देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी इंग्रजीला पर्यायी भाषा म्हणून हिंदीचा वापर करण्याचं आवाहन देशवासीयांना केलं आणि पुन्हा एकदा भारतीयांची प्रादेशिक ओळख आणि त्यांच्या मातृभाषेला समान महत्त्व यावर जोरदार चर्चा सुरू झाली. ही चर्चा थेट भाषावार प्रांतरचनेपर्यंत म्हणजे ६० ते ७० वर्षांपूर्वीच्या संदर्भांपर्यंत पोहोचली. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, हे वास्तव अनेकदा अधोरेखित करून दाखवलं जाऊ लागलं. तसेच, स्थानिक भाषा किंवा मातृभाषा जगवण्यासाठी झालेल्या लढ्यांचे दाखले देखील दिले जाऊ लागले. पण सध्या भारताची नेमकी ‘भाषीय’ ओळख आहे तरी कोणती? किंवा कशी? कोणती भाषा किती लोकसंख्या किती प्रमाणात बोलते? आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या चर्चेमध्ये आपली मराठी कुठे आहे? सविस्तर जाणून घेऊयात…!
नेमक्या किती भारतीयांचा मातृभाषा हिंदी आहे?
२०११च्या भाषिक जनगणनेमध्ये राज्यघटनेत समाविष्य असलेल्या एकूण १२१ मातृभाषा आणि २२ भाषांसंदर्भातली आकडेवारी जमा करून मांडण्यात आली आहे. यानुसार हिंदी ही देशात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. संख्येत बोलायचं, तर तब्बल ५२ कोटी ८ लाखांहून अधिक आणि टक्केवारीत बोलायचं तर ४३.६ टक्के लोकसंख्येने हिंदी ही त्यांची मातृभाषा असल्याची माहिती दिली आहे. त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर बंगाली (९७ लाख/८ टक्के) आहे. बंगाली भाषेचं प्रमाण हे हिंदीच्या अवघं एक पंचमांश इतकं आहे!
किती भारतीय हिंदी बोलतात किंवा जाणतात?
हिंदी माहिती असणाऱ्या लोकांची आकडेवारी काढायची झाली, तर अर्धा देश त्यामध्ये समाविष्ट होतो! जवळपा १३.९ टक्के अर्थात लोकसंख्येच्या ११ टक्के भारतीयांनी हिंदी त्यांचा दुसरी भाषा असल्याचं नमूद केलं आहे. अर्थात एकूण ५५ टक्के भारतीयांसाठी हिंदी एकतर मातृभाषा तरी आहे किंवा दुसरी भाषा तरी आहे.
विश्लेषण : राजकीय पक्षांच्या देणग्यांमध्ये वाढ!
कसा झाला देशात हिंदीचा विस्तार?
खरंतर गेल्या कित्येक दशकांपासून हिंदी मातृभाषा असणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी राहिली आहे. प्रत्येक जनगणनेमध्ये ते दिसून येतं. १९७१मध्ये ३७ टक्के भारतीयांची मातृभाषा हिंदी होती. पुढच्या प्रत्येक जनगणनेत हे प्रमाण अनुक्रमे ३८.७ टक्के, ३९.२ टक्के, ४१ टक्के आणि ४३.६ टक्के असं वाढत गेलं आहे. मग हिंदीचा हिस्सा वाढत असताना कोणत्या भाषांचं प्रमाण घटत होतं? कुठेतरी ढीग साचला, की कुठेतरी खड्डा पडलेलाच असतो ना!
अनेक मातृभाषांची टक्केवारी घटताना दिसून आली आहे. काहींच्या बाबतीत अत्यल्प तर काहींमध्ये मोठ्या प्रमाणावर! बंगाली भाषेचा टक्का ७१ साली ८.१७ टक्के होता, तो २०११ साली फक्त ८.०३ टक्क्यांपर्यंत खाली आला. ही घट ०.१४ टक्के इतकीच होती. त्याउलट मल्याळम (१.१२ टक्के) आणि उर्दू (१.०३ टक्के) या दोन भाषांचा टक्का मोठ्या प्रमाणावर खाली आला. या मातृभाषा असणाऱ्यांचं प्रमाण किमान एक कोटींनी घटलं. याउलट पंजाबी भाषेचा टक्का मात्र या काळात २.५७ टक्क्यांवरून २.७४ टक्क्यांपर्यंत वाढला.
विश्लेषण : हिंदीचा वापर आणि राज्यांचा विरोध!
