सियाचिन या हिमाच्छादित क्षेत्रात कर्तव्य बजावताना बुलढाण्यातील अक्षय गवते या २२ वर्षांच्या अग्निवीराचे हृदयविकाराने निधन झाले. जगातील सर्वांत उंच युद्धभूमीवर अतिशय प्रतिकूल वातावरण, कठीण परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीने आजवर अनेक अधिकारी-जवानांचा मृत्यू झाला आहे. सीमेवर शहीद झालेले अक्षय गवते हे पहिलेच अग्निवीर. प्रशिक्षणानंतर अक्षय यांची पहिलीच नियुक्ती थेट सियाचिनमध्ये झाली होती. या घटनेमुळे अग्निपथ योजनेतील जलद प्रशिक्षण आणि प्रत्यक्षात सीमेवरील आव्हाने, हा विषय ऐरणीवर आला आहे.
अक्षय गवते यांच्याकडे कोणती जबाबदारी होती?
अग्निपथ या नव्या योजनेअंतर्गत भरती झालेले अक्षय गवते हे सैन्यदलात दूरध्वनी यंत्रचालक (टेलिफोन ऑपरेटर) म्हणून कार्यरत होते. अग्निवीरांसाठी चार वर्षांचा सेवाकाळ निश्चित आहे. लष्करी सेवेची वर्षपूर्ती होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. प्रशिक्षणानंतर अक्षय यांची नियुक्ती लष्कराच्या लेहस्थित १४ कोअरमध्ये झाली होती. हा कोअर फायर ॲण्ड फ्युरी या टोपण नावाने ओळखला जातो. या कोअरअंतर्गत सियाचिन ब्रिगेड काम करते.
हेही वाचा : विश्लेषण : नाराज पंकजा वेगळा निर्णय घेणार काय? भाजपला मतपेढीची चिंता!
सियाचिन युद्धभूमी कशी आहे?
काराकोरम पर्वत रांगेतील भारताच्या ताब्यात असलेला अतिशय महत्त्वाचा प्रदेश म्हणजे सियाचिन. सियाचिन हिमनदी ७६ किलोमीटर परिसरात पसरली आहे. तब्बल २३ हजार फूट उंचीवर भारत-पाकिस्तानचे सैन्य तैनात आहे. अतिउंचावरील क्षेत्रात हवाई मार्ग वगळता दळणवळणाची अन्य व्यवस्था नाही. लष्कराची हेलिकॉप्टर्स रसद पुरवठ्याचे काम करतात. हिवाळ्यातील सलग काही महिने सियाचिनचा जगाशी संपर्क तुटतो. पाकिस्तानला चीनपासून वेगळा करणारा हा परिसर आहे. पाकव्याप्त काश्मीरला तो चीनशी थेट जोडण्यापासून प्रतिबंधित करतो. यामुळे सामरिकदृष्ट्या भारतासाठी हा भाग महत्त्वाचा आहे. पाकिस्तानातील गिलगिट आणि बाल्टिस्तान प्रदेशाबरोबर चीनच्या हालचालींवर तिथून नजर ठेवता येते. या भागात रस्ते बांधणीचा कार्यक्रम सीमा रस्ता संघटनेने (बीआरओ) हाती घेतला आहे. सैन्य व शस्त्रास्त्रांच्या जलद हालचालीसाठी ते उपयोगी ठरतील. त्यांच्या बांधणीत नवीन पद्धत व तंत्रज्ञान वापरले जात आहे.
हेही वाचा : विश्लेषण : रब्बी शेतीमालाचा हमीभाव समाधानकारक?
उंच ठिकाणांवरील आव्हाने कोणती?
जम्मू-काश्मीर, लेह, लडाखमध्ये नऊ ते २३ हजार फूट उंचीवर सीमावर्ती भागात भारतीय लष्कराच्या चौक्या आहेत. सहा वर्षांपूर्वी हिमकडा कोसळून १५ जवानांचा मृत्यू झाला होता. सियाचिनमध्ये तापमान उणे ५५ अंशापर्यंत घसरते. हिमस्खलनाचा धोका, वेगवान वारे आणि प्राणघातक उंची यामुळे जीवन जगणे जिकिरीचे ठरते. प्रतिकूल वातावरण आणि नैसर्गिक संकटांच्या सावटात जवानाच्या शारीरिक क्षमतेची कसोटी लागते. या वातावरणात थकवा आणि हृदयविकाराने आजवर अनेक अधिकारी-जवानांचा मृत्यू झाला आहे. लष्करी जवानांना पाककडून होणारी आगळीक व घुसखोरांना प्रतिबंध घालण्याबरोबर नैसर्गिक आपत्तीशीही झुंजावे लागते. तीव्र थंडी व उंचीमुळे वैद्यकीय समस्या उद्भवतात. फुफ्फुसाला सूज, तीव्र थकवा, बर्फांधळेपणा, कार्बन मोनॉक्साईड विषबाधा, गारठ्यात शरीरातील तापमानाचे संतुलन बिघडणे अशा समस्या असतात.
