संदीप कदम
भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेला नमवत आशिया चषक स्पर्धेचे आठव्यांदा जेतेपद मिळवले. त्यामध्ये भारताने फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी केली. भारतासाठी या स्पर्धेतून काही चांगल्या गोष्टींचा उलगडा झाला. आगामी काळात भारतीय संघ ही लय कायम राखेल का, विश्वचषकात भारतीय संघाला कितपत संधी आहे, याचा हा आढावा.
आशिया चषक स्पर्धेतून विजेतेपदाशिवाय हाती काय आले?
भारतीय संघाला आशिया चषकात अनेक सकारात्मक गोष्टी समोर आल्या. सलामी फलंदाजी व गोलंदाजी सर्वच बाबतीत भारताने चांगली कामगिरी केली. जसप्रीत बुमराने समाधानकारक पुनरागमन केले. पाकिस्तानविरुद्ध ‘सुपर फोर’ फेरीतील सामन्यात प्रथमच गोलंदाजी करत चमक दाखवली. मोहम्मद सिराजने अंतिम सामन्यात सहा गडी बाद करत सर्वांचे लक्ष वेधले. या स्पर्धेत सिराजने दहा गडी बाद करत भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी केली. शार्दूल ठाकूरला या स्पर्धेत तिसरा गोलंदाज म्हणून संधी मिळाली. त्यानेही चार सामन्यांत पाच गडी बाद करत योगदान दिले. यासह कुलदीप यादव, हार्दिक पंड्या व रवींद्र जडेजा यांनी स्पर्धेत आपले योगदान दिले. कुलदीपने नऊ बळी मिळवत स्पर्धावीराचा पुरस्कार पटकावला. जडेजाने स्पर्धेत सहा गडी गारद केले. तर हार्दिकने सहा गडी बाद केले व पाकिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यात निर्णायक अर्धशतक झळकावले. भारताचा सलामीवीर शुभमन गिल (३०२ धावा) व कर्णधार रोहित शर्मा (१९४) यांनी निर्णायक खेळी केल्या. गिलने या स्पर्धेत दोन अर्धशतके व एक शतक झळकावले. त्यातील बांगलादेशविरुद्धची शतकी खेळी निर्णायक राहिली. विराटनेही १२९ धावा या स्पर्धेत केल्या. केएल राहुलने पुनरागमनात शतक झळकावत आपण तंदुरुस्त असल्याचे सिद्ध केले.
आणखी वाचा- नेहरू, माऊंटबॅटन यांसारख्या नेत्यांनी भेट दिलेला लंडनमधील ‘इंडिया क्लब’ का बंद झाला?
कोणत्या सकारात्मक बाबी समोर आल्या?
भारतासाठी सर्वात जमेची बाजू म्हणजे सलामीची फळी लयीत असणे. आशिया चषकात भारताच्या फलंदाजांनी चांगल्या धावा केल्या. शुभमन गिल या सर्वांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याला कर्णधार रोहित शर्माने चांगली साथ दिली. विराटनेही संघासाठी काही निर्णायक खेळी केल्या. या स्पर्धेत इशान किशनला मधल्या फळीत खेळवण्याचा प्रयत्न झाला आणि हा प्रयोग संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. हार्दिक पंड्यानेही संघाला गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर योगदान दिले. गेल्या काही काळापासून फिरकीपटू कुलदीप यादव चांगल्या लयीत आहे आणि आशिया चषकात त्याने आपल्या याच लयीचा फायदा घेत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांच्या अडचणी वाढवल्या. त्याला रवींद्र जडेजाची चांगली साथ लाभली. यासह वेगवान गोलंदाज बुमरा, सिराज व शार्दूल यांनी वेगवान गोलंदाजांना पूरक परिस्थितीचा फायदा घेत चमक दाखवली. त्यामुळे आशिया चषकात संपूर्ण सांघिक कामगिरी भारतीय संघाकडून पाहायला मिळाली.
