दिशा काते
सध्या ऑक्टोबर हिटचा तडाखा राज्यभराला विशेषत: मुंबईला जाणवत आहे. घामाघूम करणारा उकाडा असह्य होत असतानाच कडक उन्हाचे चटके शरीराला जाणवण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामागे अतिनील किरणांचा तीव्र मारा जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. अलीकडच्या काळात मुंबईचा अतिनील किरण निर्देशांक (यूव्ही इंडेक्स) धोकादायक पातळीवर पोहोचल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर हा यूव्ही इंडेक्स काय असतो, अतिनील किरणे काय परिणाम करतात, आदी बाबींचा आढावा.
अतिनील किरणांचा प्रादुर्भाव केव्हा वाढतो?
सामान्यपणे पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण ध्रुव प्रदेशात ओझोन पातळी कमी होण्याचं प्रमाण जास्त असते आणि ३० अंश उत्तर ते ३० अंश दक्षिण अक्षवृत्त प्रदेशात ते कमी असतं. परंतु या अक्षवृत्त प्रदेशात सूर्यप्रकाशाचं प्रमाण नेहमीच जास्त असल्यामुळे ओझोन कमी झाला नाही तरीसुद्धा अतिनील किरण नेहमीच जास्त असतात. भारत हा उष्ण कटिबंधीय देश असल्यामुळे ओझोनचं वातावरणातलं प्रमाण थोडंसं कमी झालं तरीही अतिनील किरणांचा प्रादुर्भाव वाढतो.
आणखी वाचा-विश्लेषण: आर्थिक दुर्बलांचे आरक्षण वादात का?
अतिनील निर्देशांक म्हणजे काय?
किरणांची तीव्रता मोजण्यासाठी जो निर्देशांक वापरला जातो त्याला अतिनील निर्देशांक म्हटलं जाते. त्यानुसार ०-२ हा निर्देशांक सर्वात कमी धोका सुचवतो, ३-४ निर्देशांक कमी धोका, ५-६ निर्देशांक मध्यम धोका, ७-१० मोठा व दहापेक्षा जास्त निर्देशांक सर्वाधिक धोका सुचवतो. सकाळी व संध्याकाळी सूर्यकिरण तिरक्या दिशेने येतात तेव्हा ती विस्तृत ओझोन थरातून पृथ्वीवर येतात व त्यामुळे अतिनील किरणांचं प्रमाणही कमी होतं. मात्र सूर्य डोक्यावर येऊ लागला की साधारणपणे दुपारी १२ ते ३ या वेळेत या किरणांचा जास्त प्रादुर्भाव जाणवतो. सूर्यकिरणांचा हा कोन अक्षवृत्तानुसार बदलत असतो. दुपारी विषुववृत्तीय व उष्ण कटिबंधीय प्रदेशात आणि उन्हाळ्यात तो नेहमीच जास्त असतो.
पर्यावरणावर या अतिनील किरणांचा काय परिणाम होतो?
पृथ्वीच्या पर्यावरणावर या किरणांचा फार मोठा परिणाम होतो. तीनदशांश ते चारदशांश मायक्रोमीटर तरंगलांबीच्या ऊर्जेला यूव्ही-ए असं संबोधलं जातं यामुळे त्वचेत ‘ड’ जीवनसत्त्व तयार होतं मात्र त्यामुळे त्वचा होरपळणं , मोतीबिंदू अशा समस्या निर्माण होतात. एकोणतीस शतांश ते बत्तीस शतांश मायक्रोमीटर तरंगलांबीची ऊर्जा वातावरणात पूर्णपणे शोषली जाते व ती पृथ्वीवर पोहोचत नाही.
आणखी वाचा-अन्न, औषध, विजेचा तुटवडा, पॅलेस्टिनींपुढे संकटांचा डोंगर; गाझा पट्टीची सद्यस्थिती काय?
अतिनील किरणांचे किती प्रकार आहेत?
अतिनील किरणांचे ‘ए’,‘बी’,‘सी’ असे तीन प्रकार आहेत. यूव्ही-ए हे किरण यूव्ही बी आणि यूव्ही सी या किरणापेक्षा कमी प्रभावशाली आहेत म्हणून हे डोळ्यांच्या पारदर्शक भागांतून मागच्या पडद्यापर्यंत पोहोचू शकतात. या किरणांचे डोळ्यांवर दुष्परिणाम जाणवतात. यूव्ही-बी हे किरण कमी फिल्टर होतात त्यामुळे याचा परिणाम शरीरावर होतो जसे की त्वचेचे अनेक प्रकारचे विकार. यूव्ही-सी हे सर्वात घातक किरण आहे मात्र ओझोन वायूच्या थरामुळे त्याचा परिणाम शरीरावर होत नाही.
पृथ्वीपर्यंत अतिनील किरणे पोहोचण्याची कारणे काय?
वातावरणातील ११ ते ५० किलोमीटर उंचीच्या स्थिरांबर या प्रदेशातल्या ओझोनचे प्रमाण कमी होऊ लागलं आहे. ओझोनचे प्रमाण जसे नष्ट होऊ लागले तशी अतिनील ऊर्जा वातावरणातून पृथ्वीपर्यंत सहज पोहोचू लागली. ही घटना प्रामुख्याने पृथ्वीचे ध्रुवप्रदेश व त्यांच्या जवळपासच्या विभागांत वर्षाच्या काही विशिष्ट वेळा घडू लागली.
अतिनील किरणांची तीव्रता कमी करण्यासाठी काय करावे लागेल?
अतिनील किरणांची वेगाने वाढणारी तीव्रता कमी करण्यासाठी ओझोन थराचा ऱ्हास थांबवणं गरजेचे आहे. त्यासाठी पृथ्वीवरच्या क्लोरोफ्लुरोकार्बनचे प्रमाण ८५ टक्क्यांनी कमी व्हायला हवे. मॉन्ट्रिअल प्रोटोकॉल या आंतरराष्ट्रीय सहमतीचं पालन सर्व देशांनी केलं आज झालेला ओझोनचा ऱ्हास भरून काढण्यासाठी पुढची ५० वर्षे तरी हवीत असे गणित वैज्ञानिकातर्फे मांडण्यात आले आहे. हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळे ही प्रक्रिया सन २०५० पुढं १५ ते २० वर्षांनी थांबेल असाही एक अंदाज आहे.