आज ५ मे. साम्यवादी विश्वक्रांतीचे पुरस्कर्ते, समाजशास्त्रज्ञ आणि परिवर्तनशील विचारवंत कार्ल मार्क्स याची २०५ वी जयंती. आज मार्क्सवाद कुठे दिसतो ? मार्क्सवाद आहे का ? अशा अनेक प्रश्नांवर ऊहापोह होत आहे. अशा वेळी आपण सर्व अजूनही कुठे ना कुठे मार्क्सवादीच आहोत, असे आज म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. आजच्या काळातील मार्क्सवादावर जाणून घेऊ या…

कोण होता कार्ल मार्क्स ?
५ मे १८१८ मध्ये जर्मनीमध्ये कार्ल मार्क्सचा जन्म झाला. कार्ल मार्क्स याची खास ओळख म्हणजे जर्मन अर्थशास्त्रज्ञ, साम्यवादी, समाजवादी नेते, परिवर्तनावर विश्वास असणारा तत्त्वज्ञ. अनेक विषयांवर कार्ल मार्क्स याने लिखाण केले असले तरी वर्गसंघर्षावर केलेले त्याचे लिखाण प्रचंड गाजले. फ्रेडरिक एन्जेल्स (Friedrich Engels) प्रमाणे मार्क्सनेदेखील तत्कालीन राजकीय लढ्यांमध्ये भाग घेतला. कार्ल मार्क्स याने ‘दास कॅपिटल’ या ग्रंथाचा पहिला खंड इ.स. १८६७ मध्ये प्रसिद्ध केला. कार्ल मार्क्स याच्या विचारांची लोकप्रियता सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर कमी झाली असली तरी ते विचार शिक्षण क्षेत्र, राजकीय क्षेत्र, कामगार लढा यामध्ये अजूनही लोकप्रिय आहेत. मार्क्स याचे विचार अनेक कम्युनिस्ट राज्ये आणि राजकीय चळवळींमध्ये अजूनही आदर्श मानले जातात. मार्क्सच्या तत्त्वज्ञानाला समाजसत्तेचा इतिहास आहे. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गातील भेदांना वाचा फोडण्याचे काम कार्ल मार्क्स याने केले.

Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Putin Ukraine hating Donald Trump victory hit Europe How long will Ukraine stand strong in front of Russia
पुतिनमित्र, युक्रेनद्वेष्टे ट्रम्प यांच्या विजयाने युरोपला धडकी… रशियासमोर युक्रेन किती काळ तग धरणार?
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
himachal pradesh cm sukhvinder singh sukhu
मुख्यमंत्र्यांसाठीचे सामोसे खाल्ले कुणी? CID करतेय चौकशी; राज्यभर त्याचीच चर्चा!

कार्ल मार्क्सची क्रांतीची संकल्पना
सर्वसाधारणपणे इतिहासात राजवट बदलणे या अर्थाने क्रांती ही संकल्पना वापरली जाते. कार्ल मार्क्सने क्रांती हे मानवी इतिहासाचे गतितत्त्व मानले आहे. कोणत्याही समाजातील उत्पादन-व्यवहार त्या समाजाचा पाया असतो व उत्पादन संबंधांमधील बदलांमधून त्या समाजाचा इतिहास घडत जातो. माणसे स्वतःच त्यांचा इतिहास घडवितात. या अर्थाने उत्पादनसंबंधांमध्ये बदल करण्याची क्रांतिकारक कृती माणसे संकल्पपूर्वक करीत असतात. हा विचार कार्ल मार्क्सने त्याच्या युरोपीय इतिहासाच्या अभ्यासावरून मांडला, असे दिसते. क्रांती होण्यासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण व्हावी लागते. मार्क्स म्हणतो की, कोणत्याही समाजामध्ये त्या समाजातील संपत्तीचे उत्पादन करणारे श्रमजीवी वर्ग आणि त्यांना दास्यात ठेवणारे प्रबळ वर्ग यांच्यात तणावाचे संबंध असतात. त्यांच्यात मधूनमधून संघर्षही होत असतो. पण श्रमिकांना त्यांचे दास्य संपविण्यासाठी प्रचलित उत्पादनसंबंध बदलणे आवश्यक असते. या मुद्द्यावर क्रांती संकल्पनेत भर दिला जातो. हे संबंध पूर्णपणे ऐच्छिक नसतात. उत्पादनशक्तींचा मोठ्या प्रमाणावर विकास होऊ लागला व प्रचलित उत्पादनसंबंध ह्या विकासाच्या आड येऊ लागले, तरच नव्या उत्पादनसंबंधाची शक्यता निर्माण होते. एकीकडे नव्या उत्पादनशक्तींचा उदय व दुसरीकडे आपले शोषण संपविण्यास उत्सुक असलेला श्रमजीवी वर्ग या दोन परस्पर पोषक घटकांमधून क्रांती घडून येते, असा कार्ल मार्क्सचा युक्तिवाद आहे.

