लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम गेली दोन ते तीन दशके चर्चेत आहे. पाश्चिमात्य देश, अमेरिका, इस्रायल या देशांचा इराणच्या अण्वस्त्रनिर्मितीला विरोध आहे. यात विशेष करून इस्रायलचा विरोध तीव्र आहे. इस्रायल कुठल्याही प्रकारचा धोका शेजारी तयार होऊ देत नाही, असा या देशाचा इतिहास सांगतो. त्यामुळे इराणचा अण्वस्त्रकार्यक्रम पश्चिम आशियामधील स्फोटक प्रश्न आहे. इराणबरोबर अणुकरार करून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, नंतर अमेरिका बाहेर पडल्याने ही समस्या मुळातून सुटली नाही. अमेरिकेसह पाश्चिमात्य देश इराणच्या महत्त्वाकांक्षेला रोखू शकतात का, हे आता पाहावे लागेल.

अण्वस्त्रांचा पल्ला युरोपर्यंत?

इराण गोपनीयरीत्या अण्वस्त्रे बनवत आहे. युरोपपर्यंत अण्वस्त्रे जातील, इतकी त्यांची क्षमता असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ‘नॅशनल काउन्सिल ऑफ रेझिस्टन्स ऑफ इराण’ने (एनसीआरआय) याबाबत नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात ही माहिती उघड झाली. या अहवालानुसार, उपग्रह प्रक्षेपक सुविधा यंत्रणेच्या नावाखाली असलेल्या दोन स्वतंत्र ठिकाणी अण्वस्त्रे विकसित होत आहेत. या केंद्रांवर इराण अणुकार्यक्रम वेगाने पुढे रेटत असल्याचा दावा ‘एनसीआरआय’ने केला आहे. इराण विकसित करीत असलेली क्षेपणास्त्रे ३ हजार किलोमीटरपर्यंत मारा करणारी असतील, असा अंदाज आहे. हा पल्ला युरोपलाही लक्ष्य करणारा आहे.

अत्याधुनिक क्षेपणास्त्रावर अण्वस्त्रे

या अहवालाचा आधार घेऊन अमेरिकेतील एका दैनिकाने शाहरुद या ठिकाणी अण्वस्त्रे विकसित केली जात असल्याचा दावा केला आहे. इराणची आधुनिक संरक्षण संशोधन संघटना संबंधित केंद्र चालवते. या ठिकाणी तयार केले जात असलेले अण्वस्त्र घाईम-१०० क्षेपणास्त्रावर बसविले जाईल. असे झाल्यास हे क्षेपणास्त्र ग्रीसपर्यंत मारा करू शकेल. शाहरुद येथील केंद्रावर इराणने यापूर्वीच रॉकेट प्रक्षेपणाची चाचणी किमान तीन वेळा केली आहे. उपग्रह प्रक्षेपणाच्या नावाखाली ही बाब लपवून ठेवली गेल्याचा दावा ‘एनसीआरआय’ने केला आहे. येत्या काळात आणखी आधुनिक अशी क्षेपणास्त्रे विकसित होण्याचा अंदाज आहे.

दुसरे अण्वस्त्र केंद्र भूमिगत

इराण सिमोर्घ क्षेपणास्त्र विकसित करीत असून, सेमनान या शहराच्या आग्नेयेकडे ४३ मैलावर दुसऱ्या अण्वस्त्रकेंद्राची तयारी सुरू आहे. उत्तर कोरियाने दिलेल्या रचनेनुसार हे केंद्र विकसित करण्यात येत आहे. हे केंद्र भूमिगत असल्याचा दावा ‘एनसीआरआय’ने केला आहे. या ठिकाणी इराण २००५ पासून अण्वस्त्रनिर्मितीची क्षमता वाढवीत असल्याचा आरोपही अहवालात करण्यात आला आहे. अवकाश कार्यक्रमाच्या नावाखाली तेथे अण्वस्त्रनिर्मिती केंद्र विकसित करण्यात येत असल्याचा आरोप ‘एनसीआरआय’ने केला आहे.

आंतरराष्ट्रीय समुदायाला चकवा

इराण सातत्याने आंतरराष्ट्रीय समुदायाला चकवा देण्यात यशस्वी झाला असून, जैसे थे परिस्थिती इराणने कायम ठेवली आहे. अण्वस्त्रांबाबतीतील आपले उद्दिष्ट याद्वारे पूर्ण करण्याचा इराणचा मानस आहे. इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर इराणची अण्वस्त्रक्षमता उद्ध्वस्त करण्याची संधी पाश्चिमात्यांना होती. इराणकडे आता इतकी क्षमता नाही. पण, दुर्क्षक्ष केले, तर इराण मोठी क्षमता प्राप्त करू शकेल, असे मत एका तज्ज्ञांनी व्यक्त केले.

खामेनींवर फतवा रद्द करण्यासाठी दबाव ?

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी ऑक्टोबर २००३ मध्ये अण्वस्त्रे बनविण्यास बंदी घालण्याचा फतवा जारी केला. या फतव्याचा आधार इराणने अणुकार्यक्रमाला ज्या वेळी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून विरोध होतो, त्या वेळी घेतला आहे. हा फतवा रद्द करण्याचा दबाव इराणच्या लष्कराने खामेनी यांच्यावर घातल्याचे नुकतेच समोर येत आहे. असे झाल्यास पश्चिम आशियातील तणाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.

पुढे काय ?

पश्चिम आशियातील तणाव निवळण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे. इराणकडे अण्वस्त्रे असणे, हे इस्रायलसाठी जितके घातक आहे, तितकेच इराणच्या अस्तित्वासाठी ते महत्त्वाचे आहे, अशी इराणची भावना आहे. दोन टोकाच्या महत्त्वाकांक्षेचा मध्य काढून या समस्येला वाट करून द्यायला हवी. इराण अणुकरार हा एक त्यातील उत्तम प्रयत्न होता. पण, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिका पुन्हा अशा करारामध्ये पुढाकार घेण्याची शक्यता वाटत नाही. नजीकच्या काळात येथील तणाव वाढण्याचीच शक्यता आहे.