भारताला कोणत्या गोष्टीवर अधिक सुधारणेची आवश्यकता आहे?
भारतासाठी मधल्या फळीत चौथे स्थान हा अजूनही चिंतेचा विषय आहे. त्यामुळे त्यावर लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. श्रेयस अय्यरच्या पाठदुखीमुळे संघ निवडताना अडचणी येत आहेत. विश्वचषकाच्या प्राथमिक संघात श्रेयसला स्थान देण्यात आले आहे. दुखापतीतून पुनरागमन करताना त्याने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध एकच सामना खेळला. मात्र, त्यानंतर पुन्हा त्रास जाणवू लागल्याने तो खेळला नाही. त्यामुळे लवकरात लवकर तंदुरुस्त होऊन तो संघात खेळेल अशी अपेक्षा आहे. अक्षर पटेल व रवींद्र जडेजा यांच्याकडून संघाला फलंदाजीतही योगदान अपेक्षित असेल, जेणेकरून संघातील वरची फळी धावा करण्यात अपयशी ठरल्यास या दोन्ही अष्टपैलूंची भूमिका महत्त्वाची राहील. शार्दूल ठाकूर निर्णायक क्षणी संघाला बळी मिळवून देतो. मात्र, तो अधिक धावा देतो. ठाकूरने या गोष्टीवर अधिक मेहनत करणे अपेक्षित आहे. मोहम्मद शमी गेल्या काही काळापासून कमी सामने खेळला आहे. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न भारतीय संघ व्यवस्थापनाचा राहील.
आणखी वाचा-प्राचीन काळातील जहाजबांधणी आता पुन्हा होणार; मोदी सरकार ब्रिटिशांचा कोणता वारसा पुसणार आहे?
विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची तयारी कशी?
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन भारतात होणार असल्याने सर्वाधिक लक्ष या यजमान भारताकडे असणार आहे. २०११ मध्ये झालेल्या स्पर्धेचे जेतेपद भारताने पटकावले होते. त्यामुळे या वेळीही संघाकडून तितक्याच अपेक्षा आहेत. भारताचा प्राथमिक संघ घोषित झालेला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघात अष्टपैलू खेळाडूंचाही भरणा आहे. मात्र, संघातील काही खेळाडूंच्या दुखापतीची चिंता व्यवस्थापनाला आहे. अक्षर पटेल व श्रेयस अय्यर हे तंदुरुस्त असल्याचे रोहित शर्मा आशिया चषकाचे जेतेपद जिंकल्यानंतर म्हणाला होता. मात्र, विश्वचषकापूर्वी होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी हे दोन्ही खेळाडू कसे खेळतात हे पाहावे लागेल. २७ सप्टेंबरपर्यंत संघांना बदल करण्याची संधी आहे. केएल राहुल व जसप्रीत बुमरासारख्या खेळाडूंनी दुखापतीनंतर पुनरागमन करत चमकदार कामगिरी केली. त्यामुळे संघ व्यवस्थापनावरील दबाव काहीसा कमी झाला असेल.
बुमराने आयर्लंडच्या दौऱ्यात पुनरागमन केले. तर, आशिया चषकातही आपली छाप पाडली. राहुलनेही दुखापतीनंतरही आशिया चषकात पुनरागमन केले. राहुल सुरुवातीचे दोन सामने खेळला नाही. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली तर, यष्टिरक्षणाची जबाबदारीही तो चोखपणे पार पाडताना दिसला. यातच शुभमन गिल हा आशिया चषकातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. रोहित शर्माही लयीत आहे. विराटकडून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेत आणखीन चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे. रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, शार्दूल ठाकूर यांच्या रूपात संघात चांगले अष्टपैलू खेळाडूही आहेत. भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेमध्ये या अष्टपैलूंचा उपयोग संघाला चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल. भारताच्या वेगवान माऱ्याची जबाबदारी अनुभवी मोहम्मद शमी, बुमरा यांच्यावर असेल. मोहम्मद सिराजने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यातील कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले होते.