भांडवलशाही समाजातील आर्थिक, राजकीय घडामोडींचा वेध घेऊन क्रांतीची शक्यता आजमावणे हा कार्ल मार्क्सच्या अभ्यासाचा प्रमुख विषय होता. कामगारवर्गाचे शोषण करीत राहिल्याखेरीज भांडवलशाही टिकून राहू शकत नाही, हे शोषण थांबविण्यासाठी कामगारवर्गाला भांडवली उत्पादनसंबंधाविरुद्धच उठाव करावा लागेल, त्यामुळे भांडवलदारवर्गाविरुद्धच्या त्यांच्या संघर्षामध्ये संपूर्ण समाजाच्या पुनर्रचनेचीच कल्पना अनुस्यूत आहे, असे दाखविण्याचा कार्ल मार्क्सने प्रयत्न केला. भांडवलशाहीचा जसजसा विकास होत जातो तसतसा कामगारवर्ग संघटित होत जातो, त्याला राजकीय प्रगल्भता येते व अखेर तो क्रांतिकारक कृती करण्यास सज्ज होतो, असा कार्ल मार्क्सचा विचार आहे.

कार्ल मार्क्सची क्रांतीची संकल्पना राजवटीबरोबरच उत्पादनसंबंध आणि उत्पादनशक्तीमध्ये बदल करण्याचा विचार मांडते. त्यामुळे या क्रांतीला राजकीय क्रांतीबरोबर सामाजिक क्रांती असेही म्हटले जाते.

हेही वाचा : विश्लेषण : बुद्ध पौर्णिमा २०२३ : गौतम बुद्धांच्या हस्तमुद्रा काय सूचित करतात ?

