Underground City Under Pyramids: इटली आणि स्कॉटलंडमधील वैज्ञानिकांनी एका संशोधनात गिझाच्या पिरॅमिड खाली एक विशाल भूमिगत शहर शोधल्याचा दावा केला आहे. या संशोधनासाठी संशोधकांनी नवीन रडार तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. मात्र, काही तज्ज्ञांनी या संशोधनातील दाव्यांना खोटं आणि अतिशयोक्तिपूर्ण ठरवत तो नाकारला आहे.
इजिप्तमधील ‘भूमिगत शहरा’चा शोध
खाफ्रे पिरॅमिडचा अभ्यास करणाऱ्या इटालियन आणि स्कॉटिश वैज्ञानिकांनी इजिप्तमधील गिझाच्या पिरॅमिडच्या खाली एक विस्तीर्ण शहर असल्याचा दावा केला आहे. या संशोधनात सहभागी असलेल्या इटलीच्या पिसा विद्यापीठातील कोराडो मलांगा आणि स्कॉटलंडमधील स्ट्रॅथक्लाइड विद्यापीठाचे फिलिपो बिओंडी यांनी गिझामधील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या खाफ्रे पिरॅमिडची तपासणी केली. या अभ्यासामुळे सॅटेलाइट डेटाचे विश्लेषण आणि पुरातत्त्वीय शोधांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे, असे प्रकल्पाच्या प्रवक्त्या निकोल सिस्कोलो यांनी १५ मार्च रोजी एका पत्रकार परिषदेत सांगितले.
खाफ्रे पिरॅमिड कुठे आहे?
खाफ्रे पिरॅमिड (Khafre Pyramid) इजिप्तमधील गिझा (Giza) येथे आहे. हे कायरो शहराच्या पश्चिमेस वाळवंटात असलेल्या गिझा पठारावर आहे. तिथे खुफू, खाफ्रे, आणि मेन्काउरे हे इजिप्तमधील तीन प्रसिद्ध पिरॅमिड्स आहेत. खाफ्रे पिरॅमिडला दुसऱ्या क्रमांकांचा सर्वात मोठा पिरॅमिड मानलं जातं. हे इजिप्तचा चौथा फॅरो खाफ्रे (Khafre/Khefren) याचं थडगं असल्याचं मानलं जातं.
संशोधकांना नेमकं काय आढळून आलं आहे?
वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, खाफ्रे पिरॅमिडच्या खाली आठ उभ्या खोल विहिरी (शाफ्ट्स) आढळल्या असून त्याभोवती नागमोडी गोलाकार पायऱ्या (spiral staircase) आहेत. या पायऱ्या ६,५०० फूटांपेक्षा अधिक अंतरापर्यंत असून पिरॅमिडच्या २,१०० फूट खाली आहेत. प्रत्येक विहिरीच्या भोवती असलेले नागमोडी मार्ग दोन ८० मीटर घनफळ असलेल्या घनाकार रचनांशी जोडलेले आहेत, असं द सनने नमूद केलं आहे. सिस्कोलो यांनी सांगितले की, या रचना तीनही पिरॅमिडच्या खाली आढळल्या असून त्या कदाचित भूमिगत यंत्रणेच्या प्रवेशद्वारांप्रमाणे कार्य करतात.” खाफ्रे प्रोजेक्ट टीमने synthetic aperture radar (SAR) हे तंत्रज्ञान वापरलं. त्यामुळे जमिनीखाली खोलवर असलेल्या रचनांचा अभ्यास करता आला. याच संशोधनात पिरॅमिडच्या आत पाच छोट्या खोलीसारख्या रचना आढळल्या आहेत. त्यापैकी एका खोलीत एक सरकोफॅगस म्हणजेच दगडी शवपेटी होती. ही शवपेटी कधी काळी फॅरोचं थडगं मानली जात होती, असं द न्यू यॉर्क पोस्टने म्हटलं आहे. या अभ्यासात असंही म्हटलं आहे की, पिरॅमिडच्या तळापासून सुमारे ४,००० फूट खाली अजूनही अनेक ओळख न पटलेल्या रचना आहेत. सध्या ओळखण्यात आलेल्या रचना या पिरॅमिड इतक्याच मोठ्या आहेत. त्यांचा संबंध पुराणात सांगितल्या जाणाऱ्या ‘Halls of Amenti’ शी असल्याचं आढळून येतं,” असं सिस्कोलो म्हणाल्या.
