islamophobia of china पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इजिप्त व अमेरिकेचा सहा दिवसांचा दौरा नुकताच पूर्ण झाला. संपूर्ण जगाचेच लक्ष पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याकडे लागले होते. त्यांच्या अमेरिका दौऱ्यासंदर्भात भाष्य करताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘सीएनएन’ला दिलेल्या मुलाखतीत ‘हिंदू बहुसंख्याक असलेल्या भारतात मुस्लीम अल्पसंख्याकांचे रक्षण केले जावे’,आणि तसे झाले नाही तर भारताची फाळणी होण्याची शक्यता आहे, असे विधान केले होते. बराक ओबामांच्या या विधानानंतर संमिश्र प्रतिक्रियांची वावटळ उठली. परंतु या सर्वात ओबामांच्या विधानावर चीनने केलेले भाष्य महत्त्वाचे ठरते. चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ या सरकारी प्रसारमाध्यमाने केलेल्या ट्विटमध्ये ओबामांच्या विधानाचे समर्थन करण्यात आले आहे. याच ट्विटमध्ये भारतातील वांशिक भेदामुळे भारताची फाळणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर गेल्या अनेक वर्षात विशेषतः २००९ पासून चीनकडून भारताच्या फाळणीविषयी वेगवेगळी भाष्ये करण्यात आली आहेत.
चीन एकीकडे भारतातील अल्पसंख्याकांविषयी काळजी व्यक्त करत आहे; तर दुसरीकडे चीनमधील मुस्लीम समाजाच्या आक्रोशाकडे त्यांचा कानाडोळा सुरू आहे. किंबहुना चीन मधील मुस्लीम समाजाची व्यथा जगजाहीर असूनदेखील चीनच्या आर्थिक प्राबल्यामुळे इस्लामिक देशांनीही यावर मौन बाळगले आहे. याच पार्श्वभूमीवर चीनची स्वदेशीय मुस्लीम समाजाविषयीची भूमिका समजावून घेणे संयुक्तिक ठरावे.
आणखी वाचा: विश्लेषण: रशिया – युक्रेन नंतर इराण – अफगाणिस्तान युद्धाची चाहूल? काय आहे नेमके प्रकरण?
चीनचा इस्लामोफोबिया
मुस्लीम धर्माचा चीन मधील इतिहास भारतापेक्षा जुना आहे. इसवी सनाच्या सहाव्या शतकात रेशीम मार्गाच्या माध्यमातून इस्लाम चीनमध्ये पोहोचला यावर इतिहासकारांचे एकमत आहे. शिन्जियांग, किंघाई, गान्सू, युनान हे चीनमधील मुस्लिम बहुल प्रांत आहेत. या पैकी शिन्जियांग प्रांत सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्येचा प्रदेश आहे. या भागातील मुस्लीम ‘उइघर/उइगर’ म्हणून ओळखले जातात. चीनकडून राबविण्यात येणाऱ्या मुस्लिमविरोधी धोरणांचा अंमल या भागात तीव्र आहे. हा भाग चीनच्या वायव्य दिशेला असून शिन्जियांग हे मंगोलिया, रशिया, कझाकस्तान, किर्गिझिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत या राष्ट्रांनी वेढलेले चीनच्या प्रशासकीय क्षेत्रांपैकी सर्वात मोठे क्षेत्र आहे. याच भागात चीन सरकारने मुस्लिमांच्या धर्मपरिवर्तनासाठी ४०० हून अधिक नजरबंदी शिबिरे बांधली आहेत. या भागातील मुस्लीम हे तुर्की वंशाचे आहेत. या भागातील नागरिकांची संस्कृती मध्यवर्ती चीनपेक्षा वेगळी असल्याचे प्रथमदर्शनीच लक्षात येते. हा भाग मध्य आशियाशी जोडला गेल्याने येथील स्थानिकांच्या राहणीमानावर, खाद्य संस्कृतीवर चीनपेक्षा मध्य आशियायी मुस्लीम देशांचा प्रभाव असल्याचे अधिक जाणवते. तर उर्वरित चीन हा ‘हान’ वंशीय आहे. या हान वंशीय लोकांचा उइघर मुस्लीम, तिबेटीय बौद्ध, मांचू यांच्याशी वांशिक संबंध नाही. त्यामुळेच शिन्जियांग या भागातील स्थानिकांचे वांशिक भिन्नत्व नष्ट करण्यासाठी चीनकडून विशिष्ट योजना राबविण्यात येत आहेत. या चीनच्या धोरणांचे वर्णन आंतराष्ट्रीयस्तरावर ‘चीनचा इस्लामोफोबिया’ असे करण्यात येते.
