पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर इस्रायलनेही प्रत्युत्तरादाखल गाझा पट्टी आणि इतर भागावर हल्ले केले. सध्या हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झाले असून रोज निष्पाप लोकांचा मृत्यू होत आहे. इस्रायलने युद्धाची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत २२६९ पॅलेस्टिनींचा तर हमासच्या हल्ल्यात १३०० इस्रायलींचा मृत्यू झाला आहे. असे असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इस्रायलने गाझा शहराला वेढा घालू नये, अशी भूमिका घेतली. ही भूमिका घेताना त्यांनी लेनिनग्राड (आताचे सेंट पिटर्सबर्ग) या शहराला हिटलरच्या सैनिकांनी घातलेल्या वेढ्याचा उल्लेख केला. याच पार्श्वभूमीवर नाझी सैनिकांनी घातलेला हा वेढा किती भीषण होता? या वेढ्यामुळे लाखो लोकांचा मृत्यू का झाला होता? या वेढ्याशी पुतिन यांचा काय संबंध आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…
वेढ्यामुळे लाखो लोकांचा मृत्यू
लेनिनग्राड शहराला घातलेला वेढा हा इतिहासातील सर्वांत संहारक आणि भीषण वेढा समजला जातो. या वेढ्यामुळे १९४१ ते १९४४ या काळात साधारण १.५ दशलक्ष लोक मारले गेले होते. २१ व्या शकतातील अभ्यासक या वेढ्याची संहारकता सांगताना या वेढ्याला ‘नरसंहार’ म्हणतात. या वेढ्यामुळे लाखो लोकांचा उपासमारीमुळे मृत्यू झाला होता.
ते ८७२ दिवस
दुसऱ्या महायुद्धात हिटरलने सोव्हियत युनियनला विरोध केला होता. त्याने १९४१ मध्ये सोव्हियत युनियनविरोधात ‘ऑपरेशन बार्बरोसा’ राबवले. या मोहिमेमुळे लेनिनग्राड शहराला मोठ्या नरसंहाराला सामोरे जावे लागले. जर्मन सैन्याने या शहराला वेढा दिल्यामुळे उपासमार आणि प्रतिकूल हवामानामुळे लाखो लाकांचा मृत्यू झाला होता. जर्मनीच्या नाझी सैनिकांना शेवटी पराभव झाला होता. मात्र या विजयाची किंमत तेव्हाच्या सोव्हियत युनियनला लाखो लोकांच्या मृत्यूच्या रुपात चुकवावी लागली होती.
हेही वाचा : इस्रायलने युद्धात पांढरा फॉस्फरस’ वापरल्यामुळे टीका का होतेय?
…म्हणून जर्मन सैनिकांनी लेनिनग्राडला वेढा दिला
लेनिनग्राड हे शहर रशियाची जुनी राजधानी होते. या शहराला तेव्हा धोरणात्मक तसेच सांस्कृतिकदृष्टीने खूप महत्त्व होते. याच कारणामुळे नाझी सैनिक या शहरावर हल्ला करणार, याची कल्पना तेव्हाच्या सोव्हियत युनियनला होती. याच कारणामुळे जर्मन सैनिकांचा सामना करण्यासाठी सोव्हियत युनियनच्या प्रशासनाने साधारण लाखो लोकांना एकत्र केले. या लोकांच्या तसेच २ लाख सैनिकांच्या मदतीने जर्मन सैनिकांचा सामना करायचा, अशी सोव्हियत युनियनची योजना होती. तब्बल १० लाख लोक आणि २ लाख सैनिकांचा सामना करणे अशक्य असल्यामुळे जर्मन सैनिकांनी थेट हल्ला करण्याऐवजी लेनिनग्राड या शहराला वेढा दिला.
२ वर्षे ४ महिने आणि २० दिवस वेढा
जर्मन सैनिकांनी लेनिनग्राडला ८ सप्टेंबर १९४१ ते २७ जानेवारी १९४४ या कालावधसासाठी एकूण ८७२ दिवस म्हणजेच साधारण २ वर्षे ४ महिने आणि २० दिवस वेढा घातला होता. या काळात जर्मन सैनिकांकडून लेनिनग्राडवर गोळीबार केला जायचा. साधारण २ वर्षांच्या या वेढ्यामुळे लेनिनग्राड शहरात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातही थंडीच्या दिवसांमुळेही येथे जगणे कठीण होऊन बसले होते. याच कारणामुळे वेढ्यादरम्यान १९४२ या एका वर्षात साधारण ६ लाख ५० हजार लोकांचा मृत्यू झाला होता. हिवाळ्यात वातावरणातील गारवा वाढल्यामुळे तसेच उपासमारीची स्थिती निर्माण झाल्यामुळे लोकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले होते. १९४२ साली जानेवारी आणि फेब्रुवारी या प्रत्येक महिन्यांत साधारण १ लाख लोकांचा मृत्यू झाला होता.
