी येणे आणि ती निषिद्ध मानणे यांसारख्या गैर समजुतींविषयी जनजागृती करण्याची निश्चितच आवश्यकता आहे!

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is goddess menstruation worship considered auspicious in indian culture kamakhya devi temple chengannur mahadeva temple svs