पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांच्या मनात हाच प्रश्न वारंवार डोके वर काढतोय तो म्हणजे जम्मू-काश्मीरला प्रवास करणे आता आणि यापुढे सुरक्षित असेल का? २२ एप्रिलला झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. लष्कर-ए-तैयबाची शाखा रेझिन्सटन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. २०१८ पासून तेजीत असलेल्या जम्मू-काश्मीर पर्यटन उद्योग हल्ल्यानंतर ठप्प झाला आहे. त्याशिवाय अमेरिका आणि ब्रिटनने नागरिकांना जम्मू-काश्मीरला प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे.
‘बिझनेस टुडे’नुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षात केंद्रशासित प्रदेशातीत दरडोई उत्पन्न एक लाख ५४ हजार ७०३ रुपये होते आणि आतापर्यंतचा हा सर्वोच्च आकडा आहे. २०२३-२४ आर्थिक वर्षात एक लाख ३९ हजार ८७९ रुपयांवरून हा आकडा १०.६ टक्क्यांनी वाढला होता. २०२४-२५ मध्ये काश्मीरचे सकल राज्य देशांतर्गत उत्पादन (जीएसडीपी) २.६५ लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज होता. जीएसडीपीमध्ये ७.०६ टक्के वाढ होण्याचा अंदाज होता. २०२५ मध्ये झालेला हा पहिला दहशतवादी हल्ला होता. २०२४ मध्ये २६ दहशतवादी घटना घडल्या आणि २०२३ मध्ये २७ घटना घडल्या. २०२२ मध्ये १०७ दहशतवादी घटना घडल्या आणि २०१८ मध्ये २२८ दहशतवादी घटना घडल्या आहेत.
गेल्या काही वर्षांत काश्मीर पर्यटनाची भरभराट कशी झाली?
आर्थिक सर्वेक्षणानुसार, २०२४ मध्ये २.३५ कोटी पर्यटक आले. हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा आकडा होता. त्यापैकी ६५ हजार ४५२ पर्यटक परदेशी होते. २०२३ मध्ये २.११ कोटी पर्यटक काश्मीरमध्ये आले. त्यामध्ये ५५ हजार ३३७ परदेशी पर्यटक होते. पर्यटन हा काश्मीरच्या अर्थव्यवस्थेतला प्रमुख घटक आहे. काश्मीरच्या जीएसडीपीच्या सात ते आठ टक्के एवढा मोठा हा उद्योग आहे.
सरकारला पुढच्या चार ते पाच वर्षांत जीएसडीपीमध्ये पर्यटनाच्या वाट्यात १५ टक्क्यांपर्यंत वाढ करायची आहे. अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. जम्मू-काश्मीरच्या नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारशाचा फायदा पर्यटन विकासासाठी होतो. त्यामुळे असंख्य रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि आर्थिक वाढीला चालना मिळू शकते, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. बिझनेस टुडेनुसार, २०२५ च्या हंगामाची सुरुवात जोरदार झाली होती. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीतच श्रीनगरच्या ट्युलिप गार्डनमध्ये आठ लाख १४ हजार पर्यटकांनी हजेरी लावली होती. मात्र, या हल्ल्यानंतर हॉटेलपासून हस्तकलेच्या व्यवसायावरही संकट आलं आहे. “आम्हाला कायमचे दोषी ठरवले आहे. मला वाटत नाही की, हा उद्योग आता सावरेल”, असे एका हॉटेलमालकाने माध्यमांना सांगितले.
हॉटेल व्यावसायिक अर्शद अहमद यांनी सांगितले, “माझ्या सर्व २० खोल्या पुढील महिन्यासाठी बुक झाल्या होत्या. पण एका रात्रीतच सर्व काही बदललं. हल्ला झाल्यानंतर काही दिवसांतच माझे सर्व ग्राहक निघून गेले. ते प्रचंड दु:खात, काळजीत आणि घाबरलेले होते”. “दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. आम्ही नेहमीच पर्यटकांची काळजी घेतो आणि या उंच पर्वतांमध्ये त्यांचा आधार ठरतो”, असे पोनी रायडर नौशाद यांनी सांगितले.
हजारो पर्यटकांनी सोडले काश्मीर
“मी २१ एप्रिलला काश्मीरमध्ये आलो होतो आणि २८ तारखेपर्यंत राहण्याचं नियोजन होतं. पण आता घाबरून आम्ही हरयाणाला घरी परत जात आहे”, असे एका पर्यटकाने माध्यमांना सांगितले. ४० वर्षीय गुलजार अहमद वाणी हे टॅक्सीचालक आहेत. खोऱ्याच्या काही अंतरावरील वेगवेगळ्या ठिकाणांहून ते पहलगाम येथे पर्यटकांना सोडतात. “जे घडलं आहे, ते नुकत्याच तयार केलेल्या अन्नात विषाची बाटली ओतण्यासारखं आहे,” असे वाणी पुढे म्हणाले. “हा पर्यटनाचा हंगाम होता आणि आम्हाला या वर्षी ही गती कायम ठेवण्याची व चांगली कमाई करण्याची संधी होती”, असेही ते म्हणाले.
अमेरिका व इतर देशांचे नागरिकांना आवाहन
अमेरिका आणि ब्रिटनने आपल्या नागरिकांना काश्मीरला प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. केंद्रशासित प्रदेशात दहशतवादी हल्ले आणि संभाव्य हिंसक नागरी अशांतता यांमुळे अमेरिकेने गुरुवारी ट्रॅव्हल अॅडव्हायझरी संदेश जारी केला आहे. “जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात दहशतवादी हल्ले आणि हिंसक नागरी अशांतता शक्य आहे. या राज्यात प्रवास करू नका. या भागांत तुरळक हिंसाचार घडतो. काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर, गुलमर्ग व पहलगाम या पर्यटनस्थळांमध्येही हे घडते, असे त्या अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अमेरिकन नागरिकांसाठीच्या प्रवास सल्लागार संदेशात म्हटले आहे. तसेच भारत-पाकिस्तान सीमेपासून १० किलोमीटरच्या आवारात जाणे टाळण्याचे आवाहनही त्यांनी आपल्या नागरिकांना केले आहे. युक्रेननेही अशाच प्रकारचे सल्लागार संदेश जारी केले आहेत.
दरम्यान, विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी आवाज उठवणाऱ्या पनुन काश्मीर या संघटनेने गुरुवारी केंद्राला काश्मीरसाठी प्रवासी सल्लागार संदेश जारी करण्याची विनंती केली. खोऱ्यातील परिस्थिती सामान्य नाही आणि पर्यटकांना विशेषतः हिंदूंना इथे गंभीर धोका आहे. “काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामुळे इतरांना हा स्पष्ट संदेश गेला आहे की, काश्मीर खोरे पर्यटक आणि रहिवाशांसाठी असुरक्षित आहे”, असे पनुन काश्मीरचे अध्यक्ष अजय चुरंगू म्हणाले. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती कधी सुधारेल याबाबत काहीच अंदाज वर्तवता येत नाही.