“या नव्या पुरातत्त्वीय शोधांमुळे आतापर्यंत अज्ञात असलेल्या भूमिगत संरचनांची ठिकाणं शोधता येऊ शकतात.” डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार संशोधकांनी दोन उपग्रहांचा वापर करून खाफ्रे पिरॅमिडखाली रडार सिग्नल्स पाठवले. हे सिग्नल नंतर ध्वनीलहरींमध्ये रूपांतरित करण्यात आले आणि त्यामुळे वैज्ञानिकांना दगडाच्या आत ‘पाहणं’ शक्य झालं. त्यानंतर डेटा एकत्र करून हाय-रेझोल्यूशन प्रतिमांमध्ये सादर करण्यात आला. त्यातून पिरॅमिडखालील भागाचे चित्रण केलं गेलं. या आधारावर टीमने एक प्राथमिक 3D मॉडेल तयार केलं. या प्रतिमा अधिक स्पष्ट करून पिरॅमिडच्या खाली भूमिगत शहर असल्याचे सिद्ध करू , असं मलांगा यांनी डेली मेलला सांगितलं.
तज्ज्ञांचा नकार
इजिप्तमधील प्राचीन पिरॅमिडांच्या खाली “लपलेलं शहर” असल्याच्या दाव्यांना तज्ज्ञांनी खोटं आणि अतिशयोक्तिपूर्ण असं म्हणत फेटाळून लावलं आहे. डॉ. झाही हवास हे प्रसिद्ध पुरातत्त्ववेत्ते आणि इजिप्तचे माजी मंत्री असून त्यांनी या संशोधनाला पूर्णपणे चुकीचं आणि खोटं वृत्त असं म्हटलं आहे. “पिरॅमिडच्या आत रडार वापरण्याचा दावा खोटा आहे आणि वापरलेली तंत्रं वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित नाहीत,” असं त्यांनी द नॅशनलला सांगितलं. डेली मेलशी बोलताना डेन्व्हर विद्यापीठातील रडार तज्ज्ञ प्रा. लॉरेन्स कॉनियर्स यांनी सांगितलं की इतक्या खोलवर रडार लहरी जाऊ शकतात हे शक्य नाही आणि त्यांनी या दाव्यांना अतिशयोक्ती म्हटलं आहे. मात्र, त्यांनी हे मान्य केलं की, पिरॅमिडच्या खाली काही लहान रचना..जसे की विहिरी किंवा खोल्या असू शकतात. कारण ही जागा प्राचीन लोकांसाठी खास होती. “मायन लोक आणि मध्य अमेरिकेतील इतर प्राचीन संस्कृतींनी अनेक वेळा अशा गुहांच्या प्रवेशद्वारांवर पिरॅमिड बांधले, हे त्यांच्या दृष्टीने पवित्र होते,” असं ते म्हणाले.
संशोधकांना आपला अभ्यास पुढे सुरू ठेवायचा आहे. परंतु, प्रत्यक्ष उत्खननासाठी परवानगी मिळवणं फारच कठीण आहे. संशयाच्या निराकरणासाठी त्या दृष्टिकोनातून उत्खनन हा एकमेव उपाय आहे, असं कॉनियर्स यांनी डेली मेलला सांगितलं. इटालियन आणि स्कॉटिश संशोधकांनी मांडलेल्या या निष्कर्षांवर अजूनही स्वतंत्र संशोधन होणे अद्याप बाकी आहे.