– भक्ती बिसुरे

जागतिक आरोग्य संघटनेकडून जानेवारी महिन्याच्या अखेरीस प्रसिद्ध होऊ घातलेला जागतिक स्तरावरील करोना मृत्यूसंख्येबाबतचा अहवाल भारताकडून दडवण्यात येत असलेल्या करोना मृत्यूंच्या संख्येमुळे प्रलंबित राहिल्याचा दावा मध्यंतरी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने केला. त्यावर, माहिती संकलनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने निवडलेले गणितीय प्रारूप सदोष असल्याचे सांगत भारत सरकारने या वृत्ताचे खंडन केले आहे. या वादाचे स्वरूप काय आहे?

जागतिक आरोग्य संघटनेचा दावा काय?

विशेषतः २०२० ते २०२२ या काळात महासाथीने संपूर्ण जगाला वेठीस धरले. करोनातून धडे घेऊन अशा स्वरूपाच्या भविष्य काळातील आपत्तींना सामोरे जाण्यासाठी धोरण आखण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील करोना मृतांचा लेखाजोखा मांडणारा अहवाल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. याबाबतचा अहवाल संघटनेकडून जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. मात्र, भारताकडून मृतांची आकडेवारी पुरवण्यात होणाऱ्या दिरंगाईमुळे आपल्या अहवालास विलंब होत असल्याचा आरोप झाला आहे. भारतात तब्बल ५ लाख २० हजार करोना मृत्यू झाल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. मात्र, ही संख्या किमान आठ पट अधिक म्हणजे ४० लाखांपर्यंत असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आला आहे. जगभरातील करोना मृतांची संखयाही ६ कोटींऐवजी १५ कोटी असू शकेल, असे आरोग्य संघटनेला वाटते.  करोना मृत्यूंबाबत उपलब्ध असलेली सरकारी आकडेवारी, स्थानिक सर्वेक्षणांमधून मिळवण्यात आलेली माहिती, नोंद न झालेले मृत्यू, आरोग्य सेवासुविधांचा लाभ न मिळालेले करोना काळातील मृत्यू आणि अधिकृत माहिती देण्यास परवानगी नसलेल्या सूत्रांकडून मिळालेली माहिती यावर आधारित भारतातील करोना मृत्यूंची संख्या काही पटींनी अधिक असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटना करत आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

भारताचे मत काय?

जागतिक आरोग्य संघटनेने केलेले सर्व आरोप भारताकडून फेटाळण्यात आले आहेत. भारताने वेळोवेळी जागतिक आरोग्य संघटनेला हवी असलेली सर्व माहिती पुरवली असून कोणतीही लपवाछपवी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, मात्र जागतिक आरोग्य संघटनेने मृतांची आकडेवारी संकलित करण्यासाठी निश्चित केलेले गणितीय प्रारूप सदोष असल्याचे भारताने म्हटले आहे. हे गणितीय प्रारूप वर्ग एक (टिअर वन) देशांकडून प्राप्त झालेल्या माहितीवर आधारित आहे. तेच प्रारूप सर्व गटांतील देशांसाठी वापरणे योग्य नसल्याने भारताचा या प्रक्रियेवर आक्षेप असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भारताची चिंता काय?

माहिती संकलनासाठी वापरण्यात येणारे गणितीय प्रारूप आदर्श असल्यास येणारे निष्कर्ष कितीही धक्कादायक असले तरी ते स्वीकारण्यास आमची हरकत नसल्याचे भारताने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेबरोबर झालेल्या बैठकांमध्ये चीन, इराण, बांगलादेश, सीरिया, इथिओपिया आणि इजिप्त यांनी भारताच्या बरोबरीने या गणितीय प्रारूपाबाबत शंका व्यक्त केल्या आहेत. लहान देशांमधील माहितीवर आधारित गणितीय प्रारूप भारतासारख्या भौगोलिक आकारमान आणि लोकसंख्येच्या दृष्टीने प्रचंड असलेल्या देशाला कसे लागू पडणार असा सवालही भारताकडून उपस्थित करण्यात आला आहे. टिअर वन आणि टिअर टू देशांसाठी जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या गणितीय प्रारूपांचा वापर करून भारतातील मृत्यूसंख्येचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला असता दोन टोकांचे निष्कर्ष मिळत असून ते दिशाभूल करणारे असल्याचे भारताने ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्ताचे खंडन करताना म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल कशासाठी?

महासाथीच्या काळात जगभरामध्ये किती करोना मृत्यू झाले, याबाबतची नोंद ही जागतिक आरोग्य संघटनेच्या विश्वासार्हतेसाठी महत्त्वाची असल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे. करोनासारख्या मोठ्या संभाव्य आपत्तींना भविष्यात तोंड द्यायचे असेल तर त्यासाठी विश्लेषण करणे आवश्यक आहे. लसीकरणासारख्या प्रतिबंधात्मक उपायांचा होणारा उपयोग पडताळून पाहण्यासाठीही असा सविस्तर अहवाल तयार करणे गरजेचे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात येत आहे. करोनाचे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम अभ्यासणे, त्या दृष्टीने दीर्घकालीन स्थानिक ते जागतिक धोरण तयार करणे यासाठी असा अहवाल महत्त्वाचा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. 

इतर देशांबाबत मौन का?

करोनामुळे दगावलेल्या रुग्णसंख्येची काटेकोर नोंद न ठेवणारा भारत हा एकमेव देश नाही. इंडोनेशिया, इजिप्तसारख्या काही देशांमध्येही करोना मृतांची संख्या नोंदवण्यात दिरंगाई झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. अमेरिका, जर्मनी, फ्रान्ससारख्या देशांनी जागतिक आरोग्य संघटनेकडे नोंदवलेल्या मृत्यूसंख्येतही काही त्रुटी आढळून आल्या आहेत. भविष्यकालीन महामारीसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी धोरण निर्मितीचे महत्त्व जाणून भारत जागतिक आरोग्य संघटनेला सहकार्य करण्यास तयार आहे. त्याच उद्देशाने भारताने संघटनेच्या गणितीय प्रारूपाचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समितीची नियुक्ती करुन पुढाकारही घेतला. मात्र, भारतावर मृत्यूसंख्या लपवण्याचा थेट आरोप करणारे न्यूयॉर्क टाइम्ससारखे प्रकाशन इतर अनेक देशांनी माहिती पुरवण्यात केलेली टाळाटाळ किंवा त्रुटींकडे डोळेझाक का करत आहे, असा सवालही भारताकडून उपस्थित करण्यात आला आहे.

Story img Loader