भारताकडे जगातील सर्वात मोठे कार्यबल आहे. परंतु, देशात वेळेपेक्षा जास्त काम करणाऱ्यांना जास्त महत्त्व दिले जाते. आरोग्यावर याचा नकारात्मक प्रभाव असूनही, जास्तीत जास्त कामाचे तास वाढवण्याची इच्छा मोठमोठ्या व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. अशा प्रस्तावांना केंद्रानेही आता प्रतिसाद दिला आहे. कामाचे तास वाढवण्यासंदर्भात सरकारचे म्हणणे काय? ७० ते ९० तासांचा कामाचा आठवडा वाढवला जाऊ शकतो का? कामाच्या तासावरून सुरू झालेला वाद काय? त्याविषयी जाणून घेऊ.
कामाच्या तासासंदर्भात सरकारचे म्हणणे काय?
सोमवारी सरकारने लोकसभेत एका लेखी उत्तरात संसदेत सांगितले की, ते जास्तीत जास्त कामकाजाचे तास वाढवण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर विचार करत नाहीत. कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे म्हणाल्या, “आठवड्यातील कमाल कामाचे तास ७० किंवा ९० तासांपर्यंत वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही.” आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलओ)नुसार सध्या देशातील सरासरी कामाचे तास दर आठवड्याला ४६.७ आहेत. त्यांनी सभागृहाला सांगितले की, कामगार हा समवर्ती सूची अंतर्गत विषय असल्याने, कामगार कायद्यांची अंमलबजावणी राज्य सरकारे आणि केंद्र सरकार त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रात करतात.
कामगारांचे संरक्षण करण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी न्याय्य वागणूक सुनिश्चित करण्यासाठी कामगार कायदे तयार केले गेले आहेत. केंद्रीय क्षेत्रात असताना अंमलबजावणी केंद्रीय औद्योगिक संबंध यंत्रणा (CIRM) च्या तपासणी अधिकाऱ्यांमार्फत केली जाते, राज्यांमध्ये त्यांच्या कामगार अंमलबजावणी यंत्रणांद्वारे याचे कामकाज सुनिश्चित केले जाते, असे त्या पुढे म्हणाल्या. विद्यमान कामगार कायद्यांनुसार, कामाचे तास आणि ओव्हरटाईम यासह कामाच्या परिस्थितीचे नियमन कारखाना अधिनियम, १९४८ आणि संबंधित राज्य सरकारांच्या दुकाने आणि आस्थापना कायद्याच्या तरतुदींद्वारे केले जाते.
कामाच्या तासावरून सुरू झालेला वाद काय?
देशात कामाच्या तासाचा कालावधी अधिक आहे. आठवड्यांपूर्वी, लार्सन अँड टुब्रो लिमिटेड (एल अँड टी)चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रह्मण्यम यांच्या विधानावरून सोशल मीडियावर वादविवाद सुरू झाला. कर्मचाऱ्यांनी घरी बसण्याऐवजी रविवारसह आठवड्यातून ९० तास काम करावे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्याने इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी ७० तासांच्या कामाच्या आठवड्याच्या सूचनेचा पुनरुच्चार केला. परंतु, सुब्रह्मण्यम यांच्यावर व्यापारी समुदायातील त्यांच्या समवयस्कांकडून टीका करण्यात आली. ‘आरपीजी’ समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका म्हणाले की, कामाचे जास्त तास ही बर्नआउटची कृती आहे. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही कामात किती वेळ घालवण्यापेक्षा कामाचा दर्जा आणि उत्पादकता यावर भर दिला पाहिजे, असे वक्तव्य केले.
ड्युओलिंगोचे सह-संस्थापक सेवेरिन हॅकर म्हणाले, “तुम्ही वर्षानुवर्षे आठवड्यातून ८० तास काम करू शकता यावर माझा विश्वास नाही. मला वाटतं हे बर्नआउट आहे, त्यामुळे आपल्याला कधीतरी कमी काम करावे लागेल आणि मला वाटते ती योग्य गोष्ट आहे. तुम्हाला एक शाश्वत कंपनी तयार करायची असेल, तुम्हाला एक शाश्वत कार्यसंस्कृती तयार करायची असेल, तर आठवड्यातून ४० ते ५० तासांचा कालावधी योग्य आहे.” त्याचप्रमाणे, आयटीसी लिमिटेडचे अध्यक्ष संजीव पुरी यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांचे काम चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी सक्षम करणे हे कामाच्या कालावधीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. ‘इंडिया टुडे’च्या मते, कामाच्या तणावामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये एका तरुण अर्न्स्ट आणि यंग इंडिया सल्लागाराचा कामाशी संबंधित दबावामुळे निधन झाले. या घटनेने देशभरात कामाच्या तासांवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली.
अतिकाम मानसिक आरोग्यासाठी हानिकारक?
शुक्रवारी (३१ जानेवारी) जारी करण्यात आलेल्या अर्थसंकल्पपूर्व आर्थिक सर्वेक्षणात जास्त कामाच्या तासांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम अधोरेखित झाले. डेस्कवर जास्त वेळ घालवणे मानसिक आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. पेगा एफ नफ्राडी बी (२०२१) आणि ए सिस्टेमॅटिक यांच्या निष्कर्षांचा उल्लेख करून सर्वेक्षणात म्हटले आहे की, कामावर घालवलेले आठवड्याचे तास ५५ ते ६० पेक्षा जास्त असल्यास आरोग्यावरील प्रतिकूल परिणामांचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. “ज्या व्यक्ती डेस्कवर १२ किंवा त्यापेक्षा जास्त तास घालवतात त्यांच्या मानसिक पातळीवर परिणाम होतो, ” असे त्यात नमूद करण्यात आले आहे. तणावग्रस्त व्यवस्थापन संबंध आणि कंपनीचा अभिमान नसल्यामुळे कामातील रस कमी होऊ शकतो. तसेच, देशाची वाढ आणि विकासदेखील निरोगी कार्य संस्कृती आणि जीवनशैली निवडींवर अवलंबून आहे.
जगभरातील कार्य संस्कृती
आर्थिक सर्वेक्षणानुसार, सरासरी साप्ताहिक कामकाजाच्या तासांच्या बाबतीत भारत हा जर्मनी, व्हिएतनाम आणि ब्रिटनच्या बरोबरीने ४८ तासांच्या सर्वोच्च पातळीवर आहे. सरासरी ४५ साप्ताहिक कामकाजाच्या तासांसह, मलेशिया दुसऱ्या स्थानावर आणि सिंगापूर तिसऱ्या स्थानावर आहे. सिंगापूरमध्ये दर आठवड्याला सरासरी ४४ तासांच्या कामाचा कालावधी आहे. सर्वेक्षणानुसार, अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान आणि इंडोनेशिया दर आठवड्याला ४० तास काम करतात. कामाचे तास हा अनेक देशांमध्ये आवडीचा विषय ठरत आहे. अनेक विकसित देश, जसे की ब्रिटन आणि जर्मनी, चार दिवसांच्या वर्क वीकचा प्रयोग करत आहेत. चीनमध्ये ९९६ अशी कार्यसंस्कृती संकल्पना प्रसिद्ध आहे. तिथे कामाच्या आणि जीवनाच्या संतुलनावरही वादविवाद होतो. ९९६ ची संकल्पना आठवड्यातून सहा दिवस सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेचे वर्णन करते.