सूर्यकुमार यादव आणि त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील अपयश हे आता एक न उलगडणारे कोडे बनत चालले आहे. मुंबईकर सूर्यकुमारची ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना केली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ट्वेन्टी-२० क्रमवारीत तो अग्रस्थानी विराजमान आहे. मात्र याच सूर्यकुमारला एकदिवसीय क्रिकेटमध्ये यशाने हुलकावणी दिली आहे. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात सूर्यकुमारला सातत्याने संधी मिळूनही फारशी छाप पाडता आली नाही. परंतु ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवताना सूर्यकुमारने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात उत्कृष्ट खेळी केली. त्यामुळे आता सूर्यकुमारने केवळ ट्वेन्टी-२० या क्रिकेटच्या लघुतम प्रारूपावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूर्यकुमारला एकदिवसीय विश्वचषकात सामने खेळण्याची संधी कशी मिळाली?

सूर्यकुमारला एकदिवसीय क्रिकेटमध्ये वारंवार अपयश येत असूनही संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवला व विश्वचषकासाठी त्याला भारतीय संघात स्थान दिले. वैविध्यपूर्ण फटके मारण्याची क्षमता आणि आक्रमक शैलीत फलंदाजी करून गोलंदाजांवर दडपण टाकण्याची कला अवगत असल्याचा सूर्यकुमारला फायदा झाला. मात्र १५ खेळाडूंमध्ये निवड झाली असली, तरी सर्व खेळाडू तंदुरुस्त आणि उपलब्ध असल्यास सूर्यकुमारला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळणार नाही, हे अपेक्षित होते. सुरुवातीला तसेच झाले. मात्र चौथ्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध आपल्याच गोलंदाजीवर चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात तारांकित अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या पायाला दुखापत झाली. तो विश्वचषकाबाहेर गेला आणि भारताला अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल करावा लागला. त्यामुळे विश्वचषकातील उर्वरित सामन्यांत सूर्यकुमारला संधी मिळाली.

हेही वाचा : विश्लेषण : टोमॅटोची पुन्हा दरवाढ; का आणि किती दिवस?

विश्वचषकातील कामगिरीमुळे सूर्यकुमारवर टीका का झाली?

विश्वचषकात आघाडीच्या फळीतील फलंदाज दमदार कामगिरी करत असल्याने सूर्यकुमारला बहुतांश सामन्यांत फारसे चेंडू खेळायला मिळाले नाहीत आणि जेव्हा मिळाले, तेव्हा एका सामन्याचा अपवाद वगळता त्याने निराशाच केली. लखनऊ येथे आव्हानात्मक खेळपट्टीवर सूर्यकुमारने इंग्लंडविरुद्ध ४७ चेंडूंत ४९ धावांची बहुमूल्य खेळी केली होती. त्यामुळे भारताला हा सामना जिंकण्यास मदत झाली होती. परंतु या सामन्याचा अपवाद वगळता सूर्यकुमार अपयशीच ठरला. त्याला सात सामन्यांत १७.६६च्या सरासरीने केवळ १०६ धावाच करता आल्या. विशेषत: अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जागतिक दर्जाच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळताना त्याचा कस लागला. त्याला २८ चेंडूंत केवळ १८ धावाच करता आल्या. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली.

ट्वेन्टी-२० मध्ये सर्वोत्तम फलंदाजांत गणना का होते?

एकदिवसीय विश्वचषकातील सात सामन्यांत मिळून १०५ चेंडूंत १०६ धावा करणाऱ्या सूर्यकुमारने त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात ४२ चेंडूंत ८० धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख गोलंदाजांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असली, तरी सूर्यकुमारच्या या खेळीची गुणवत्ता कमी होत नाही. त्याने नेहमीप्रमाणे मागील दिशेला फटके मारलेच, शिवाय समोरील दिशेलाही त्याने फटकेबाजी केली. टोलेबाजीची क्षमता आणि सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे सूर्यकुमारची ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होते. क्रिकेटच्या या प्रारूपात त्याने अनेकदा भारताला आणि ‘आयपीएल’मध्ये मुंबई इंडियन्सला सामने जिंकवले आहेत.

हेही वाचा : विश्लेषण: समूह विद्यापीठे म्हणजे काय?

ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरीत इतकी तफावत का?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमारने ५४ ट्वेन्टी-२० सामन्यांत ४६.८५ च्या सरासरी आणि १७३.३७ च्या स्ट्राइक रेटने १९२१ धावा केल्या आहेत. यात तीन शतके आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने केवळ ३१ सामन्यांत १००० ट्वेन्टी-२० धावांचा पल्ला गाठला होता. याउलट एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३७ सामन्यांत त्याच्या नावे केवळ ७७३ धावा आहेत. त्याने या धावा केवळ २५.७६ च्या सरासरीने केल्या आहेत आणि त्याला चारच अर्धशतके करता आली आहेत. ट्वेन्टी-२० च्या तुलनेत एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजाकडे डाव उभारण्यासाठी बराच वेळ असतो. त्यामुळे फलंदाजाला आपल्या मानसिकतेत आणि खेळण्याच्या शैलीत कमी-अधिक प्रमाणात बदल करावा लागतो. गोलंदाज लयीत असल्यास त्याला सन्मान देऊन वाईट चेंडूची वाट पाहणे, संयम राखणे गरजेचे असते. यात सूर्यकुमार अपयशी ठरतो आहे. भारतीय संघाने वारंवार संधी देऊनही त्याला एकदिवसीय क्रिकेटशी जुळवून घेता आलेले नाही. त्यामुळे भारतीय संघाने आता सहाव्या-सातव्या क्रमांकासाठी अन्य फलंदाजांचा विचार करणे गरजेचे झाले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is it time for suryakumar yadav to focus only on t20 cricket reasons of his failure in odi cricket print exp css