मराठीहून दुपटीनं वाढली हिंदी!
१९७१ ते २०११ या ४० वर्षांमध्ये मराठीहून दुपटीनं हिंदीची वाढ झाल्याचं दिसतंय. हिंदी मातृभाषा सांगणाऱ्या भारतीयांची संख्या या काळात २०.२ कोटींवरून ५२.८ कोटींपर्यंत पोहोचली. अर्थात तब्बल २.६ पटींनी ही वाढ झाली. ही वाढ पंजाबी, मैथिली, बंगाली, गुजराती आणि कन्नड या भाषांपेक्षा दुपटीहून जास्त होती, तर मराठी भाषेच्या वाढीच्या जवळपास दुप्पट होती.
हिंदीचा एवढा विस्तार होण्याची काय कारणं आहेत?
याचं साधं-सरळ कारण म्हणजे देशातल्या काही सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये हिंदी ही बहुसंख्य लोकांची मातृभाषा आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार अशा मोठ्या राज्यांचा समावेश आहे. पिपल्स लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया प्रकल्पाचे संचालक डॉ. गणेश देवी सांगतात, “याचं दुसरं महत्त्वाचं कारण हे देखील आहे ही अनेक मातृभाषांचा समावेश जनगणना करणाऱ्यांनी हिंदीमध्येच केला आहे!”
“२०११मध्ये लोकांनी एकूण १३८३ भाषा मातृभाषा म्हणून नमूद केल्या. याशिवाय शेकडो भाषा परीघाबाहेरच राहिल्या, ज्यांचा अंतर्भाव इतर अधिकृत भाषांमध्येच करून टाकण्यात आला. त्यामुळेच हिंदीमध्ये जवळपास ६५ मातृभाषांचा समावेश करण्यात आल्याचं दिसून येईल. ५ कोटी लोकांनी भोजपुरी मातृभाषा म्हणून नमूद केली आहे. पण भोजपुरीचा समावेस हिंदीमध्येच करण्यात आला आहे”, असं देवी म्हणाले.
…तर हिंदीचं प्रमाण ३८ कोटींच्याच घरात!
देवी म्हणतात, “जर हिंदीमध्ये अंतर्भूत केलेल्या इतर मातृभाषा वगळल्या तर हिंदी बोलणाऱ्यांचा एकूण आकडा ३८ कोटींच्याच घरात असेल.”
विश्लेषण : राजकीय अस्तित्वाची ‘मनसे’ लढाई…ठाण्यातील सभेमागे काय आहे रणनीती?
भारतीय भाषांच्या गर्दीत इंग्रजी कुठे?
इतक्या सगळ्या भारतीय भाषा, मातृभाषांमधूनही कार्यालयीन कामकाजासाठी इंग्रजीचा पुरस्कार केला जातो. हिंदीसोबतच इंग्रजी देखील आपली कार्यालयीन भाषा असली, तरी ती घटनेच्या ८व्या परिशिष्टात समाविष्ट २२ अधिकृत भाषांमध्ये मात्र नाही. या सूचीत नसलेल्या ९९ भाषांच्या यादीमध्ये इंग्रजी आहे. तर फक्त २.६ लाख भारतीयांनी इंग्रजी पहिली भाषा म्हणून नमूद केली आहे. पण असं असलं, तरी तब्बल ८.३ कोटी नागरिकांची ती दुसरी भाषा आहे. यामध्ये फक्त हिंदी (१३.९ कोटी) इंग्रजीच्या पुढे आहे.
महाराष्ट्रात ४० टक्के इंग्रजी भाषिक!
महाराष्ट्रात मराठीचा बोलबाला असला, तरी २.६ लाख इंग्रजी भाषिकांपैकी तब्बल १ लाख म्हणजे जवळपास ४० टक्के इंग्रजी भाषिक महाराष्ट्रात आहेत! पूर्वेकडच्या काही राज्यांमध्ये हिंदीऐवजी इंग्रजी ही प्रामुख्याने दुसरी भाषा म्हणून निवडली जाते. मणिपुरी, खासी, मिझो याशिवाय एओ, अंगामी, रेंगमा अशा नागालँडमधील स्थानिक भाषा, तसेच काश्मीरमधील २.६ लाख नागरिकांनी देखील इंग्रजी दुसरी भाषा म्हणून नमूद केली आहे. यात हिंदी तिसऱ्या किंवा चौथ्या भाषेच्या स्थानी आहे!