उइघर मुस्लिमांवर होणारी दडपशाही
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या इस्लामविरुद्धच्या मोहिमेमार्फत उइघर मुस्लिमांवर होणाऱ्या दडपशाहीवर सेंटर फॉर उइघर स्टडीज (CUS) यांनी एक तपशीलवार अहवाल “Islamophobia in China and Attitudes of Muslim Countries, 2023” (चीनमधील इस्लामोफोबिया आणि मुस्लीम देशांचा दृष्टिकोन) या नावाने प्रकाशित केला आहे. चीन मध्ये राबविण्यात येणाऱ्या मुस्लीम विरोधी मोहिमांची अंमलबजावणी सगळ्यात जास्त शिन्जियांग या भागात करण्यात येते. हा भाग तुर्कस्थानच्या सीमेलगत असून चीनचा स्वायत्त प्रदेश म्हणून ओळखला जातो. CUS ने प्रकाशित केलेल्या अहवालात १९४९ मध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना स्थापन झाल्यापासून चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने (सीसीपी) इस्लाम आणि मुस्लिमांना “सिनिकाइज” करण्यासाठी केलेल्या ऐतिहासिक आणि पद्धतशीर प्रयत्नांवर प्रकाश झोत टाकण्यात आलेला आहे. इतकेच नाही तर या शोध निबंधात शिन्जियांग या भागात मुस्लिमांचा नरसंहार कसा झाला आणि इतर इस्लामिक राष्ट्रांची या संदर्भात नेमकी मूक भूमिका काय होती? यावरही भाष्य करण्यात आलेले आहे.
इस्लाम आणि चीन
CUS ने प्रकाशित केलेल्या शोधनिबंधात चीनमध्ये इस्लाम हा बाहेरून आलेला धर्म म्हणून कशाप्रकारे वागणूक दिली जाते यावर सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. या अहवालानुसार चीनमध्ये मुस्लिमांना मागास तसेच परकीय समजले जाते. चीनमध्ये मुस्लिमांना देण्यात येणाऱ्या दुय्यम वागणुकीची सुरुवात १९४९ नंतर पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (पीआरसी) च्या उदयानंतर झाली आणि गेल्या ७० वर्षांच्या CCP राजवटीत ती आणखीनच बिघडल्याचे अहवालात म्हटले आहे. या अहवालात नमूद केल्याप्रमाणे चीनमध्ये मुस्लिमविरोधी भावना तीव्र आहेत. या इस्लाम विरोधी प्रचारास मुख्यतः चीनची प्रसार माध्यमे कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. शी जिनपिंग यांनी पदभार स्वीकारल्यापासून चीनमध्ये मुस्लिमांबद्दलचे वैर वाढले आहे.
आणखी वाचा: विश्लेषण: चीनच्या कावेबाजपणाला भारतीय मुत्सद्देगिरीचे उत्तर!
चीनमध्ये इस्लामची तुलना संसर्गजन्य रोगाशी
सध्या उघडकीस आलेल्या वेगवेगळ्या अहवालांनुसार चीनला नापसंत असलेल्या इस्लाम आणि त्यावर केलेल्या कारवाईचे उत्तम उदाहरण शिन्जियांगमधील उइघर येथील मुस्लिम समाजावरील निर्बंध हेच असू शकते. या भागात “पुनर्शिक्षण आणि पुनर्वसन” या नावाखाली लाखो मुस्लिमांना चिनी अधिकाऱ्यांनी तुरुंगात डांबले. या भागातील हजारो मशिदी उद्ध्वस्त केल्या असून चिनी अधिकारी इस्लामची तुलना “संसर्गजन्य रोग” आणि उइघर मुस्लिमांची तुलना “संक्रमित लोक” अशी करतात.
