अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार असो की माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या … दोन्ही प्रकरणामध्ये लॉरेन्स बिष्णोई टोळीचे नाव चर्चेत आहे. दोन्ही प्रकरणांनंतर समाजमाध्यमांवरून या टोळीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पंजाब, राजस्थान आणि हरियाणामध्ये सक्रिय असलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीने कॅनडामध्येही पसारा वाढवला आहे. ही टोळी आता देशात इतरत्रही पाय पसरवण्याच्या तयारीत आहे का, हा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे. हा लॉरेन्स बिष्णोई कोण इतक्या अव्याहतपणे तुरुंगात राहूनही सूत्रे कशी हलवतो, याविषयी…

बाबा सिद्दिकी हत्येमागे बिष्णोई टोळी?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकींवर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई टोळीने घेतल्याची चर्चा आहे. लॉरेन्स बिष्णोईने हत्येची जबाबदारी घेतल्याचा एक संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित झाला होता. सिद्दिकी हे दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख त्या संदेशात करण्यात आला आहे. ‘जो दाऊदला मदत करणार, त्याचा हिशोब आम्ही करणार’, अशा आशयाचा मजकूर त्या संदेशांत आहे. हिंदी भाषेतील त्या मजकुरात सलमान खानचाही उल्लेख करण्यात आला आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येचे कारण अनुज थापनचा मृत्यू, दाऊद, बॉलिवूड, राजकारण आणि मालमत्ता विक्री याच्याशी जोडण्यात आला आहे. आमचे कोणाशीही वैर नाही. पण जो कोणी सलमान खान आणि दाऊदच्या टोळीची मदत करेल, त्याचा आम्ही हिशोब नक्की करू, असा इशाराही त्यातून देण्यात आला आहे. संदेशाच्या सत्यतेची मुंबई पोलीस पडताळणी करत आहेत.

आणखी वाचा-ब्लड प्रेशर तपासताना हात कसा ठेवावा? बीपी तपासण्याची योग्य पद्धत काय?

सिद्धू मुसेवाला हत्येतही हात…

प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येच्या प्रकरणातही लॉरेन्स बिष्णोईचा सहभाग होता. त्या २०२२ मध्ये घडलेल्या प्रकरणानंतर बिष्णोई टोळी चर्चेत आली होती. या हत्येत राज्यातील संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ यांचीही नावे चर्चेत होती. पंजाबमधील गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा कॅनडास्थित साथीदार गोल्डी ब्रार याने सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. या हत्येनंतर बिष्णोई टोळी प्रथम देशपातळीवर चर्चेत आली.

कोण आहे लॉरेन्स बिष्णोई?

लॉरेन्स बिष्णोईचा जन्म पंजाबमधील उच्चभ्रू कुटुंबात झाला आहे. अबोहर इथल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये त्याने शिक्षण घेतले. त्याचे आई-वडील लविंदर आणि सुनिता सुरुवातीपासूनच श्रीमंत होते. त्यांची वडिलोपार्जित शेकडो एकर जमीन आहे. तसेच लॉरेन्सचे कुटुंबिय पदावर कार्यरत आहेत. लविंदर हे पोलीस हवालदार पदावर कार्यरत होते. त्याच्या वडिलांना त्याला पोलीस अधिकारी करायचे होते. पण लॉरेन्सने वेगळा मार्ग निवडला. महाविद्यालयात असतानाच त्याने विद्यार्थी संघटना स्थापन केली होती. त्या माध्यमातून पुढे त्याने टोळी उभी केली. चंडीगडमध्ये शिक्षणासाठी गेल्यावर लॉरेन्सचा गुन्हेगारी क्षेत्रात शिरकाव झाला. त्याच्या नावावर अनेक गुन्हे नोंद आहेत.

आणखी वाचा-अणुबॉम्बचा स्फोट होतो तेव्हा नक्की काय होते? आण्विक स्फोटाचे परिणाम किती भीषण असतात?

लॉरेन्स टोळी कुठे कार्यरत आहे?

लॉरेन्सविरोधात पंजाब, दिल्ली, राजस्थान येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. भरतपूर कारागृहानंतर त्याला दिल्लीच्या तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. पण तेथूनही त्याच्या कारवाया सुरूच आहेत. दुसरीकडे या टोळीची सध्या देशभर चर्चा सुरू असल्यामुळे त्या टोळीचे नाव वापरून धमकावण्याचे प्रकारही सुरू असल्याचेही सांगितले जाते. जगातील विविध देशांत त्यांचे हस्तक आहेत. या टोळीचा सध्याचा म्होरक्या अनमोल बिष्णोई अमेरिका, कॅनडामधून टोळीची सूत्रे हाताळत होता, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली होती.

सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार…

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सलमान खान याच्या वांद्र्यातील घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्याप्रकरणी कुख्यात लॉरेन्स बिष्णोईसह त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई आणि इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. १४ एप्रिल रोजी, सलमानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल यांना गुजरातमधून अटक केली होती. त्यांना पिस्तुल पुरवल्याप्रकरणी सोनू सुभाषचंदर बिष्णोई (३७) व अनुज थापन (३२) यांना पंजाब येथून अटक करण्यात आली होती.

बिष्णोई टोळीकडून दोन्ही आरोपींना दोन पिस्तुले व ४० काडतुसे पुरवण्यात आली होती. ती पिस्तुले देण्यासाठी चंदर व थापन १५ मार्च रोजी पनवेलला आले होते. ते पनवेलमध्ये तीन तास थांबले होते. त्यावेळी त्यांनी सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विक्की गुप्ता व सागर पाल यांना पिस्तुल दिले होते. या प्रकरणातील आरोपी अनुज थापन याने काही दिवसांपूर्वीच पोलीस कोठडीत आत्महत्या केली. त्याशिवाय टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिष्णोई व त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई यांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले होते. या प्रकरणात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी अनमोल बिष्णोईविरोधात ‘लुक-आऊट सर्क्युलर’ जारी करण्यात आले होते.