दिवसेंदिवस होत असलेल्या तापमानवाढीमुळे जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. तापमानवाढ होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले जाते. तसेच वेगवेगळ्या परिषदांच्या माध्यमातून तापमानवाढ रोखण्यासाठी जगभरातील देश एकत्र येत आहेत. हे देश एकत्र येऊन तापमानवाढ रोखण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा करतात, त्यानुसार वेगवेगळे करार केले जातात. मात्र, तरीदेखील गेल्या काही वर्षांचा अभ्यास केल्यास तापमानवाढीचा आलेख चढताच दिसेल. याच पार्श्वभूमीवर या तापमानवाढीला सूर्यच जबाबदार आहे का? याबाबतचा अभ्यास काय सांगतो? हे जाणून घेऊ या….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक तापमानवाढीवर एकमत, मात्र…

उत्तर भारतात हिमवृष्टीला होत असलेला विलंब, ऑस्ट्रेलियात आलेली उष्णतेची लाट, चिलीमध्ये जंगलाला लागलेली आग, समुद्राच्या पृष्ठभागाचे वाढते तापमान; या सर्व घटना जागतिक तापमानवाढीचाच (ग्लोबल वॉर्मिंग) परिणाम आहेत. जगभरात तापमानवाढ होत आहे, यावर शास्त्रज्ञांचे एकमत आहे. मात्र, या तापमानवाढीच्या कारणांवर वेगवेगळी मतं व्यक्त केली जातात. याच जागतिक तापमानवाढीला सूर्य जबाबदार आहे का? असेदेखील विचारले जाते. यावर अनेक शास्त्रज्ञांनी अभ्यास केलेला आहे.

सोलार सायकलदरम्यान सूर्याच्या क्रियाकलापांमध्ये बदल

सूर्याबाबत सांगायचे झाल्यास तो नेहमी एकाच पातळीवर सौरज्वालांचे उत्सर्जन करत नाही. आपल्या ११ वर्षांच्या सोलार सायकलमुळे सूर्याच्या चुंबकीय ध्रुवांची स्थिती बदलते, ज्यामुळे सूर्य कमी-अधिक प्रमाणात चमकतो. म्हणजेच सूर्य हा नेहमी सारख्याच प्रमाणात, एकाच पातळीवर सौरज्वालांचे उत्सर्जन करत नाही. नासाच्या म्हणण्यानुसार प्रत्येक सोलार सायकलदरम्यान सूर्याच्या क्रियाकलापांमध्ये बरेच बदल होतात. या काळात सूर्याच्या किरणोत्साराचे प्रमाण कमी-अधिक होते. यासह सूर्यातून निघणाऱ्या सौरज्वालांचेही प्रमाण कमी-अधिक होते. सूर्याच्या या बदलत्या स्थितीमुळे अंतराळात अनेक बदल होतात. त्याचप्रमाणे सूर्याच्या या गुणधर्मामुळे पृथ्वीवर, पृथ्वीच्या पृष्ठभागावरही बरेच बदल होतात.

आकडेवारीसहित स्पष्ट करायचे झाल्यास १८०० ते १९०० या साधारण १०० वर्षांच्या काळात पृथ्वीवर पोहोचणाऱ्या सूर्यप्रकाशाचे प्रमाण हे अधिक होते. यामुळे पूर्व-औद्योगिक काळापासून ०-१ ते १.० अंश सेल्सिअस उष्णतावाढ नोंदवली गेली.

मग जागतिक तापमानवाढीला सूर्य जबाबदार आहे का?

सूर्यप्रकाशामुळे पृथ्वीवरील तापमानवाढीवर परिणाम होतो, असा तर्क लावला जात असेल तर मग जागतिक तापमानवाढीला सूर्य जबाबदार आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. तर याचे उत्तर नाही असे आहे. सध्याच्या जागतिक तापमानवाढीला सूर्य जबाबदार नाही. गेल्या पाच दशकांत पृथ्वीच्या सरासरी तापमानाने नवी उंची गाठलेली आहे. मात्र, नासाने २०१९ साली प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार सूर्यप्रकाशात फक्त ०.१ टक्क्याने कमी-अधिक वाढ झालेली आहे. याच कारणामुळे सध्याच्या जागतिक तापमानवाढीला सूर्य जबाबदार नाही, असा तर्क लावला जातो.

हरितगृह वायूंमुळे तापानवाढ

सध्याच्या जागतिक तापमानवाढीला सूर्य जबाबदार नाही, असे मत मांडताना शास्त्रज्ञांकडून आणखी एक कारण सांगितले जाते. तापमानवाढीला सूर्य जबाबदार असता तर पृथ्वीच्या वातावरणातील सर्वच स्तर गरम झाले असते. प्रत्यक्षात मात्र तसे होते नाही. गेल्या काही वर्षांत पृथ्वीचा खालचा थर अधिक उष्ण आहे, तर वरचा थर तुलनेने थंड आहे. त्यामुळे सध्याची जागतिक तापमानवाढ ही मानवनिर्मित आहे. १९७५ सालापासून प्रत्येक दशकाला पृथ्वीचे तापमान हे ०.१५ ते ०.२० अंश सेल्सिअसने वाढत आहे. हरितगृह वायूंमुळे ही तापानवाढ होत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is sun responsible for global warming know detail information prd
Show comments