कतार देशात विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण जगाचे या स्पर्धेकडे लक्ष आहे. फुटबॉल खेळातील थरार पाहण्यासाठी जगभरातील लाखो फुटबॉलप्रेमी सध्या कतारमध्ये हजेरी लावत आहेत. असे असताना कतारने मात्र ही स्पर्धा सुरु होण्याच्या दोन दिवसांआधी स्टेडियममध्ये बिअरच्या विक्रीवर बंदी घातली आहे. यजमान कतारच्या या निर्णयाचे काही लोकांनी स्वागत केले आहे. तर काहींनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर इस्लाम धर्मात दारूचे सेवन करण्यावर बंदी का आहे? वेगवेगळ्या इस्लामिक देशांत मद्यविक्री तसेच मद्यसेवनासंदर्भात काय कायदे आहेत? या कायद्यांची खरंच अंमलबजावणी होते का? यावर नजर टाकुया.
मद्याबाबत कुराणमध्ये काय आहे?
इस्लाममध्ये मद्यप्राशन ‘हराम’ मानले जाते. त्यासाठी इस्लामविषयक ज्ञान असणारे तसेच मुस्लीम धर्मातील संस्थांकडून कुराणचा संदर्भ दिला जातो. तसेच मद्यप्राशन हे राक्षसाचे काम असून त्यापासून दूर राहावे असे सांगितले जाते. मुस्लीम धर्मीय त्यांच्या दैनंदीन जीवनातील वेगवेगळ्या कामांचा संदर्भदेखील कुराणमध्ये शोधतात.
मद्याप्रती मुस्लिमांचा दृष्टीकोन कसा आहे?
इस्लाममध्ये मद्यप्राशन करणे हराम आहे, असे म्हटलेले असले तरी सर्व मुस्लीम धर्मीय लोक मद्यापासून दूर राहात नाहीत. काही मुस्लीम धर्मीय खासगीमध्ये किंवा इतरांसह मद्यप्राशन करतात. प्यू रिसर्च सेंटर या वेगवेगळ्या विषयांवर सर्वे आणि संशोधन करणाऱ्या संस्थेने मुस्लीम देशांमध्ये याबाबबत सर्वे केला होता. अर्ध्यापेक्षा जास्त मुस्लीम देशांत हा सर्वे करण्यात आला होता. या सर्वेक्षणानुसार बहुतांश मुस्लीम धर्मियांनी मद्यप्राशन नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे, असे म्हटले होते. २०१३ साली करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात दहापैकी एका व्यक्तीने नैतिकदृष्या मद्यप्राशन स्वीकारार्ह आहे, असे म्हटले होते. तर काही लोकांनी मद्यप्राशानास आक्षेप नसल्याचे म्हटले होते. थायलंड, घाना, मलेशिया, इंडोनेशिया, पाकिस्तान यासारख्या देशांत हा सर्वे करण्यात आला होता. यामध्ये एकूण ३८ हजार लोकांची मतं जाणून घेण्यात आली होती.
मुस्लीम देशांमधील मद्यबंदीची काय स्थिती?
काही इस्लामिक देशांत दारुविक्रीस परवानगी आहे. मात्र त्यासाठी कठोर नियम आहेत. मद्यविक्री कोठे केली जावी? मद्यप्राशन कोठे करावे? यासंबंधी वेगवेगळ्या मुस्लीम देशांत वेगवेगळे नियम आहेत. सौदी अरेबियासारख्या देशात मद्यावर पूर्णपणे बंदी आहे. या देशात मद्यप्राशन केल्यास शिक्षेची तरतूद आहे. तसेच तुरुंगावसही होऊ शकतो. परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवले जाऊ शकते. दुबईसारख्या देशात मात्र मद्यविक्रीसंबंधीचे नियम तितके कडक नाहीत. दुबईमध्ये वेगवेगळे बार, नाईटक्लब आहेत. जॉर्डनमध्ये मद्यविक्री करण्यास कोणतेही निर्बंध नाहीत. इजिप्त देशातही मद्यविक्रीस परवानगी आहे. मात्र इजिप्तमधील साधारण ७९ टक्के मुस्लिमांनी मद्यप्राशन चुकीचे असल्याचे मत नोंदवलेले आहे.
नियमांना डावलून मद्यविक्री
काही देशांमध्ये मद्यविक्री तसेच मद्यप्राशन करण्यास पूर्णपणे बंदी आहे. मात्र तरीदेखील अवैध पद्धतीने मद्यविक्री केली जाते. तसेच मद्यशौकीन वेगवेगळ्या पद्धतीने मद्याची खरेदी करतात. सौदी अरेबियातील मद्यबंदी उठवण्याची मागणी केली जात आहे. या देशात वेगवेगळ्या पद्धतीने मद्याची खरेदी-विक्री केली जाते. येथे बुटाच्या सॉक्समध्ये व्हिस्की आणली जाते. तर पेप्सी असल्याची बतावनी करून येथे बिअर आणण्याचे प्रयत्न झाले आहेत.
कतारमध्ये मद्यप्राशनाबाबतचे नियम काय आहेत?
कतारमध्ये मद्याची खरेदी आणि विक्रीवर कठोर निर्बंध आहेत. येथे हॉटेल्स, बारमध्ये मद्यविक्री करण्यास परवानगी आहे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेदरम्यान स्टेडियम आणि फॅन झोनमध्ये बिअरची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र शुक्रवारी या नियमात बदल करण्यात आला. या नव्या नियमानुसार स्टेडियममध्ये अल्कोहोलचा समावेश नसलेल्या बिअरचीच विक्री करण्यास परवानगी असेल, असे सांगण्यात आले.