ट्विटर वापरकर्त्यांना अनेक वर्षांपासून निळ्या रंगातील चिमणीचा लोगो असलेले ट्विटर वापरण्याची सवय झाली होती. मायक्रोब्लॉगिंगसाठी जगप्रसिद्ध असलेल्या ट्विटरवर अनेक सेलिब्रिटी, राजकारणी, प्रभावशाली व्यक्ती आपले विचार व्यक्त करत असतात. १४० अक्षरांपासून सुरू झालेला अभिव्यक्तीचा प्रवास हळूहळू २८० अक्षरे आणि आता त्याहीपुढे मोठ्या मजकुरापर्यंत पोहोचला. एलॉन मस्क यांनी ऑक्टोबर २०२२ पासून जेव्हा ट्विटर ताब्यात घेतले आहे, तेव्हापासून ते सातत्याने त्यात बदल करत आले आहेत. आता ट्विटरचा लोगो लवकरच बाद होणार आहे. त्यामुळे ट्विटरचा आत्मा हरवेल, अशी भीती वापरकर्ते व्यक्त करत आहेत. एलॉन मस्क यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले की, ट्विटरचा लोगो आता इंग्रजी आद्याक्षर एक्स (X) असेल. तसेच एक्स डॉट कॉम हे नवे संकेतस्थळही सुरू करण्यात आले आहे. या नव्या संकेतस्थळाची युआरएल लिंक क्लिक केल्यानंतर ‘ट्विटर डॉट कॉम’वर नेण्यात (रिडायरेक्ट) येते. काही महिन्यानंतर कंपनीचे नाव अधिकृतरित्या एक्स कॉर्प करण्यात येईल, अशी माहिती द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.

ट्विटरच्या नावात बदल करणे, त्याचा सुपरिचित असलेले लोगो काढून टाकणे, हे वरवरचे बदल आहेत. यातून खरेतर मस्क यांचा ट्विटरसारखे महत्त्वाचे व्यासपीठ हाताळण्यातील धांदलयुक्त स्वभाव दिसून येत आहे. मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर संवेदनशील मजकूरावर नियंत्रण ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांची कंपनीतून गंच्छती केली. मस्क यांच्या लहरीपणामुळे काही वापरकर्त्यांवर उगाचच निर्बंध घातले गेले, तर निर्बंध असलेल्यांना ट्विटर पुन्हा वापरण्याची मुभा दिली. तसेच पत्रकार आणि संशोधकांप्रती ट्विटर जबाबदार उरलेले नाही.

एकेकाळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कैवार घेणाऱ्या एलॉन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यापासून उत्तरदायित्त्वाचे उपाय सोडून दिले आहेत. द्वेषयुक्त मजकूर किंवा चुकीच्या माहितीच्या ट्रेंडचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी ट्विटरचा मोफत वापर करून देण्यास मस्क यांनी निर्बंध घातले आहेत.

ट्विटरमध्ये काय बदल झाले?

ट्विटरचा निळ्या रंगातील चिमणीचा लोगो आता बदलण्यात आला आहे. त्याजागी इंग्रजी आद्याक्षर ‘एक्स’चा लोगो दिसतोय. ट्विटरमधील सर्व कर्मचाऱ्यांना मस्ककडून ईमेल पाठवून कंपनीचे नाव आता एक्स झाले असल्याचे कळविण्यात आले आहे आणि ट्विटरच्या ईमेलवरून ईमेल पाठविण्याची मस्क यांची बहुधा ही शेवटची वेळ आहे, असे प्लॅटफॉर्मर या संकेतस्थळाने सांगितले आहे.

एलॉन मस्क यांना एक्स या आद्याक्षराशी विशेष प्रेम किंवा आकर्षण असल्याचे अनेकदा दिसले. १९९९ साली एक्स डॉट कॉम या नावाने ऑनलाईन बँक उघडण्यात आली होती, ज्याचे मस्क हे सह संस्थापक होते. त्यानंतर बँकेचे रूप ‘पेपाल’ (Paypal) च्या माध्यमातून समोर आले. अंतराळ क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मस्क यांच्या क्षेपणास्त्र कंपनीचे नाव ‘स्पेसएक्स’ (SpaceX) ज्यामध्येही एक्स आहेच. मस्क यांची मोटार उत्पादन क्षेत्रातील टेस्ला या कंपनीने पहिले एसयुव्ही मॉडेल बाजारात आणले त्याचे नावही ‘मॉडेल एक्स’ असे ठेवण्यात आले होते.

ट्विटर घेताना कोणती आश्वासने दिली आणि पुढे काय केले?

