उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन आतापर्यंतची सर्वांत प्रगत आणि मोठी युद्धनौका तयार करून जगाला आव्हान देण्याचा प्रयत्न करीत आहे. नुकत्याच समोर आलेल्या नवीन उपग्रह छायाचित्रांमधून असे दिसून येत आहे की, उत्तर कोरियाच्या नाम्पो शिपयार्डमध्ये सर्वांत मोठ्या जहाजाचे बांधकाम पूर्ण केले जात आहे. उत्तर कोरियाचे नाम्पो शिपयार्ड राजधानी प्योंगयांगपासून सुमारे ३७ किलोमीटर अंतरावर आहे. ही युद्धनौका नक्की काय आहे? ही युद्धनौका तयार करून हुकूमशहा किम जोंग उन यांना नक्की काय सिद्ध करायचे आहे? हे जाणून घेऊ…

युद्धनौका बांधण्यामागील कारण काय?

‘सीएनएन’ने दिलेल्या वृत्तानुसार उपग्रहाद्वारे हे छायाचित्र स्वतंत्र उपग्रह प्रदाते मॅक्सार टेक्नॉलॉजीज आणि प्लॅनेट लॅब्स यांनी काढले आहे. ‘कोरिया जुंगांग डेली’ने वृत्त दिले आहे की, हे जहाज शिपयार्डमध्ये कोरड्या जागेवर बांधले जात आहे. या जहाजाचे बांधकाम शेवटच्या टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. ६ एप्रिल रोजी समोर आलेल्या छायाचित्रांमधून असे दिसून आले आहे की, हे जहाज सुमारे १४० मीटर (४५९ फूट) लांब आहे.

त्यामुळे हे जहाज उत्तर कोरियाच्या नौदलातील सध्याच्या जहाजांच्या आकारापेक्षा दुप्पट आहे. सध्या बांधल्या जात असलेल्या या जहाजाची तुलना अमेरिकन नौदलाच्या आर्ले बर्क-क्लास डिस्ट्रॉयर्स (५०५ फूट) व कॉन्स्टेलेशन-क्लास फ्रिगेट्स (४९६ फूट) यांच्याशी केली जात आहे.

उत्तर कोरियाच्या नाम्पो शिपयार्डमध्ये सर्वांत मोठ्या जहाजाचे बांधकाम पूर्ण केले जात आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजने दिलेल्या माहितीनुसार हे जहाज कदाचित गाईडेड-मिसाईल फ्रिगेट (एफएफजी) असेल. फ्रिगेट्स म्हणजे बहुउद्देशीय युद्धनौका, ज्या हवाई संरक्षण, जहाजविरोधी व पाणबुडीविरोधी मोहिमांसाठी सुसज्ज असतात. “एफएफजी अंदाजे १४० मीटर (४५९ फूट) लांब आहे,” असे सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजमधील जोसेफ बर्मुडेझ ज्युनियर व जेनिफर जून यांनी केलेल्या विश्लेषणात म्हटले आहे. जहाज झाकले गेले असल्याने, त्याविषयीची पूर्ण माहिती मिळालेली नाही. परंतु, छायाचित्रानुसार असे दिसून येते की, जहाजाची लांबी जास्त आहे. त्यामुळे त्यावर हेलिपॅड आणि हँगर असण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांचे असे सांगणे आहे की, हे तेच जहाज असू शकते, ज्याची मार्चच्या सुरुवातीला किम जोंग उन यांनी तपासणी केली होती.

तज्ज्ञ काय सांगतात?

तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की, हे जहाज प्रक्षेपण प्रणालीमध्ये क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठी आहे. हे जहाज जमिनीवर आणि समुद्रावरील लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम असणार आहे. उत्तर कोरियाने युद्धनौका बांधणे ही बाब तज्ज्ञांसाठी आश्चर्यकारक नाही. तज्ज्ञांनी असा इशारा दिला की, हे जहाज बांधण्यासाठी रशियाने उत्तर कोरियाला मदत केली आहे. दक्षिण कोरियाचे निवृत्त अ‍ॅडमिरल किम डुक-की यांनी ‘सीएनएन’ला सांगितले की, रशिया उत्तर कोरियाला जहाजाच्या क्षेपणास्त्र प्रणालीसाठी तंत्रज्ञान देण्यास मदत करीत असण्याची शक्यता आहे.

उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्रांचे कडक निर्बंध आहेत. संयुक्त राष्ट्रांकडून शस्त्रास्त्रे तयार करण्याच्या साहित्य आणि तंत्रज्ञानावर प्रतिबंध घालण्यात येतात. मात्र, तरीदेखील किम जोंग उन यांच्या सैन्याकडून वेगाने नवीन शस्त्रे तयार करण्यात येत आहेत. यामागे रशिया आणि उत्तर कोरियामधील वाढती मैत्री कारणीभूत असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. युक्रेन युद्धानंतर दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत झाले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मध्यंतरी उत्तर कोरियाचा दौरा केला आणि उत्तर कोरियानेदेखील रशियाला युद्धातील मदतीसाठी आपले सैन्य पाठवले असल्याची माहिती आहे.

अमेरिकेच्या नौदलाचे माजी कॅप्टन व विश्लेषक कार्ल शुस्टर यांनी ‘आउटलेट’ला सांगितले की, अशी प्रगत प्रणाली तयार करणे सोपी बाब नाही. शुस्टर म्हणाले की, या कामाला एक वर्ष लागण्याची शक्यता आहे. “या जहाजाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली सुपरस्ट्रक्चर, सेन्सर व शस्त्रास्त्र प्रणालींचा अभाव असल्यामुळे या कामाला वेळ लागत आहे,” असे शुस्टर म्हणाले. परंतु, किम डुक-की यांनी इशारा देत सांगितले की, जर उत्तर कोरियाने नवीन फ्रिगेट जानेवारीमध्ये काम पूर्ण करून, हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज केली, तर त्याचा परिणाम प्रादेशिक सुरक्षेवर होईल,” असे वृत्त ‘आउटलेट’ने दिले.

जहाजाच्या छायाचित्रांवरून असे दिसून आले की, जहाजात उभी प्रक्षेपण क्षेपणास्त्रे असतील, जी अनेक प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा मारा करू शकतील. विश्लेषकांचा असाही विश्वास आहे की, त्यात फेज्ड-अ‍ॅरे रडार बसवले जाईल. त्याच्या मदतीने शत्रूंना लवकर ट्रॅक करणे शक्य होईल. हे उत्तर कोरियाच्या जुन्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत अधिक कार्यक्षम आहे. हायपरसोनिक क्षेपणास्त्रे या जहाजावर तैनात करण्यात आल्यास या प्रदेशाच्या सुरक्षेसाठी तो धोका ठरेल.

हे जहाज उत्तर कोरियासाठी गेम चेंजरपेक्षा अधिक असेल आणि त्यामुळे दक्षिण कोरिया, जपान व अमेरिकेसाठी धोका वाढेल. किम जोंग उन त्यांच्या सैन्याचे सातत्याने आधुनिकीकरण करीत आहेत. हुकूमशाह किम जोंग अमेरिकेपर्यंत मारा करू शकणारी नवीन शस्त्रे आणि आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेत आहेत. त्यामुळे ही युद्धाची तयारी आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.