अनिल कांबळे
गुंडांचे टोळीयुद्ध, गांजा-ड्रग्जचे विदर्भातील मुख्य केंद्र, भूमाफिया, वाळू माफिया, मद्य माफिया आणि जुगार माफियांचे वाढते प्रस्थ आणि बलात्कार-विनयभंगाच्या नियमित घडणाऱ्या घटनांमुळे मध्यंतरी नागपूर गुन्हेगारीचे केंद्र ठरू लागले होते. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी यावर नियंत्रण मिळवले. मात्र, आता पुन्हा राज्याची उपराजधानी नागपूरची वाटचाल ‘क्राईम सिटी’ होण्याच्या दिशेने सुरू आहे.
नागपूरची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय?
कुख्यात गुन्हेगारांचे शहर म्हणून नागपूरची ओळख होती. संतोष आंबेकर, रणजीत सफेलकर, राजू बद्रे, शेखू खान, कालू हाटे, गिजऱ्या, बाल्या, यादव, मुन्ना, आबू खान, नव्वा, समुद्रे, मोहोड, फ्रान्सिस, ईप्पा, समशेर खान, हरिश्चंद्र, धावडे, लिटील, सरदार, बबलू, युवराज माथनकर अशा गुन्हेगारांचे नागपुरात वर्चस्व होते. त्यांना राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याने कारवाई होत नव्हती. सामान्य नागरिक त्रस्त झाल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्याऐवजी प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडाकडे जाऊन कैफियत मांडत होते. सध्या वरील सर्व गुंड कारागृहात आहेत.
गुन्हेगारी वाढण्याची कारणे काय?
गुन्हेगारांचे प्रस्थ वाढण्यामागे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची गुंडांशी असलेली ‘अर्थपूर्ण’ मैत्री हे कारण आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रारदार कमी आणि गुन्हेगारांचीच वर्दळ जास्त असे चित्र होते. पोलिसांचे गुन्हेगारांशी असलेले संबंध आणि गुन्हेगारी टोळ्यांमध्ये असलेली आर्थिक सुबत्ता या कारणामुळे नागपुरातील गुन्हेगारी वाढली. आताच्या काळात मात्र गुन्हेगारांवर पोलिसांचे वर्चस्व राहिले नाही. त्यामुळे प्रत्येक गल्लीत एक मोठा गुन्हेगार तयार होत आहे.
राजकीय हस्तक्षेप कारणीभूत आहे का?
ड्रग्ज, गांजा, पब, क्रिकेट सट्टेबाजी, जुगार, वाळू तस्करी, मद्य तस्करी, गोवंश तस्करी, सेक्स रॅकेट तसेच भूखंडावर अवैधरित्या ताबा मिळवण्याचे प्रकार नागपुरात सुरू आहेत. गृहमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपुरातील कुणीही ऊठसूट पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हेगारांच्या बचावासाठी उभा राहतो. कारवाई केल्यास पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्र्यांकडे तक्रार करण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे पोलीस अधिकारी गुन्हेगारांवर कारवाई करू शकत नाहीत. वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारीसुद्धा राजकीय नेत्यांच्या आदेशावर काम करीत असल्याची स्थिती आहे.
ड्रग्ज तस्करीचे मुख्य केंद्र..?
संपूर्ण विदर्भात नागपुरातून गांजा आणि ड्रग्ज पुरवले जाते. येथे ड्रग्ज तस्करांच्या टोळ्या सक्रिय आहेत. मुंबईतून ड्रग्ज आणल्यानंतर त्याची विल्हेवाट विदर्भातील विविध जिल्ह्यात लावली जाते. ड्रग्जची किंमत कोटींमध्ये असल्यामुळे शहर आणि ग्रामीणमधील एनडीपीएस पोलीस पथकाशी ‘मधुर’ संबंध ठेवले जाते. पोलीस फक्त किरकोळ कारवाई करून आपले ‘लक्ष्य’ पूर्ण करताना दिसतात.
नागरिक भयभीत का आहेत?
सध्या शहरात भरदिवसा खून, दरोडा, घरफोडी, लुटमार, व्यापाऱ्यांना खंडणी मागणे असे प्रकार वाढले आहेत. पूर्वी गुन्हेगार धारदार शस्त्रे वापरत होती. मात्र, आता लहानसहान गुन्हेगारांकडे पिस्तूल आले आहे. पूर्वी भोसकण्याची धमकी देणारे गुंड आता थेट गोळ्या घालण्याची धमकी देतात. वर्षांतून एखादी गोळीबाराची घटना होत होती. मात्र, अलीकडे गोळ्या घालून खून किंवा हवेत गोळीबार करून धमकावण्याचे प्रकार वाढत आहेत. मागील महिन्यात १२ हत्याकांडाच्या घटना उघडकीस आल्या होत्या.या सर्व प्रकारावर पोलिसांचे नियंत्रण नसल्यामुळे उपराजधानीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पोलिसांचा वचक संपला का?
एकीकडे गुन्हेगारी वाढत असताना पोलीस हतबल झाल्याचे चित्र आहे. अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त पदाचा पदभार घेताच गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले. गुन्हेगारांवर मोक्का, कारागृह स्थानबद्ध आणि प्रतिबंधात्मक कारवाई करीत गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण केला होता. मात्र, आता आयुक्तांचा दोन वर्षांचा कालावधी संपला आहे. त्यामुळे आयुक्तांची कधीही बदली होऊ शकते, अशी धारणा असल्यामुळे आयुक्तांचा वचक कमी झाला आहे. याचा परिणाम गुन्हेगारी वाढण्यात झाला आहे. मात्र पोलीस आयुक्तांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.