जवळपास १७ वर्षांपासून गाझा पट्टीमध्ये सत्ता असलेल्या हमासने इस्रायलवर अभूतपूर्व हल्ला चढवत शेकडो नागरिकांना ठार केले. दिवसाढवळ्या शेकडो नागरिकांचे अपहरण करण्यात आले. या नियोजनबद्ध कारवाईने इस्रायलसह जगाला धक्का दिला. आजवर गनिमी काव्याने लढणाऱ्या या गटाच्या युद्धतंत्रात काही बदल झाल्याचे दिसत आहे. त्याची क्षमता, धोरणे व युद्धशैलीची नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
‘हमास’ काय आहे?
‘हरकत अल-मुकावामा उल इस्मानिया’ म्हणजेच ‘हमास’ची स्थापना १९८७ साली गाझा पट्टीत झाली. मुस्लीम ब्रदरहुडची राजकीय शाखा म्हणून पुढे आलेला हा गट. ‘हमास’चा अर्थ इस्लामिक प्रतिकार चळवळ. अरबी भाषेत त्याचा अर्थ ‘उत्साह’ असा होतो. या गटाचे सुमारे ३६५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या गाझा पट्टीवर राजकीय नियंत्रण आहे. सुमारे २३ लाख लोकसंख्या असलेल्या या भागाची इस्रायलने आधीपासून पुरती कोंडी केली आहे. हमासला अथवा त्याच्या लष्करी विभागाला इस्रायल, अमेरिका, युरोपीय महासंघ, कॅनडा, इजिप्त आणि जपान आदींनी दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे.
हेही वाचा : विश्लेषण : तेलाचा भडका उडूनही इंधन दरवाढ का नाही?
हमासची उद्दिष्टे काय ?
इस्रायलने पॅलेस्टाइनच्या प्रदेशावर कब्जा केल्याच्या विरोधात पहिल्या इतिफादच्या सुरुवातीला हमास उदयास आला. सशस्त्र संघर्ष करण्यासाठी गटाने अल-दिन अल-कासम ब्रिगेड्स ही लष्करी शाखा तयार केली. इस्रायलचा नाश, पॅलेस्टाइनमध्ये इस्लामिक राष्ट्राची स्थापना, इस्रायलच्या कब्जातून पॅलेस्टिनी प्रदेश आणि पवित्र अल अक्सा मशिदीची मुक्तता ही हमासची उद्दिष्टे असून त्यासाठी हिंसाचाराचा आधार घेण्यात येतो. आजवर इस्रायली नागरिक, सैनिकांवर अनेक आत्मघाती हल्ले या संघटनेने केले आहेत. गाझातून हजारो क्षेपणास्त्रे इस्रायलवर डागण्यात येतात. मात्र गेल्या शनिवारी केलेला हल्ला अनेक अर्थांनी वेगळा, गनिमी काव्याचे तंत्र वापरून करण्यात आला.
हल्ल्यासाठी ही वेळ का निवडली ?
पॅलेस्टिनींसोबतच्या संघर्षात कुठल्याही अटी मान्य न करता, सवलती न देता इस्रायल अलीकडच्या काळात अरब देशांशी शांतता करार करत आहे. अमेरिकादेखील हमासच्या इराणी समर्थकांचा कडवा प्रतिस्पर्धी असलेल्या इस्रायल आणि सौदी अरेबियात करार घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. इस्रायलचे नवे अतिउजवे सरकार पॅलेस्टाइनच्या विरोधाला न जुमानता वेस्ट बँकमध्ये इस्रायली वसाहती विस्तारत आहेत. वेस्ट बँकमधील इस्रायलची कारवाई, वस्त्यांची बांधकामे यांना आंतरराष्ट्रीय समुदाय बेकायदेशीर मानतो, असे हमासचे नेते सांगतात. इस्रायली तुरुंगातील हजारो कैदी, गाझाची नाकाबंदी आणि इस्रायलचे करार- मदार मोडून काढण्यासाठी हमासने हा हल्ला केल्याचे मानले जाते. मात्र हल्ल्याचे सांगायचे कारण पॅलेस्टिनींंवर अनेक दशकांपासून होत असलेल्या अत्याचारांचा बदला, हे आहे.
हेही वाचा : निवडणूक रोख्यांविरोधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार, या योजनेला विरोध का होतो?
हमासचे नेते कोण आहेत?
