इंग्लिश प्रीमियर लीग ही जगातील सर्वांत लोकप्रिय आणि जिंकण्यासाठी सर्वांत अवघड अशी स्थानिक फुटबॉल स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेतील कोणताही संघ अन्य कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो असे म्हटले जाते आणि वर्षानुवर्षे हे सिद्धही झाले आहे. मात्र, पेप गार्डियोला यांनी २०१६ मध्ये मँचेस्टर सिटीच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यापासून इंग्लिश फुटबॉलमध्ये केवळ याच संघाची मक्तेदारी दिसून आली आहे. गार्डियोला यांच्या मार्गदर्शनाखाली मँचेस्टर सिटीने गेल्या आठपैकी सहा हंगामांत प्रीमियर लीगचा करंडक उंचावला आहे. इतकेच काय तर प्रीमियर लीगमध्ये सलग चार जेतेपदे मिळवणारा सिटी हा पहिलाच संघ ठरला आहे.
सिटीच्या या यशाचे ऐतिहासिक महत्त्व काय?
ॲलेक्स फर्ग्युसन यांच्या मार्गदर्शनाखाली मँचेस्टर युनायटेडच्या संघाने यापूर्वी प्रीमियर लीगवर वर्चस्व गाजवले होते. फर्ग्युसन यांच्या मँचेस्टर युनायटेडने १९९२-९३ ते २०१२-१३ या दोन दशकांमध्ये तब्बल १३ वेळा प्रीमियर लीगच्या करंडकावर आपले नाव कोरले होते. मात्र, त्यांना कधीही सलग चार वेळा प्रीमियर लीगचा करंडक उंचावता आला नाही. गार्डियोला यांच्या मँचेस्टर सिटीने संघाने मात्र ही अलौकिक कामगिरी करून दाखवली. गेल्या चार हंगामांमध्ये लिव्हरपूल आणि आर्सेनल यांसारख्या संघांनी सिटीसमोर आव्हान उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरच्या टप्प्यात आपला खेळ उंचावत सिटीने प्रत्येक वेळी जेतेपदावर मोहोर उमटवली आहे.
हेही वाचा >>>मान्सून आला हे नक्की कसे समजते? मान्सून ऑनसेट म्हणजे काय? जाणून घ्या…
यंदाच्या हंगामात सिटीची कामगिरी कशी?
मँचेस्टर सिटीने गेल्या हंगामात प्रीमियर लीग, चॅम्पियन्स लीग आणि एफए चषक अशा तीन मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे साहजिकच यंदाच्या हंगामातही प्रीमियर लीगमध्ये जेतेपदासाठी सिटीलाच प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र, सिटीच्या संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. या हंगामात बराच काळ आधी लिव्हरपूल, मग आर्सेनलने गुणतालिकेत अग्रस्थान राखले होते. मात्र, हंगामातील सात सामने शिल्लक असताना आर्सेनलला ॲस्टन व्हिलाकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला. त्याच दिवशी लिव्हरपूलच्या संघाने क्रिस्टल पॅलेसविरुद्धचा सामना ०-१ असा गमावला. सिटीने मात्र ल्युटन टाऊनला ५-१ अशा फरकाने पराभूत करत अग्रस्थानाच्या दिशेने कूच केले. त्यानंतरचे सर्व सामने जिंकताना आपले सलग चौथे प्रीमियर लीग जेतेपद निश्चित केले. विशेष म्हणजे, सिटीच्या संघाने प्रीमियर लीगमध्ये ७ डिसेंबर २०२३ नंतर एकही सामना गमावला नाही. त्यांनी २४ सामने अपराजित राहताना, त्यातही १९ सामने जिंकताना प्रतिस्पर्ध्यांना पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. सिटीने एकूण ३८ सामन्यांत ९१ गुणांसह जेतेपद पटकावले, तर आर्सेनलला ८९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. सिटी आणि आर्सेनलने समान २८ सामने जिंकले, पण आर्सेनलला दोन सामने अधिक गमावल्याचा फटका बसला.
