अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे कोट्यवधी लोकांचा जीव वाचत आहे. मात्र, त्यामुळे काही अज्ञात समस्याही निर्माण होत आहेत. वाढत्या बुरशी संसर्गाचा प्रकार हा त्यातीलच आहे. जगात सध्या चारपैकी एका व्यक्तीला ‘ॲथलीट फूट’ म्हणजेच यिस्ट संसर्गाची बाधा झालेली आहे. याचवेळी चारपैकी तीन महिलांना आयुष्यात एकदातरी योनीमार्गात यिस्ट संसर्ग होतो. परंतु, आधीपासून माहिती असलेले बुरशीजन्य संसर्ग केवळ हिमनगाचे टोक आहेत. त्वचेला होणारा बुरशी संसर्ग सर्वांना माहिती असतो परंतु, तुमची फुप्फुसे आणि इतर अवयवांमध्ये रक्ताद्वारे पसरणाऱ्या बुरशी संसर्गाची माहिती तुम्हाला नसेल. अशा संसर्गांचे प्रमाण वाढू लागले आहे. हा संसर्ग जीवघेणा ठरत असून, रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना त्याचा अधिक धोका आहे. आतापर्यंत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या रडारवर हे बुरशी संसर्ग नव्हते. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने मागील वर्षी पहिल्यांदाच जीवघेण्या बुरशीची यादी जाहीर केली. त्यातून हा धोका जगासमोर आला. तो दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संसर्ग कसा होतो?

आपण श्वासातून बुरशीचा अंश सातत्याने शोषून घेत असतो. ही बुरशी खते, ब्रेड, स्वयंपाकघरातील टेबल, बागेतील फुले यांसह असंख्य मार्गाने आपल्या संपर्कात येत असते. याबाबत ‘युरोपियन सेंटर फॉर एक्सलन्स फॉर इनव्हेजिव्ह फंगल इन्फेक्शन’ संस्थेचे प्रमुख ऑलिव्हर कॉनेली सांगतात की, बहुतांश निरोगी व्यक्तींवर बुरशीच्या अंशांचा परिणाम होत नाही. कारण त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते आणि त्या व्यक्ती सहजपणे बुरशीशी लढा देतात. मात्र प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींमध्ये, धूम्रपान जास्त करणारे आणि नुकतेच अवयव प्रत्यारोपण झालेले यांना बुरशीचा त्रास अधिक होऊ शकतो.

हेही वाचा… विश्लेषण: गतविजेते इंग्लंड विश्वचषकात इतके कसे ढेपाळले? अंतर्गत कुरबुरींची लागण?

प्रमाण का वाढत आहे?

जीव वाचविण्यासाठी करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून बुरशी संसर्ग वाढत असल्याचा संशोधकांचा दावा आहे. सध्या अनेक जण नियमितपणे शस्त्रक्रिया आणि उपचारांना सामोरे जातात. त्यात केमोथेरपीचाही समावेश आहे. अशा प्रकारच्या वैद्यकीय उपचाराच्या हस्तक्षेपामुळे बुरशी संसर्गाशी लढण्याची त्या व्यक्तीची क्षमता कमी होते. विशेष म्हणजे, बुरशी संसर्ग प्रतिबंधकांच्या प्रतिरोधात वाढ झाल्याची बाबही संशोधकांनी नमूद केली आहे.

बुरशीप्रतिबंधक प्रतिरोध म्हणजे काय?

प्रतिजैविक प्रतिरोधासारखाच बुरशीप्रतिबंधक प्रतिरोध हा प्रकार आहे. काही बुरशी या बुरशीप्रतिबंधक औषधांना दाद देत नाहीत. त्यामुळे त्यावर उपचार करणे अवघड बनते. विशिष्ट प्रकारच्या बुरशी प्रतिबंधकांना काही बुरशी प्रतिरोध करतात. याचवेळी अनेक वेळा बुरशीपर्यंत प्रतिबंधक औषधांची मर्यादित प्रमाणात मात्रा पोहोचत असल्याने त्यातूनही प्रतिरोध सुरू होतो. त्यामुळे या औषधाने बुरशी संसर्ग बरा होत नाही. एखाद्याला शेंगदाण्याची ॲलर्जी असेल तर त्याला दीर्घकाळ थोड्या प्रमाणात शेंगदाणा खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यातून त्याची शेंगदाण्यातील ॲलर्जीविरोधात त्याची प्रतिकारशक्ती तयार होते. बुरशीबाबतही असाच प्रकार आहे. त्यांच्यापर्यंत थोड्या प्रमाणात प्रतिबंधक औषध पोहोचल्याने त्या प्रतिरोध तयार करतात.

प्रतिरोध कुठून निर्माण होतो?

शेतीमध्ये बुरशीप्रतिबंधक औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संस्थेच्या अंदाजानुसार, बुरशीप्रतिबंधकांचा वापर थांबविल्यास सुमारे २ अब्ज जनतेला लागेल एवढे अन्न उत्पादन कमी होऊ शकते. अनेक पिकांमध्ये बुरशीप्रतिबंधकांचा वापर होतो. त्यातून ही प्रतिबंधके त्या पिकाच्या उत्पादनात पोहोचतात. त्या उत्पादनांमध्ये त्यांना प्रतिरोध तयार होतो. नंतर तोच प्रतिरोध मानवापर्यंत पोहोचतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

सर्वाधिक संसर्ग कशाचा?

सर्वाधिक बुरशी संसर्ग कॅन्डिडा आणि ॲस्परगिलस या प्रकारच्या बुरशींचा होतो. ॲस्परगिलसचा परिणाम प्रामुख्याने फुप्फुसांवर होतो. याचवेळी कॅन्डिडा हा प्रकार रक्तामार्गे पसरून विविध अवयवांवर परिणाम करतो. त्यात डोळे, हाडे, यकृत आणि प्लीहा यांचा समावेश आहे. मानवाच्या चयापचय संस्थेत जीवाणूंसोबत बुरशीही असते. मात्र, नुकतीच शस्त्रक्रिया झालेल्या अथवा आजारामुळे अवयवांभोवतीची सौम्य पेशींवर परिणाम झालेल्या व्यक्तींमध्ये संसर्गाची बाधा वाढते. कारण अवयवांभोवतीच्या सौम्य पेशी संसर्गास कारणीभूत ठरणाऱ्या पॅथोजनपासून संरक्षण करतात. परंतु, बुरशीचे घटक हेच स्वत: पॅथोजन होऊन संसर्ग निर्माण करतात. त्यामुळे बुरशीमुळे होणारा आणि त्यापासून निर्माण होणारा धोका दिवसेंदिवस चिंताजनक पद्धतीने वाढत आहे.

sanjay.jadhav@expressindia.com