ट्विटर विकत घेण्याआधी मस्क यांनी अनेक आश्वासने दिली होती, त्याबद्दल द इंडियन एक्सप्रेसने आढावा घेतला आहे. ट्विटर घेण्याआधी मस्क ‘बॉट’ च्या (बॉट तंत्रज्ञानाचा वापर करून फेक अकाऊंट्सचा सुळसुळाट) समस्येवरून वैतागले होते. त्यांना याबाबत काहीतरी करायचे होते. ट्विटर हे मुक्त आणि निर्भिड अभिव्यक्तीचे व्यासपीठ असेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

बॉट्स आणि द्वेषपूर्ण मजकूरात वाढ

मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर मजकुरावर काय परिणाम झाला? याचा शोध घेण्यासाठी दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील माहिती विज्ञान विभाग, ओरेगन विद्यापीठ, लॉस एंजेलिस आणि मर्स्ड मधील कॅलिफोर्निया विद्यापीठ या संस्थांनी एकत्र येऊन एक सर्व्हे केला. यावर्षी एप्रिल महिन्यात सदर सर्व्हे सार्वजनिक करण्यात आला. मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यापासून बॉट्स आणि द्वेषपूर्ण मजकूराच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यापासून १ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर २०२२ या काळात द्वेषपूर्ण मजकूर पोस्ट होण्याची जी सरासरी होती, त्यात नाट्यमय पद्धतीने अचानक मोठी वाढ झाल्याचे दिसून आले, असे या अभ्यासाअंती समोर आले आहे. सुरुवातीच्या काळात द्वेषपूर्ण मजकूराची संख्या अधिक दिसल्यानंतर त्यानंतरच्या महिन्यात ही संख्या दिवसेंदिवस वाढतच गेल्याचे लक्षात आले आहे. प्रत्येक महिन्यात मागच्या महिन्याच्या आकडेवारीला मागे टाकले जात आहे. मस्क यांनी बॉट्सची समस्या संपवू, असे आश्वासन दिले होते, मात्र मस्क यांनी ताबा घेतल्यानंतर बॉट्सची संख्या कमालीने वाढली असल्याचे विद्यापीठांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.

पारदर्शकतेकडे डोळेझाक

तसेच मस्क यांच्या कार्यकाळात ट्विटरच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. फेब्रुवारी २०२३ मध्ये मस्क यांनी जाहीर केले होते की, ट्विटर एपीआयचा (Twitter API) वापर संशोधनकर्त्यांना मोफत करून दिला जाईल. मात्र त्यानंतर अचानक त्यासाठी पैसे मोजण्यास (Paid Version) सांगण्यात आले. मस्क यांच्या या घुमजाव वृत्तीचा फटका ऑनलाईन द्वेषपूर्ण भाषण आणि ऑनलाईन छळाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना नक्कीच बसला आहे. ट्विटर एपीआयच्या माध्यमातून संशोधक आणि विविध विद्यापीठे संशोधन करत होते. पण एपीआयसाठी पैसे आकारल्यामुळे अनेक संशोधक आणि विद्यापीठांनी संशोधन करण्याचा मार्ग सोडून दिला.

दरम्यान, मस्क यांच्या काळात माध्यमांच्या प्रश्नांना प्रतिसाद देण्याचीही प्रथा जवळपास बंद करण्यात आली आहे. ट्विटरच्या press@twitter.com या ईमेलवर काही शंका पाठविल्यास त्यावर ‘पूप’ (poop) इमोजीचा रिप्लाय पाठवला जात होता. (पूप हे लहान मुलाची विष्ठा दाखविण्यासाठीचे कार्टून चित्र आहे) दोन दिवसांपूर्वीच्या ताज्या माहितीनुसार माध्यमांच्या ईमेलला आता पूप इमोजी न पाठवता, ‘आम्ही आपल्याला लवकरच प्रत्युत्तर देऊ’ असा संदेश पाठविण्यात येत आहे.

मुक्त भाषण (पण नियम व अटी लागू)

ऑक्टोबर २०२२ मध्ये ४४ अब्ज डॉलर खर्च करून मस्क यांनी ट्विटर विकत घेतले, त्यानंतर महिन्याभरापर्यंत ते स्वतःला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भोक्ता म्हणवून घेत होते. लोकशाही कार्यान्वयीत करण्यासाठी मुक्त अभिव्यक्तीची गरज आहे आणि ट्विटर असे व्यासपीठ आहे, जिथे मानवतेच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा केली जाते.

तथापि, काही दिवसांतच मस्क यांचा नूर पालटला. स्वतःला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षक म्हणवून घेता घेता आता मस्क हे देशांच्या (म्हणजे ज्या ज्या देशात ट्विटर कार्यरत आहे) कायद्याचे पालन करण्यात धन्यता मानत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी सांगितले होते की, सोशल मीडियासाठी भारताचे कायदे अतिशय कठोर आहेत. त्यामुळे ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना तुरुंगात पाठविण्याचा धोका पत्करण्याऐवजी ते सरकारच्या निर्बंधाचे पालन करतील.

भारत सरकारच्या निर्बंधावर ट्विटरने दाखल केलेल्या खटल्यांवरही मस्क यांनी टीका केली होती. जुलै २०२२ रोजी ट्विटरने दाखल केलेल्या खटल्यामध्ये निकाल केंद्र सरकारच्या बाजूने लागला, मात्र भारताच्या ऑनलाईन सेन्सरशिपला कुणीतरी आश्वासकरित्या आव्हान दिले, याबद्दल ट्विटरचे कौतुक होत होते. तथापि, ट्विटरचे हस्तांतरण मस्क यांना करत असताना आधीच्या कंपनीने आपल्यापासून भारतात चाललेल्या खटल्याची माहिती लपवून ठेवली, असा आरोप मस्क यांनी केला होता. त्यांचे म्हणणे होते की, अशा कृतीमुळे देशातील त्यांच्या व्यवसायाला धोका निर्माण होऊ शकतो.

Story img Loader