हेही वाचा : ओलिस ठेवलेल्यांचा ठावठिकाणा अद्याप का लागला नाही? इस्रायली लष्कराकडून काय प्रयत्न केले जात आहेत?
पूर्वतयारी, उपाययोजना कोणत्या?
उंचावरील ठिकाणी तैनातीआधी प्रत्येक तुकडीची वैद्यकीय तपासणी केली जाते. विरळ हवामान आणि बर्फवृष्टीत तग धरण्याची क्षमता जोखली जाते. नंतर त्यांना प्रशिक्षण देऊन खालील भागातील (नियोजित उंचीपेक्षा कमी उंचीवरील ) तळावर काही दिवस ठेवले जाते. वातावरणाशी एकरूप झाल्यानंतर ते उंच क्षेत्रात जातात. तत्पूर्वी ‘सियाचिन बॅटल स्कूल’मध्ये बर्फवृष्टीत तग धरण्याची क्षमता, बर्फाच्या भिंतीवरील चढाई, हिमवादळे आणि हिमकडा कोसळण्याच्या दुर्घटनेतील बचाव आणि जगण्याची कवायत यासाठी आवश्यक सक्षमता आणण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. ते यशस्वी करणाऱ्या तुकडीची उंच ठिकाणावर नियुक्ती होते. हवामानाची पूर्वसूचना देऊन गस्तीची वेळ कधीकधी बदलली जाते. हिमवादळामुळे कधीकधी गस्तीचा नियमित मार्ग चुकतो. धोकादायक ठरू शकणाऱ्या मार्गाऐवजी पर्यायी सुरक्षित गस्ती मार्गाचा वापर करावा लागतो. चौकीत कार्यरत जवानांची विशिष्ट काळाने लष्करी तळाकडून अदलाबदली होते. हिवाळ्यात ही प्रक्रिया बंद असते. या स्थितीत आपली चौकी सांभाळणे व गस्त घालण्याचे काम जवान करतात. कितीही खबरदारी बाळगली तरी अकस्मात कोसळणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो.
हेही वाचा : ‘घोस्ट पार्टिकल’चा शोध घेण्यासाठी चीन तयार करतोय समुद्रातील सर्वांत मोठी दुर्बीण, जाणून घ्या सविस्तर
जवानांच्या प्रशिक्षण कालावधीत फरक पडला का?
अग्निपथ योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ३१ आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यात प्रथम १० आठवडे मूलभूत लष्करी आणि पुढील २१ आठवड्यांच्या प्रगत प्रशिक्षणाचा अंतर्भाव आहे. पहाटे साडेपाच वाजता सुरू होणारा प्रशिक्षणार्थींचा दिवस रात्री १० वाजता संपतो. शारीरिक तंदुरुस्ती, गोळीबार, विविध शस्त्रे हाताळणे, माहिती-तंत्रज्ञान आणि इंग्रजी भाषा प्रशिक्षण यावर भर दिला जातो. सायबर सुरक्षा, दिशादर्शन, लढाऊ रणनीती, नियोजन, अंमलबजावणी याचे शिक्षण दिले जाते. शस्त्रास्त्र सरावासाठी आभासी पद्धतीने सराव करता येणाऱ्या सिम्युलेटरचा मुख्यत्वे वापर केला जातो. पूर्वी सैन्याची जी नियमित भरती प्रक्रिया होती, त्यात निवडलेल्या प्रशिक्षणार्थींना जवळपास वर्षभराचे प्रशिक्षण दिले जात असे. अग्निपथ योजनेत प्रशिक्षण कालावधीत निम्म्याने कपात झाली. म्हणजे एकप्रकारे अल्पावधीत अग्निवीरांना जलद प्रशिक्षण दिले जात आहे. उत्तुंग क्षेत्रात तैनात करताना अग्निवीरांच्या शारीरिक क्षमतेचे वैद्यकीय मूल्यमापन झाले की नाही, संबंधितांना सियाचिन बॅटल स्कूलमध्ये प्रशिक्षण मिळाले होते का, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.