१.५ दशलक्ष लोकांचा लेनिनग्राडमध्ये मृत्यू
सोव्हियत युनियनच्या सैनिकांना जर्मन सैनिकांचा वेढा तोडण्यात यश आले होते. मात्र तोपर्यंत साधारण १.५ दशलक्ष लोकांचा लेनिनग्राडमध्ये मृत्यू झाला होता. लेनिनग्राडमधील लोकांची सुटका केली जात असताना साधारण ५ लाख लोक मृत्यूमुखी पडले होते. जर्मन सैनिकांनी दिलेल्या या वेढ्यामुळे लेनिनग्राडमध्ये मृतांचे प्रमाण एवढे वाढले होते की सेंट पीटर्सबर्गच्या पिस्कारिओवोस्कॉय या स्मशानभूमीत साधारण ४ लाख ७० हजार लोकांवर सामूहिकरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
कल्पना न करता येणारा संहार
जर्मनीने लेनिनग्राडला वेढा दिल्यानंतर रशियाचे अपरिमित नुकसान झाले होते. हे नुकसान मोजणे अशक्य आणि अकल्पनीय आहे, असे अनेकजण म्हणतात. कारण दुसऱ्या महायुद्धात अमेरिका आणि ब्रिटन या देशांचे मिळून जेवढे नुकसान झाले, त्यापेक्षा कितीतरी अधिक नुकसान हे लेनिनग्राडला दिलेल्या वेढ्यामुळे झाले होते. लेनिनग्राडमध्ये झालेल्या जीवितहानीची तुलना कशाशीही होऊ शकत नाही, असे काहीजण म्हणतात.
हेही वाचा : हमासशी दोन हात करण्यासाठी नेतान्याहू यांनी स्थापन केलेले ‘युनिटी गव्हर्न्मेंट’ काय आहे? जाणून घ्या….
वेढा देऊन लोकांची नियोजनबद्ध उपासमार
जर्मन सैनिकांनी लेनिनग्राडमधील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडीत करून लक्ष्य केले. याला युद्ध क्षेत्रातील तज्ज्ञ ‘नियोजनबद्ध उपासमार’ म्हणतात. इतिहासकार जॉर्ज गँझेनमुलर यांनी २०१६ साली डीडब्ल्यूला लेनिनग्राडला दिलेल्या वेढ्याबाबत अधिक माहिती दिली होती. जर्मन सैनिकांना अन्नाची कमतरता भासू नये यासाठी लेनिनग्राडमधील लोकांची उपासमार झाली, असे गँझेनमुलर यांनी सांगितले.
पुतिन यांचा लेनिनग्राडच्या वेढ्याशी संबंध काय?
व्लादिमीर पुतीन यांचा लेनिनग्राडच्या वेढ्याशी वैयक्तिक संबंध आहे. कारण जर्मन सैनिकांनी लेनिनग्राडला वेढा दिला होता, तेव्हा पुनिन सहा वर्षांचे होते. याच वेढ्यामुळे उपासमार होऊन त्यांच्या भावाचा मृत्यू झाला होता. पिस्कारिओवोस्कॉय स्मशानभूमीत या वेढ्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठीच्या कार्यक्रमात पुतिन यांनीच याबाबत माहिती दिली. “मी माझ्या आईला कधी पाहिले नाही. माझ्या आईवरही याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आईवरील अंत्यसंस्काराची नेमकी जागाही मला माहिती नाही,” असे पुतिन म्हणाले. तसेच पुतिन यांचे बंधू मृत्यूवेळी अवघे २ वर्षांचे होते. १९४२ साली त्यांचा थंडी आणि उपासमारीमुळे मृत्यू झाला होता, असे म्हटले जाते. पुतिन यांनी लिहेलेल्या ‘फस्ट पर्सन’ (२०००) या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या निधनाविषयी लिहिलेले आहे.