पाकिस्तानमधील एका दहशतवादी गटाच्या तळावर इराणने मंगळवारी रात्री केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे. पश्चिम आशियामध्ये इस्रायल-हमास युद्ध सुरू असताना आणि इराणने तयार केलेल्या आखातातील सशस्त्र संघटना इस्रायल-अमेरिकेच्या आस्थापनांना लक्ष्य करत असताना आता इराण आणि पाकिस्तान हे दोन देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहेत. अतिरेकी संघटनेवर कारवाईचे कारण देऊन त्यांनी एकमेकांच्या सीमांमध्ये हल्ले घडविले आहेत. पाकिस्तान-इराण वादाची पार्श्वभूमी आणि संभाव्य परिणामांचा हा आढावा…
पाकिस्तान-इराण तणावाचे कारण काय?
इराण हा शियाबहुल देश आहे, तर पाकिस्तानमध्ये सुन्नी पंथियांचे वर्चस्व आहे. गेल्या आठवड्यात इराणच्या सिस्तान प्रांतामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ११ इराणी पोलीस अधिकारी मारले गेले होते. हा हल्ला ‘जैश अल-अदल’ या सुन्नींच्या दहशतवादी संघटेनेने केल्याचा आरोप इराणने केला. मंगळवारी रात्री पाकिस्तानच्या सीमेत क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला हा याच अतिरेक्यांना लक्ष्य करून करण्यात आल्याचा दावा इराणच्या निमसरकारी ‘तासनिम वृत्तसंस्थे’ने केला आहे. विशेष म्हणजे ‘जैश अल-अदल’ ही दहशतवादी संघटना इराण नव्हे, तर पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणांवरही दहशतवादी हल्ले करण्यासाठी कुख्यात आहे.
‘जैश अल-अदल’ संघटना काय आहे?
ही अतिरेकी संघटना ‘जैश अल-धुलम’ या नावानेही ती ओळखली जाते. अरबी भाषेत याचा अर्थ ‘न्यायाचे लष्कर’ असा होते. या संघटनेचे सदस्य हे अर्थातच सीमेच्या दोन्ही बाजूंना राहणारे बलोच वंशाचे सुन्नी मुस्लिम आहेत. इराणमधील ‘जुन्दुल्ला गटा’च्या अनेक नेत्यांना अटक झाल्यानंतर २०१२ साली ही संघटना उदयास आली. इराणचा सिस्तान आणि पाकिस्तानातील बलुचिस्तान यांचे स्वतंत्र बलोच राष्ट्र असावे, असे या संघटनेचे उद्दिष्ट आहे. अर्थातच, दोन्ही देशांच्या सरकारांचे या संघटनेशी वाकडे आहे. आपल्या देशात जैश अल-अदलचे अतिरेकी संघटित स्वरूपात नाहीतच, असा पाकिस्तानचा दावा असला तरी बलुचिस्तानच्या दुर्गम भागात काही अतिरेकी लपलेले असू शकतात, असेही तो देश मान्य करतो. उलट या संघटनेला इराणची फूस असल्याचा आरोप पाकिस्तानकडून केला जातो.
इराण-पाकिस्तानच्या हल्ल्यांचे स्वरूप काय?
इराणने यापूर्वीही पाकिस्तानच्या सीमेमध्ये घुसून आपल्या देशात कारवाया करणाऱ्या अतिरेक्यांवर हल्ले केले आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा एकत्रित वापर करून प्रथमच हल्ला झाला आहे. या हल्ल्यात दोन लहान मुले मारली गेल्याचा दावा पाकिस्तानने केला असून इराणने याचा इन्कार केला आहे. केवळ दहशतवाद्यांना टिपण्यासाठी अत्यंत नियंत्रित पद्धतीने हा हल्ला झाल्याचे इराणचे म्हणणे आहे. प्रत्युत्तरादाखल बुधवारी पाकिस्तानने इराणबरोबरचे राजनैतिक संबंध घटविले. तेहरानमधील आपल्या राजदूतांना परत बोलावले व काही काळासाठी मायदेशी गेलेल्या त्या देशाच्या पाकिस्तानातील राजदूतांना ‘इतक्यात येऊ नका’ असे सांगण्यात आले. गुरूवारी सकाळी आणखी एक पाऊल पुढे टाकून इराणच्या सीमेत पाकिस्तानने हल्ले चढविले. यात नऊ नागरिक मारले गेल्याचा दावा इराणने केला आहे, तर आपण केवळ अतिरेक्यांना लक्ष्य केले असा साळसूद पवित्रा पाकिस्तानने घेतला आहे. पाकिस्तानने जशास तसे प्रत्युत्तर दिल्यामुळे दोन्ही देशांतील तणावात कमालीची भर पडली आहे.
हेही वाचा : विश्लेषण: हरित हायड्रोजन म्हणजे काय? ऊर्जा स्वयंपूर्णतेसाठी तो कसा महत्त्वाचा?
पश्चिम आशियातील युद्धाची व्याप्ती वाढणार?
पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या आदल्याच दिवशी इराणने इराक आणि सीरियामध्येही क्षेपणास्त्रे डागली. इस्रायलचे गुप्तहेर केंद्र आणि इराणमध्ये कारवाया करणाऱ्या ‘अतिरेक्यां’ना लक्ष्य करण्यात आल्याचे कारण या हल्ल्यांसाठी देण्यात आले. गाझा पट्टीमध्ये तीव्र संघर्ष सुरू असतानाच इराणची फूस असलेल्या हेझबोला या लेबनॉनमधील संघटनचे इस्रायलबरोबर आणि खटके उडत आहेत. दुसरीकडे इराणचे आणखी एक ‘अपत्य’ असलेले सीरियातील ‘हूथी’ बंडखोर लाल समुद्रात जहाजांना लक्ष्य करीत असून आता अमेरिकेनेही हूथींना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्या परिस्थितीत पाकिस्तान-इराण तणाव जगाची चिंता वाढविणारा ठरू शकतो.
हेही वाचा : कॅनडात कडाक्याच्या थंडीत भारतीय विद्यार्थ्यांचे आंदोलन; नेमके कारण काय? जाणून घ्या सविस्तर
भारत, चीन, रशियाची भूमिका काय असेल?
इराणने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’बाबत भारताने सावध भूमिका घेतलेली आहे. अर्थातच, भारताच्या या भूमिकेबाबत आश्चर्य नाही. मात्र पाकिस्तान-इराण संघर्षाने चीनची कोंडी झाली आहे. पाकिस्तान हा चीनचा सर्वकालीन मित्र आहे. चीनने पाकिस्तानात बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्हच्या नावाखाली मोठी गुंतवणूक केली आहे. चीन आणि इराणचेही सख्य आहे. चीनला कच्च्या तेलाचा पुरवठा इराणकडूनच होत असतो. त्यामुळेच पाकिस्तान-इराण संघर्ष भडकताच चीनने शांततेचे आवाहन करून मध्यस्थीची तयारी दर्शविली आहे. दोन्ही देशांमध्ये आरपारचे युद्ध पेटलेच तर अमेरिका पाकिस्तानच्या आणि रशिया इराणच्या बाजूने उभा ठाकेल, याबाबत मात्र कुणाला संशय नाही.
amol.paranjpe@expressindia.com