चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा ऐन रंगात असताना भारतीय संघाचे सर्व सामने एकाच मैदानावर होण्यावरून आता आजी-माजी खेळाडूंकडून टीका-टिप्पणीचे सत्र सुरू झाले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपला संघ पाकिस्तानात पाठविण्यास नकार दिला. त्यामुळे स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असले, तरी भारताचे सर्व सामने दुबई येथे खेळवले जात आहेत. भारताने पहिले दोन साखळी सामने सहजपणे जिंकून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. उपांत्य, तसेच भारताने अंतिम फेरी गाठली तर तो सामनाही दुबई येथेच खेळवला जाणार आहे. ही बाब भारताच्या पथ्यावर पडणार असल्याची टिप्पणी अन्य देशांतील क्रिकेटपटूंनी केली आहे.
भारताचे सामने दुबईत का?
यजमानपदासाठी पाकिस्तानची निवड झाल्यापासूनच चॅम्पियन्स करंडक स्पर्धेबाबत बरीच चर्चा रंगत आहे. गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटविश्वातील आघाडीचे संघ पाकिस्तानचा दौरा करत असले, तरी तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे भारतीय संघ गेली दोन दशके या शेजारी राष्ट्रात गेलेला नाही. यंदाही हेच चित्र कायम राहिले. ‘बीसीसीआय’ने सुरक्षेच्या कारणास्तव आपला संघ पाकिस्तानात पाठविण्यास नकार दिला. पाकिस्तानला तब्बल २९ वर्षांनी एखाद्या जागतिक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. त्यामुळे भारतीय संघ येवो वा न येवो, आम्ही यजमानपद सोडणार नाही, अशी भूमिका पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) सुरुवातीला घेतली. मात्र, भारतीय संघाच्या अनुपस्थितीमुळे बसणारा आर्थिक फटका लक्षात घेऊन ‘पीसीबी’ला नमते घ्यावेच लागले. ही स्पर्धा संमिश्र प्रारूप आराखड्यानुसार (हायब्रिड मॉडेल) आयोजित करण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) प्रस्ताव त्यांनी स्वीकारला. त्यामुळे स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानाकडे राहिले, पण भारतीय संघाचे सामने दुबईत खेळविण्याचा निर्णय झाला.
आजी-माजी खेळाडूंकडून टीका…
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स, तसेच नासीर हुसेन आणि मायकल आथर्टन या इंग्लंडच्या माजी कर्णधारांनी, केवळ एकाच मैदानावर खेळण्याचा भारतीय संघाला मोठा फायदा मिळत असल्याचे मत मांडले आहे. ‘‘स्पर्धेच्या आयोजनात कोणताही अडथळा आला नाही हे उत्तम. मात्र, एकाच मैदानावर सर्व सामने खेळणे हे भारताच्या पथ्यावर पडणार आहे हे निश्चित,’’ अशी टिप्पणी कमिन्सने केली. दुखापतीमुळे कमिन्स या स्पर्धेत खेळू शकला नाही. मात्र, त्याने स्पर्धेविषयी आपले मत जरूर मांडले. कमिन्सशी हुसेन आणि आथर्टन सहमत होते. ‘‘एकाच मैदानावर आपले सर्व सामने खेळण्याचा फायदा भारतीय संघाला निश्चितपणे मिळेल. पाकिस्तान स्पर्धेचे यजमान असले, तरी घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा जणू भारताला मिळत आहे. त्यांना एकाच शहरात, हॉटेलमध्ये राहता येत आहे. कुठेही प्रवास करण्याची आवश्यकता नाही. त्यांना खेळपट्टीचे स्वरूप पूर्णपणे ठाऊक असून त्यानुसार त्यांनी संघनिवड केली आहे. अन्य संघांना कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथेही खेळावे लागणार असल्याने त्यांना तेथील परिस्थितीनुसार संघात बदल करावे लागत आहेत. मात्र, भारताचे तसे नाही. त्यांच्यासाठी ही बाब फायदेशीर नक्कीच आहे,’’ असे हुसेन म्हणाले. असेच मत आथर्टन यांनीही मांडले. ‘‘भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. हा सामनाही दुबईत होणार हे त्यांना ठाऊक आहे. ही बाब त्यांच्या पथ्यावर पडणार यात दुमत नाही,’’ असे आथर्टन यांनी नमूद केले.
