अमेरिकेतील ह्युस्टन विद्यापीठात हिंदू धर्मावरील अभ्यासक्रमाबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्याने आणि कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, हा अभ्यासक्रम ‘हिंदूफोबिक’ म्हणजेच हिंदूविरोधी आहे. विद्यार्थ्याच्या या आरोपांनंतर विद्यापीठाने या विषयाचा आढावा घेत असल्याचे सांगितले आहे. नेमके हे प्रकरण काय आहे? हिंदू धर्माविषयी अभ्यासक्रमात काय? त्यामुळे वाद का निर्माण झाला? त्याविषयी जाणून घेऊ.
हिंदू धर्माच्या अभ्यासक्रमाबाबतचा वाद काय?
या वादाची सुरुवात ह्युस्टन विद्यापीठाच्या ‘लिव्ह्ड हिंदू रिलिजन’ या अभ्यासक्रमावरून सुरू झाली आहे. हा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने चालवला जातो. अभ्यासक्रमात शिकवणी वर्गांमध्ये प्रत्येक आठवड्याला व्हिडीओ व्याख्याने टाकली जातात. ही व्याख्याने विद्यापीठातील प्राध्यापक आरोन मायकल उलरे देतात. विद्यापीठातील राज्यशास्त्राचे विद्यार्थी व कार्यकर्ते वसंत भट्ट यांनी कॉलेज ऑफ लिबरल आर्ट्स अँड सोशल सायन्सेसच्या अधिष्ठात्यांकडे या विषयावरून तक्रार दाखल केली आहे आणि शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाबाबत आक्षेप घेतला आहे.
‘इंडिया टुडे डिजिटल’शी वसंत भट्ट यांनी सांगितले, “प्राध्यापक उलरे यांच्या मते, हिंदू हा प्राचीन धर्म नसून, ती एक वसाहतवादी रचना, हिंदू राष्ट्रवादींनी वापरलेले एक राजकीय साधन आणि अल्पसंख्याकांवर अत्याचार करण्याची एक प्रणाली आहे.” वसंत भट्ट यांनी केलेली ही तक्रार अभ्यासक्रमातील साहित्याशी संबंधित आहे. या अभ्यासक्रमातील एका भागात ‘हिंदू’ या शब्दाचे वर्णन धर्मग्रंथांमध्ये आढळत नाही आणि ही आधुनिक संकल्पना आहे, असे करण्यात आले आहे. त्यावरच भट्ट यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
‘इंडिया टुडे डिजिटल’शी संवाद साधताना त्यांनी अभ्यासक्रमातील एका परिच्छेदाचादेखील उल्लेख केला आहे. “हिंदुत्व ही एक संज्ञा आहे. हिंदू धर्म हा भारताचा अधिकृत धर्म असावा, असे वाटणाऱ्या हिंदू राष्ट्रवादीकडून त्यांचा धर्म निश्चित करण्यासाठी आणि इतरांना म्हणजेच इस्लामला बदनाम करण्यासाठी त्याचा वापर करतात.” वसंत भट्ट पुढे दावा करीत म्हणाले, “हा अभ्यासक्रम शिकविणारे प्राध्यापक वारंवार असे सांगतात की, भारत एक हिंदू राष्ट्रवादी देश आहे, जो अल्पसंख्याकांवर सातत्याने अत्याचार करत आहे.” भट्ट यांनी असेही सांगितले की, याविषयी अधिष्ठात्यांचा प्रतिसाद असमाधानकारक होता.
“विभागाने तक्रारीची चौकशी करण्याऐवजी माझ्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि मला बदनाम करून मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला,” असे भट्ट यांनी स्पष्ट केले. परदेशस्थ हिंदूंसाठी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील व्यासपीठ ‘हिंदू ऑन कॅम्पस’नेही या अभ्यासक्रमावर टीका केली आहे.
या वादावर विद्यापीठाचा प्रतिसाद?
‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, ह्युस्टन विद्यापीठातील स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्सचे वरिष्ठ असोसिएट उपाध्यक्ष शॉन लिंडसे यांनी सांगितले की, उपस्थित केलेल्या प्रश्नांचा योग्य तो आढावा घेतला जात आहे. विद्यापीठाने आपल्या उत्तरात लिहिले, “ह्युस्टन विद्यापीठ शैक्षणिक स्वातंत्र्याचे समर्थन करते. मात्र, विशिष्ट प्राध्यापकांच्या व्याख्यानांवर विद्यापीठ देखरेख ठेवत नाही. अभ्यासक्रम शैक्षणिक मानकांची पूर्तता करतो, याची खात्री करण्यासाठी आम्ही संपूर्ण लक्ष अभ्यासक्रमावर केंद्रित करतो,” असे लिंडसे म्हणाले. “आम्ही या अभ्यासक्रमाविषयी उचलण्यात आलेल्या प्रश्नांनादेखील गांभीर्याने घेतो. आम्ही सध्या या विषयाची दखल घेतली आहे आणि आम्हाला चूक आढळून आल्यास आम्ही या समस्येचे निराकरणही करू,” असे त्यांनी सांगितले.
भारतीय अमेरिकन लोकप्रतिनिधींकडून ‘हिंदूफोबिया’चा निषेध
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतीय-अमेरिकन काँग्रेस (अमेरिकन संसद) सदस्य श्री ठाणेदार यांनी ‘हिंदूफोबिया’चा निषेध करणारा एक द्विपक्षीय ठराव मांडला होता. स्थलांतर वादविवादादरम्यान H1-B व्हिसा प्रणालीवरील तणाव वाढल्यानंतर त्यांनी हा ठराव मांडला. मुख्य बाब म्हणजे व्हिसा कार्यक्रम विदेशी व्यावसायिकांना अमेरिकेमध्ये काम करण्याची परवानगी देतो. श्री ठाणेदार यांनी वंशवादाच्या विरोधातही आवाज उठवला. “अमेरिकेत वंशवाद अजूनही जिवंत आहे आणि एकत्रितपणे त्याचा प्रतिकार करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी ‘एक्स’वर लिहिले.
पंतप्रधानांवर टीका
प्राध्यापकांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख हिंदू कट्टरपंथी असा केला. “पंतप्रधान मोदींना ‘हिंदू कट्टरपंथी’ म्हणणे आणि आपल्या परंपरेला राजकीय अजेंडासाठीचे साधन म्हणणे हिंदूफोबियाचे उघड कृत्य आहे,” असे एका सोशल मीडिया वापरकर्त्याने म्हटले. हिंदूफोबियाशी लढण्यासाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये ‘एक्स’वर एक अकाऊंट तयार करण्यात आले होते. ज्याला ‘हिंदू ऑन कॅम्पस’ असे नाव देण्यात आले. या अकाऊंटच्या पोस्टमध्ये लिहिण्यात आले, “या अभ्यासक्रमातील कोणत्याही दाव्याला पुराव्याचा आधार नाही.” पंतप्रधान मोदींवरील अभ्यासक्रमातील मजकूर वांशिक आणि धार्मिकदृष्ट्या भेदभावपूर्ण असल्याचे म्हटले.