पॅलेस्टिनी धर्मगुरू शेख अहमद यासिनने हमासची स्थापना केली. पक्षाघात झालेल्या यासिनला चाके असणाऱ्या खुर्चीचा (व्हिल चेअर) आधार घ्यावा लागत असे. त्याची बरीच वर्षे इस्रायलच्या तुरुंगात गेली. १९९३ मध्ये पहिल्या आत्मघाती हल्ला करणाऱ्या हमासच्या लष्करी शाखेचे त्याने निरीक्षण केले होते. २००४ मध्ये इस्रायली सैन्याने यासिनला ठार केल्यानंतर वर्षभरात हमासच्या अनेक नेत्यांना टिपले. यातून वाचलेला, निर्वासित हमास सदस्य खालेद मशाल गटाचा नेता बनला. गाझामधील येहिया सिनवार आणि निर्वासित इस्माइल हनीयेह हे हमासचे सध्याचे नेते आहेत. त्यांनी इराण आणि लेबनॉनच्या हेजबोलासह नव्याने समीकरणे मांडून नेतृत्व स्वीकारले. तेव्हापासून, गटाचे बरेच नेते बैरूतला स्थलांतरित झाल्याचे सांगितले जाते.
हमासचे सहयोगी, समर्थक कोण ?
इराण, सीरिया आणि लेबनॉनमधील हेजबाला या दहशतवादी गटांच्या टोळीचा हमास सदस्य आहे. इस्रायलच्या दिशेने झुकणाऱ्या अमेरिकेच्या धोरणांचा विरोध हे त्यांचे मुख्य सूत्र आहे. हमासनंतर इस्लामिक जिहाद हा या भागातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा सशस्त्र अतिरेकी गट आहे. अनेकदा हे गट इस्रायलविरोधात एकत्र येऊन कारवाया करतात. मात्र, काही मुद्द्यांवर त्यांच्यातही मतभेद झाल्याची उदाहरणे आहेत. गाझा पट्टीतील विविध सशस्त्र गटांमध्ये लष्करी हालचालींसाठी समन्वय साधण्यासाठी संयुक्त कार्यवाही कक्षही कार्यरत आहे.
हेही वाचा : जेरुसलेम: एका शहराच्या तीन कथा … ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम
युद्धतंत्राचे बदलते प्रवाह कसे आहेत ?
आधुनिक आयुधांनी सुसज्ज इस्रायली सैन्य, टेहळणी यंत्रणा आणि जोडीला मोसादसारखी गुप्तहेर संस्था यांच्याशी लढताना हमास युद्धशैलीत बदल करीत असल्याचे लक्षात येते. इस्रायलवरील हल्ल्यात हमासचे ४० हजार अतिरेकी सहभागी झाल्याचे सांगितले जाते. इस्रायलला नामोहरम करण्यासाठी या गटाने आजवर विविध मार्ग अवलंबले. त्यामध्ये आत्मघाती हल्ले, आग लावणारी उपकरणे वाहून नेणारे फुगे सोडणे, ग्लायडरच्या साहाय्याने शिरकाव आदींचा समावेश आहे. अनेकदा हे हल्ले लपून-छपून केले जात होते. यावेळी तंत्र बदलले आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डकडून मिळालेल्या प्रशिक्षणाच्या बळावर हमासने क्षेपणास्त्र निर्मितीची क्षमता प्राप्त केल्याचे सांगितले जाते. शनिवारी हजारो क्षेपणास्त्रे काही तासांमध्ये डागण्यात आली. यातील काही क्षेपणास्त्रांचा पल्ला तब्बल २५० किलोमीटरपर्यंत होता. महत्त्वाचे म्हणजे यावेळी हमासने मानवविरहित ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केल्याचेही समोर आले आहे. इस्रायल सीमेवरील तटबंदी जेसीबीने सुरुंग लावून फोडण्यात आली. एकाच वेळी हवेतून, जमिनीवरून इतकेच नव्हे तर, समुद्रमार्गेही इस्रायलमध्ये घुसखोरी झाली. या हल्ल्याने जगाला बसलेला धक्का हे हमासच्या मानसिक युद्धतंत्राचे फलित. हल्ल्यानंतर समाजमाध्यमांवरही सक्रिय होत हमासने घुसखोरी, रॉकेट्स हल्ले व इस्रायली नागरिकांचे अपहरण यांच्या दृष्यफिती प्रसृत केल्या. इस्रायलचे शक्तीशाली कॅमेरे व टेहेळणी यंत्रणेला या हल्ल्याने निष्प्रभ ठरवले. हमासची ही बदलती युद्धशैली इस्रायलसाठी आगामी काळात तापदायक ठरू शकते.