एकाच मैदानावर खेळणे खरेच फायदेशीर?
भारतीय संघाचे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहेत. पहिल्या सामन्यात बांगलादेशला धूळ चारल्यानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात केली. या दोन्ही सामन्यांत प्रतिस्पर्धी संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम गोलंदाजी करायला लावली. सामना जसा पुढे जाईल तशी खेळपट्टी अधिक संथ होईल असा त्यांचा अंदाज होता. मात्र, खेळपट्टी सुरुवातीपासूनच फिरकीला साथ देत होती. याचा रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या भारताच्या फिरकी त्रिकुटाने पुरेपूर फायदा घेतला. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने बांगलादेश, तर हार्दिक पंड्याने पाकिस्तानविरुद्ध टिच्चून मारा केला. त्यामुळे प्रतिस्पर्धांना कमी धावसंख्येत रोखण्यात भारताने यश मिळवले. मग धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने आक्रमक सुरुवात करून देत अन्य फलंदाजांचे काम थोडे सोपे केले. तसेच मैदानही (आऊटफिल्ड) संथ असल्याने चेंडू सीमारेषेपर्यंत सहजपणे जात नव्हता. अशात एक-दोन धावांवर भर देत धावफलक हलता ठेवणे गरजेचे होते. उष्ण आणि दमट वातावरणातही विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी हे काम चोख केले. त्यामुळे भारताचा विजयाचा मार्ग सुकर झाला. दुबईतील खेळपट्टीचे स्वरूप आता भारताला पूर्णपणे माहीत झाले आहे. तसेच येथे कोणत्या योजनेसह खेळणे आवश्यक आहे आणि धावांचा वेग कसा राखायचा, याचीही भारतीय संघाला कल्पना आली आहे. याचा निर्णायक सामन्यांत भारताला फायदा निश्चित होऊ शकेल.
खेळपट्टीवर नियंत्रण कुणाचे?
सर्व सामने एकाच ठिकाणी होत असल्याने हे जणू भारताचे घरचे मैदान झाल्याची टीका करण्यात येत आहे. मात्र, चॅम्पियन्स करंडक ही ‘आयसीसी’ची स्पर्धा असल्याने खेळपट्टीचे स्वरूप कसे असले पाहिजे, हे ठरविण्याचा अधिकार भारतीय संघ व्यवस्थापन किंवा ‘बीसीसीआय’ला नाही. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे ‘क्युरेटर’ खेळपट्टी तयार करतात. तसेच ‘आयसीसी’कडून स्वतंत्र ‘क्युरेटर’ही नियुक्त केला जातो. त्यांचे खेळपट्टीवर बारीक लक्ष असते.
कोणत्या संघांत आव्हान देण्याची क्षमता?
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या संथ खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचा यापुढेही दबदबा राहणे अपेक्षित आहे. अशात ज्या संघांमध्ये गुणवान फिरकी गोलंदाज आहेत, ते संघ भारताला आव्हान देऊ शकतील. ‘अ’ गटातून भारत आणि न्यूझीलंड या संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. या दोन संघांत अद्याप साखळी सामना झालेला नाही. तसेच आपापला उपांत्य सामना जिंकल्यास हे संघ पुन्हा अंतिम फेरीतही आमनेसामने येऊ शकतील. न्यूझीलंडकडे कर्णधार मिचेल सँटनर याच्यासह मायकल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स आणि रचिन रवींद्र असे फिरकीपटूंचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून भारताला कडवी झुंज मिळेल. ‘ब’ गटाचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या गटातील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ उपांत्य फेरी गाठण्यासाठी भक्कम स्थितीत आहेत. ऑस्ट्रेलियाकडे ॲडम झॅम्पा, ग्लेन मॅक्सवेल, मार्नस लबूशेन आणि स्टीव्ह स्मिथ, तर दक्षिण आफ्रिकेकडे केशव महाराज, तबरेझ शम्सी आणि एडीन मार्करम असे फिरकीपटू आहेत. त्यामुळे हे संघही दुबईत भारताला आव्हान देऊ शकतील.