गेल्या काही महिन्यांत, शेअर बाजारात बरीच अस्थिरता निर्माण झाली आहे, ज्याचा परिणाम सर्व प्रकारच्या क्षेत्रांसह म्युच्युअल फंडांवर झाला. गेल्या ५ महिन्यांच्या कालावधीत निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी अनुक्रमे १४ टक्के आणि १६ टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे बीएसई स्मॉलकॅप आणि बीएसई मिडकॅप निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली आहे. त्यातील काही कंपन्यांचे समभाग ५० टक्क्यांहून अधिक घसरले आहे. मात्र या मागचे कारण काय? या पडझडीत खरेदी करावे का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्मॉलकॅप, मिडकॅपमध्ये किती घसरण?

व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे बीएसई स्मॉलकॅप आणि बीएसई मिडकॅपसारखे निर्देशांकांना सर्वाधिक झळ बसली आहे. ते अनुक्रमे २५ टक्के आणि २२ टक्क्यांहून अधिक घसरले. मार्च २०२० मध्ये करोना काळानंतर स्मॉलकॅप आणि मिडकॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये झालेली सर्वात मोठी घसरण आहे, ज्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. सध्या सर्व गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ लाल रंगात रंगले आहेत. स्मॉलकॅप आणि मिडकॅपसंबंधित फंडांनी देखील बऱ्याच कालावधीनंतर आता नकारात्मक परतावा बघितला आहे. फेब्रुवारी महिन्यात त्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा मारा झाल्याने बाजारात निराशेचे वातावरण होते. सरलेल्या फेब्रुवारी महिन्यात बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक १४ टक्के घसरला. करोनाच्या महासाथीच्या काळानंतर ही पहिलीच दुहेरी अंकी घसरण आहे. तर निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांकात १०.८ टक्क्यांची घसरण झाली आहे.

नेमकी घसरण किती?

बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकातील ९३८ कंपन्यांच्या समभागांपैकी, केवळ एका महिन्यात ३२१ कंपन्यांचे समभाग २० टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. यामध्ये वक्रांगी, झेन टेक्नॉलॉजीज, ओरिएंटल रेल इन्फ्रा आणि सुरतवाला बिझनेस ग्रुप हे समभाग प्रत्येकी ४० ते ६६ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. यातील घसरण अधिक वाढत चालली आहे. २४३ स्मॉलकॅप कंपन्यांच्या समभागांनी त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून निम्म्याहून अधिक मूल्य गमावले आहे, ज्यामुळे अनेक गुंतवणूकदार गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात नफ्यात असून देखील नफावसुली न केल्याने आता त्या नफ्याचे रूपांतर मोठ्या तोट्यात झाले आहे.

घसरणीची कारणे नेमकी काय?

भांडवली बाजारात परदेशी संस्थात्मक गुतंवणूकदारांनी अविरत समभाग विक्रीचा मारा सुरू ठेवला आहे. याबरोबर जागतिक स्तरावरील चिंता, राजकीय अनिश्चितता आणि कमकुवत बाजारभाव यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना अधिक नकारात्मक बनल्या आहेत. अनेक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण कायम असल्याने मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये आणखी पडझड होण्याची भीती सतावते आहे. करोनापासून स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअरसाठी फेब्रुवारीचा सर्वांत वाईट महिना ठरला. स्मॉलकॅप, मिडकॅप कंपन्यांचे महागडे मूल्यांकनदेखील कारणीभूत ठरले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर २०२४ मध्ये आलेल्या तुफान तेजीमुळे अनेक स्मॉलकॅप आणि मिडकॅप कंपन्यांच्या समभागांनी ५२ आठवडयातील उच्चांकी पातळीपासून निम्मे मूल्य गमावले आहे. 

वाढीव मूल्यांकन

स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांच्या वाढलेल्या मूल्यांकनांबद्दल कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजचे प्रतीक गुप्ता यांनी इशारा दिला आहे. गेल्या काही सत्रात भांडवली बाजारात वाढ होऊनही स्मॉलकॅप आणि मिडकॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये सुधारणा निदर्शनास आलेली नाही. कारण मूल्यांकन पुरेसे खाली आले नसून ते वाजवी पातळीवर आले नसल्याचे गुप्ता यांचे म्हणणे आहे.

मागणीतील मंदी

तीव्र जागतिक मंदी, अनियमित मान्सून, शेतीचे घटलेले उत्पन्न, बांधकाम क्षेत्रातील कमी झालेली मागणी यामुळे एकंदर देशांतर्गत मागणी कमी झाली असून अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे. बहुतेक म्युच्युअल फंड घराणे, विमा आणि पीएमएस फंडांनी मंदी दिसत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. मात्र बाजारात म्युच्युअल फंड आणि इतर माध्यमातून एकूण निव्वळ प्रवाह चालूच आहे. मात्र गुंतवणूक प्रवाहाचे स्वरूप बदलले असून स्मॉल/मिडकॅप किंवा थीमॅटिक/सेक्टोरल फंडांमधून गुंतवणूक आता लार्ज-कॅप किंवा संतुलित डेट-इक्विटी फंडांकडे वळली आहे.

आणखी कोणते घटक?

सरलेल्या डिसेंबर तिमाही आणि त्याआधीच्या सप्टेंबर तिमाहीमध्ये स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांना मोठा फटका बसला. मात्र विद्यमान कॅलेंडर वर्ष २०२५ मध्ये स्मॉलकॅप आणि मिडकॅप कंपन्यांच्या कमाईमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काळात स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांचे समभाग सावरण्याची शक्यता आहे, असे क्वेस्ट इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार सिंघल यांनी नमूद केले. गुंतवणूकदारांनी  मजबूत ताळेबंद आणि शाश्वत वाढ असलेल्या दर्जेदार व्यवसायांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

समभाग खरेदी करावी का?

ऐतिहासिक कल बघता स्मॉलकॅप कंपन्यांची कामगिरी येत्या काळात सुधारण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दशकांमध्ये, मजबूत पुनरागमन होण्यापूर्वी बुल मार्केटमध्ये अर्थात तेजीच्या काळाआधी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक २५ टक्के ते ३० टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. शिवाय टेक्निकल चार्टनुसार, म्हणजेच ऐतिहासिक आकडेवारीनुसार स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक सध्या कदाचित तळाशी पोहोचल्याचे दिसते आहे, असे मत आयसीआयसीआय डायरेक्टचे टेक्निकल रिसर्च प्रमुख धर्मेश शाह यांनी व्यक्त केले. शहा गुंतवणूकदारांना सध्याच्या बाजारभावानुसार दर्जेदार मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देतात, कारण त्यांना येत्या तीन महिन्यांत संभाव्य तेजीची अपेक्षा आहे. बाजार तज्ज्ञ निश्चल माहेश्वरी यांच्या मते, गुंतवणूकदारांनी मिड आणि स्मॉलकॅप कंपन्यांचे समभाग स्वस्त झाले म्हणून आंधळेपणाने खरेदी करू नये तर त्याऐवजी वाजवी मूल्यांकन असलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावे. चांगली कामगिरी असणाऱ्या क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभागांची खरेदी करावी. निवडक कंपन्यांचे म्हणजेच ज्यांचा व्यवसाय मंदीचा काळात देखील चांगली कामगिरी करत असेल, अशाच कंपन्यांची निवड आवश्यक आहे.