हिजाब, हलाल यांवर चीनमध्ये बंदी
CUS ने प्रकाशित केलेल्या अहवालात चीनच्या उघड व छुप्या अशा दोन्ही स्वरूपाच्या मुस्लिमविरोधी पाठिंब्यासंबंधात चर्चा करण्यात आली आहे. यात नमूद केल्याप्रमाणे हिजाब परिधान केलेल्या स्त्रियांची उघड थट्टा करण्यात येते. रुग्णालये आणि हॉटेल्स सारख्या सार्वजनिक ठिकाणी हिजाब वापरावर बंदी आहे. मुस्लीम धर्माचे पालन केल्यास नोकरी मिळत नाही. चीनमध्ये इस्लामिक पोशाख आणि रीतिरिवाजांवर प्रतिबंध आहे. चिनी पोलिसांनी उइघर महिलांसाठी ड्रेस कोड लागू केला होता, ज्या अंतर्गत मुस्लिम महिलांना लांब कपडे घालण्याची परवानगी नाही. २०२० साली, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत पोलिसांनी “खूप लांब” म्हणून उइघर महिलांचे कपडे कापल्याचे उघडकीस आले होते.
चीन सरकारची मशिदींवर कारवाई
गेल्याच महिन्यात चीनच्या युनान प्रांतातील १४ व्या शतकातील मशिदीवर करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. चीन सरकारकडून करण्यात आलेल्या कारवाईत चीनमधील त्या मशिदीचा घुमट आणि मिनार नष्ट झाल्यामुळे स्थानिक मुस्लीम समुदायामध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय मीडियाच्या अहवालानुसार चीनच्या नागू जिल्ह्यात असलेल्या या ऐतिहासिक मशिदीवरील बांधकाम न्यायालयाकडून अनधिकृत मानले गेले होते. नागू हा चीनमधील बहुसंख्य स्थानिक मुस्लिमांचा प्रदेश आहे. या मशिदीच्या जिर्णोद्धाराच्या निमित्ताने मिनार व घुमटाचे काम करण्यात आले होते. परंतु हे काम बेकायदेशीर असल्याचे मानून २०२० सालामध्ये घुमट आणि मिनार यांचे बांधकाम थांबवण्याचा न्यायालयाने आदेश दिला होता. परंतु त्यानंतरही मशिदीचे बांधकाम चालूच होते. न्यायालयाने दिलेल्या निर्णयात मशीदवरील बांधकाम अनधिकृत असून ऐतिहासिक वास्तूसाठी अशा नव्या प्रकारचे बांधकाम अयोग्य आहे, असेही नमूद करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचा मशीद प्रशासनाचा प्रयत्न असूनही, घुमट आणि मिनार पाडण्यात आले. या घटनेमुळे स्थानिक मुस्लीम समुदायामध्ये दु:ख आणि संतापाची लाट निर्माण झाली होती. त्याचीच परिणीती म्हणून स्थानिक मुस्लीम समुदायाकडून रस्त्यावर सार्वजनिक निदर्शने करण्यात आली. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर केला गेला, या अश्रुधुराचे प्रत्युत्तर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करून दिले. या प्रकारात काही जण जखमी झाले होते.
हे एक उदाहरण असले तरी २०२० सालापर्यंत चीन सरकारकडून शिन्जियांगमधील जवळपास १६ हजार मशिदी तोडण्यात आल्याचा दावा ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या (ASPI) अहवालामध्ये करण्यात आला होता. त्यातील ८,५०० मशिदी पूर्णतः नष्ट झाल्याचेही यात नमूद केले आहे, या अहवालानुसार या मशिदी केवळ गेल्या तीन वर्षांत नष्ट करण्यात आल्या आहेत. चीनकडून या अहवालात केलेल्या आरोपांचे खंडन करण्यात आले होते.