कार्ल मार्क्सने आजच्या जगाला काय दिले ?
कार्ल मार्क्स याचे विचार पटणारा आणि न पटणारा असे दोन गट आहेत. बंड, परिवर्तन याच्यासाठी कायम चर्चेत राहिलेल्या कार्ल मार्क्स याने आजच्या जगाला काही देणग्या दिल्या आहेत.
१) बालमजुरीवरील नियंत्रण
१८४८ च्या दरम्यान बालमजुरी ही सर्वसामान्य समजली जात होती. परंतु, बालके शाळेत न जाता मजुरी करीत राहिली तर पुढे राष्ट्रविकास होणार नाही, असे कार्ल मार्क्सचे मत होते. लेखिका लिंडा युआह यांनी लिहिलेल्या ‘The Great Economists: How Their Ideas Can Help Us Today’ या पुस्तकात त्या म्हणाल्या की, मार्क्स आणि फेड्रिक एंगलच्या १८४८ च्या जाहीरनाम्यात सरकारी शाळांमधल्या मुलांना मोफत शिक्षण आणि कारखान्यातील बालमजुरीवर बंदी हा दहा मुद्द्यांपैकी एक मुद्दा होता. मार्क्स आणि एंगेल यांनी लहान मुलांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला. १९व्या शतकाच्या शेवटी लहान मुलांचे शिक्षण आणि फॅक्टरीत लहान मुलांना काम करण्यापासून रोखणे हा महत्त्वाचा विषय होता. त्यात मार्क्सच्या भूमिका एकरूप झाल्या, असे त्या पुढे म्हणाल्या.
२) ‘ब्रेक’ची तरतूद
कार्ल मार्क्स याने श्रमिकवर्गाच्या उत्पादनशीलतेवर भर दिला. पण, ही उत्पादनशीलता वाढताना कामगारांची पिळवणूक मार्क्सला मान्य नव्हती. त्याच्या विचारांचे अधिक स्पष्टीकरण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधले प्राध्यापक माइक सॅवेज यांनी केले आहे. ते म्हणतात, “जेव्हा तुम्ही खूप वेळ काम करता तेव्हा तुम्ही तुमचे नसताच. तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी जबाबदार नसता. भांडवलशाही समाजात टिकण्यासाठी पैशाच्या बदल्यात मजुरी ही एकच गोष्ट कशी विकतात याबाबत मार्क्स यांनी विपुल प्रमाणात लेखन केले. अशी परिस्थिती अनेकदा अव्यवहार्य असते, असेही मार्क्स यांचे मत आहे.” आपल्याबरोबर असलेल्या कामगारांसाठी मार्क्सला आणखी बऱ्याच गोष्टी हव्या होत्या. आपण स्वतंत्र, सर्जनशील व्हावे, अशी मार्क्स यांची इच्छा होती. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या वेळेवर आपले नियंत्रण हवे, असे त्यांना वाटायचे. आपण काय करतो यावरून आपल्या कामाचे मोजमाप होऊ नये, असे मार्क्सचे म्हणणे होते. एक असे आयुष्य असावे जिथे आपल्याला हवे तसे जगता यावे, या मताचे मार्क्स होते. ”तसे पाहायला गेले तर सध्या प्रत्येकालाच आपल्या मनासारखे जगावे वाटते. म्हणजेच मार्क्स यांनी जे सांगितले तेच अनेकांना करावे वाटते असे आपण म्हणू शकतो,” असे सॅवेज यांनी सांगितले. “मार्क्स यांचे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, ते म्हणतात, असे आयुष्य हवे जिथे आपण सकाळी शिकार, दुपारी मासेमारी, संध्याकाळी गुरे राखणे आणि रात्री फक्त गप्पा झोडणे किंवा वादविवाद घालणे करू शकू. मार्क्स यांचा भर स्वातंत्र्य, मुक्ती आणि परकेपणाविरोधात लढा या गोष्टींवर होता,” असे सॅवेज सांगतात. यावरून मार्क्स याने कामगारवर्गाकडे केवळ काम करणारा असे बघितले नाही, तर तो माणुसकीच्या दृष्टीने कामगारांचा विचार करताना दिसतो.
३) कामातून मिळणारे समाधान महत्त्वाचे
श्रमिकवर्ग हा श्रम करणार. पण हे श्रम केवळ पैशांपुरते मर्यादित असू नये, तर त्या कामातून त्या श्रमिकाला समाधान मिळाले पाहिजे, असे कार्ल मार्क्सचे मत होते. १८४४ साली मार्क्स यांनी इकोनॉमिक ॲण्ड फिलॉसॉफिक मॅनुस्क्रिप्ट’ नावाचे एक पुस्तक लिहिले होते. सुखी आणि आनंददायी आयुष्य आणि मानसिक समाधान हवे असेल तर आपण जे काम करतो, त्यातून सुख मिळणे आवश्यक आहे, असे कार्ल मार्क्स या पुस्तकात म्हणतात. मार्क्सच्या मते कामातले समाधान हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. आपण ६ ते १२ तास जे काम करतो आहोत, त्यातून पैशांव्यतिरिक्त आत्मिक सुख मिळत नसेल तर कामगारवर्गाचे खच्चीकरण होईल, असे मत त्याने मांडले.
४) अन्यायाविरुद्ध बंड करा
मार्क्सचा परिवर्तनावर विश्र्वास होता. अन्यायाविरुद्ध बंड करणे असू दे किंवा समाजामध्ये चुकीच्या घडणाऱ्या घटनेविरुद्ध आवाज उठवणे असू दे, एकत्र येऊन संघर्ष करणे आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही आवाज उठवीत नाही, तोपर्यंत व्यवस्थेत बदल होणार नाही, असे ठाम मत कार्ल मार्क्सचे होते. लुईस नेल्सन हे लंडनमधील ‘मार्क्सिझम फेस्टिव्हल’चे एक आयोजक आहेत. “समाजात बदल होण्यासाठी एका क्रांतीची गरज असते. आपण समाज बदलण्यासाठी आंदोलन करतो. त्यामुळेच कामाच्या तासांची संख्या आठवर आणण्यास सामान्य लोकांना यश आले आहे,” असे ते सांगतात. अनेक कामगार संघटना, समाजघटकांनी या ‘बदलाच्या’ नियमावर विश्वास ठेवला आणि बदल घडवून आणला.

हेही वाचा : World Press Freedom Day 2023 : कायद्याच्या दृष्टिकोनातून पत्रकारितेचे स्वातंत्र्य !