गेल्या काही हंगामांतील कामगिरी खास का?
ॲलेक्स फर्ग्युसन यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी एका मुलाखतीत मँचेस्टर सिटीला ‘नॉयझी नेबर्स’ असे संबोधले होते. सिटीचा संघ मैदानावर मँचेस्टर युनायटेडला लढा देऊच शकत नाही असे त्यांना दर्शवायचे होते. १८८० पासून अस्तित्वात असलेल्या मँचेस्टर सिटी संघाला १३० वर्षांत (२०१० सालापर्यंत) ‘इंग्लिश फर्स्ट डिव्हिजन’ किंवा प्रीमियर लीगचे जेतेपद केवळ दोन वेळा मिळवता आले होते. मात्र, २००८ मध्ये ‘अबू धाबी युनायटेडने’ समूहाने मँचेस्टर सिटी संघाची मालकी मिळवली आणि या संघाचे रुपडेच पालटले. या समूहाने जगभरातील नामांकित खेळाडूंना मोठ्या किमतीत खरेदी करण्याची तयारी दर्शवली. तसेच रॉबर्टो मॅनचिनी, मॅन्युएल पेलाग्रिनी आणि गार्डियोला अशा आघाडीच्या प्रशिक्षकांना एकामागून एक नेमले. परिणामी मँचेस्टर सिटीने इंग्लिश फुटबॉलवर वर्चस्व गाजवले. सिटीच्या संघाने २०११-१२ च्या हंगामापासून तब्बल आठ वेळा प्रीमियर लीगचे जेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे, फर्ग्युसन २०१३ साली निवृत्त झाल्यापासून मँचेस्टर युनायटेडला कधीही प्रीमियर लीगचा करंडक उंचावता आलेला नाही.
पेप गार्डियोला यांचे वेगळेपण कशात?
मँचेस्टर सिटीशी जोडले जाण्यापूर्वीच गार्डियोला यांची फुटबॉलमधील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकांमध्ये गणना केली जायची. स्पेनचे माजी मध्यरक्षक असलेल्या गार्डियोला यांनी बार्सिलोना आणि बायर्न म्युनिक या नामांकित संघांचे प्रशिक्षकपद अतिशय यशस्वीरीत्या भूषवले होते. असे असले तरी, प्रीमियर लीग सर्वांत आव्हानात्मक स्थानिक फुटबॉल स्पर्धा मानली जात असल्याने गार्डियोला यांना यात यश मिळवणे सोपे जाणार नाही असे मत मांडण्यात येत होते. मात्र, त्यांनी आपल्याला हवी त्याप्रमाणे संघाची बांधणी केली आणि दुसऱ्याच वर्षी (२०१८-१८मध्ये) प्रीमियर लीगचे जेतेपद पटकावले. त्यांना संघमालकांकडूनही पूर्ण पाठिंबा मिळाला. जे खेळाडू आपल्या खेळण्याच्या शैलीला साजेसा नाहीत त्यांना विकून नवे खेळाडू खरेदी करण्याची गार्डियोला यांची मागणी संघमालकांनी पूर्ण केली. परिणामी गार्डियोला यांच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात सिटीने सहा वेळा प्रीमियर लीगचे जेतेपद मिळवले. तसेच सिटीची चॅम्पियन्स लीग जेतेपदाची प्रतीक्षाही गार्डियोला यांनी संपवली. त्यामुळे गार्डियोला यांनी आपले वेगळेपण पुन्हा अधोरेखित केले आहे. तसेच फर्ग्युनस, आर्सेनलचे माजी प्रशिक्षक आर्सन वेंगर, चेल्सीचे माजी प्रशिक्षक जोसे मौरिनियो आदी नामांकितांना मागे टाकत प्रीमियर लीग इतिहासातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून ओळखले जाण्यासाठीही त्यांनी आपली दावेदारी भक्कम केली आहे.