चीनमध्ये इस्लामी शिक्षणावर बंदी
चीनमध्ये इस्लामी धार्मिक शिक्षणावर संपूर्ण बंदी आहे. मुस्लीम धर्मगुरुंवर कठोर कारवाई केली जाते. याशिवाय कुराण जाळणे, मशिदी आणि दफनभूमी नष्ट करणे, नमाज आणि जिक्र बदलणे, इस्लामिक चालीरीती नष्ट करणे, अरबी शिकण्यास मनाई करणे यांसारख्या गोष्टी चीन सरकारकडून राबविण्यात येत आहेत. शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने वर्षानुवर्षे उइघर मुलांची मुस्लीम ओळख पुसून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. मुस्लीम मुलांना राज्याच्या शाळांमध्ये कम्युनिस्ट विचारसरणी आणि चिनी संस्कृतीसह शिकणे अनिवार्य केले आहे. चिनी कम्युनिस्ट सरकारने इस्लामिक शाळा (मदरसा) बंद करताना मुस्लीम मुलांनी नास्तिकता आणि साम्यवादी विचारसरणी शिकावी असा आदेश दिला आहे, शैक्षणिक व्यवस्थेतून इस्लामचे उच्चाटन केले आहे. २०१७ साली, अल-अझहर विद्यापीठात मोठ्या संख्येने शिकत असलेल्या उइघर विद्यार्थ्यांना चिनी अधिकाऱ्यांनी इजिप्शियन सरकारच्या मदतीने जबरदस्तीने चीनला परत आणले.
आणखी वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावाचा, ३५०० वर्षांचा इतिहास नेमके काय सांगतो ?
रमजानमध्ये उपवास नाही
चीनमध्ये मुस्लिम विचारसरणीच्या परिवर्तनासाठी पालकांना सरकारकडून तुरुंगात किंवा छळछावणी शिबिरात पाठवले जाते तर मुलांना राज्य अनाथाश्रम आणि बोर्डिंग शाळांमध्ये शिक्षण घेण्यास भाग पाडतात. या अनाथाश्रमांमध्ये मुलांचे संगोपन पूर्णपणे कम्युनिस्ट विचारसरणीनुसार केले जाते, त्यांचे रूपांतर हान चायनीजमध्ये केले जाते. किंबहुना त्यांची पारंपरिक नावे बदलून सरकारने दिलेली नावे त्यांना घ्यावी लागतात. या शिबिरांमध्ये, आश्रमांमध्ये ‘फ्री फूड’ म्हणून डुकराचे मांस खाणे अनिवार्य केले जाते. रमझानमध्ये उइघर मुस्लीम उपवास करत नाहीत याची खात्री करण्यासाठी चिनी अधिकाऱ्यांनी हेर नेमले होते किंबहुना आहेत याची पुष्टी करणारा अहवाल समोर आला आहे. चिनी अधिकारी त्या हेरांना ‘कान’ म्हणून संबोधतात
शी जिनपिंग यांची पूजा
चिनी कम्युनिस्ट पक्षाने (CCP) उइघर मुस्लिमांना अल्लाहची उपासना करण्यास मनाई केली आणि त्यांच्या प्रार्थना आणि झिक्र (देवाचे स्मरण) यातील मूळ प्रार्थनेत बदल करून त्यात शी जिनपिंग आणि CCP यांची स्तुती सुमने समाविष्ट केली आहेत. इमामांना कम्युनिस्ट गाणी गाणे आणि त्यावर नृत्य करणे बंधनकारक केले आहे. किंबहुना उइघर मुस्लिमांसाठी स्थापन केलेल्या नजरबंदी शिबिरात व तुरुंगात जेवणापूर्वी कम्युनिस्ट पक्ष आणि शी जिनपिंग यांची स्तुती तसेच आभार मानणाऱ्या प्रार्थना करणे बंधनकारक आहे. तसे न करणाऱ्यास कठोर शिक्षा करण्यात येते. इतकेच नव्हे तर चीनकडून बळजबरीने उइघर मुस्लिमांचा विवाह हान वंशीय चिनी लोकांशी लावण्यात येतो.
एकूणच चीन मध्ये परकीय धर्मामुळे फुटीरता निर्माण होवू नये, यासाठी विशेष काळजी घेतली जाते. त्यासाठी त्या परकीय धर्माची पाळे मुळे स्वदेशातून समूळ नष्ट करण्यासाठी चीन सरकारकडून विशिष्ट धोरणे राबवली जात आहेत. आणि चीनच्या प्रबलतेपुढे इस्लामिक राष्ट्रेही मूग गिळून गप्प आहेत.