मार्क्सवाद आणि पुरातत्त्व
प्राचीन काळातील समाज व जीवन यांच्याकडे मार्क्सवादाची तत्त्वे वापरून पाहण्याचा एक दृष्टिकोन म्हणजे पुरातत्त्वीय मार्क्सवाद होय. पुरातत्त्वीय पुराव्यांचा अन्वयार्थ लावण्यासाठीची एक विशिष्ट सैद्धांतिक मांडणी आहे. पुरातत्त्वात मार्क्सवादाची तत्त्वे वापरण्याचे अनेक टप्पे आढळतात. पहिला टप्पा हा रशियात साम्यवादी (बोल्शेविक) क्रांती झाल्यानंतरचा असून तो १९२० ते १९६० असा आहे. या क्रांतीनंतर तयार झालेल्या सोव्हिएत महासंघातील पुरातत्त्वज्ञांना पुरातत्त्वीय अभ्यासात मार्क्सवादाची तत्त्वे उपयोगात आणणे भाग होते. उत्खननात मिळणाऱ्या वस्तू आणि आर्थिक-सामाजिक रचनांसंबंधी निष्कर्ष यांची थेट सांगड घालण्यासाठी मार्क्सवाद पुरेसा आहे, अशी त्यांची ठाम समजूत होती. त्यामुळे प्राचीन काळातील विविध सामाजिक वर्गांच्या इतिहासाकडे बघण्यासाठी पुरातत्त्वीय सोडून इतर कोणत्याही पुराव्यांची गरज नाही, अशी त्यांची भूमिका होती.
कोणत्याही मानवी समाजाची रचना आणि वैशिष्ट्ये ही त्या समाजाच्या उत्पादनाच्या पद्धतीवर (mode of production) अवलंबून असतात असे, मार्क्सवादी विचारसरणीत मानले जाते. त्यात उत्पादनासंबंधी घटक (विज्ञान-तंत्रज्ञान आणि इतर सर्व मानवी आणि नैसर्गिक संसाधने) आणि उत्पादनासंबंधी परस्परसंबंध (म्हणजे उत्पादन करणे आणि उत्पादित वस्तूंचे सुलभ वितरण करण्यासाठीच्या साखळीतील घटक) यांचा समावेश होतो. कार्ल मार्क्स यांनी इतिहासाकडे बघताना सर्वस्वी वेगळा दृष्टिकोन वापरला. त्यांनी ऐतिहासिक साधने वापरून उत्पादन पद्धतीशी निगडित आर्थिक-सामाजिक रचनेचे अनेक प्रकार असतात, असे सांगितले. भांडवलशाहीचा उदय होण्याआधी कोणतीही वर्गव्यवस्था नसलेला व शोषण नसलेला प्राथमिक साम्यवाद, सरंजामशाहीतील गुलामी व शोषणावर आधारित उत्पादन व्यवस्था आणि आशियातील उत्पादन पद्धतीवर आधारलेली सामाजिक रचना असे आर्थिक-सामाजिक रचनांचे प्रकार अस्तित्वात होते. कार्ल मार्क्स यांच्या विचारसरणीला ऐतिहासिक भौतिकवाद (Historical materialism) असे म्हणतात. मानवाचा इतिहास हा शोषण करणारे आणि शोषण केले जाणारे या वर्गामधील संघर्षाचा इतिहास आहे आणि अशा संघर्षातूनच विकास होतो, हे विरोधविकासाचे तत्त्व हा मार्क्सवादाचा मुख्य गाभा आहे. अखेर संघर्षातून शासनाची गरज नसलेला आणि कोणाचेच शोषण न होणाऱ्या सामाजिकदृष्ट्या समान असलेल्या व्यक्तींचा समाज निर्माण करणे, हे मार्क्सवादाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पुरातत्त्वीय संशोधनात श्रमजीवी अथवा श्रमिकवर्गाच्या अभ्यासाकडे आणि वर्गसंघर्षातूनच घडणाऱ्या सामाजिक विकासाकडे दुर्लक्ष होते, कारण जगभरात सर्वत्र पुरातत्त्वीय संशोधन हे प्रामुख्याने मध्यमवर्गीय जाणिवांशी निगडित आहे, असे मार्क्सवादी विचारांचा पुरस्कार करणारे पुरातत्त्वज्ञ मानतात.

हेही वाचा : महाराष्ट्राची ‘कामगार कथा’!

साहित्यातील मार्क्सवाद
साहित्य हे मार्क्सवादापासून भिन्न राहणे शक्यच नाही. साहित्यलेखनात आणि समीक्षण करण्यात मार्क्सवादाचा प्रभाव दिसू लागला. त्यातून मार्क्सवादी लेखनपद्धती आणि मार्क्सवादी समीक्षा उदयाला आली. सामाजिक आणि आर्थिक बदलांच्या अनुषंगाने या साहित्याचे महत्त्व आहे. यामध्ये केवळ साहित्यिक, अलंकारिक दृष्टिकोन न बघता मार्क्सवादी तत्त्वांचे साहित्यात आलेले उपयोजन बघितले जाते. आजही मार्क्सवादी साहित्य हा साहित्य अभ्यासाचा वेगळा पैलू आहे.

मार्क्सवादाचे भांडवलदारी किंवा समाजवादी किंवा इतर असे कितीही टीकाकार झाले, तरी मार्क्सवादाने बजाविलेले ऐतिहासिक कार्य कुणालाही नाकारता येत नाही. मार्क्सवादाने समाजवादाला पहिल्या प्रथम शास्त्रीय बैठक दिली आणि त्याच्या पूर्तीसाठी क्रांतीचा मार्ग कसा चोखाळावा ते दाखवून दिले.