एकीकडे इस्रायलचे गाझा पट्टीवर एकामागून एक हल्ले सुरू असतानाच आता त्या देशाची उत्तर सीमाही तापू लागली आहे. लेबनॉनमधील इराण समर्थित हेजबोला या अतिरेकी संघटनेबरोबर इस्रायलचा संघर्ष दिवसागणिक वाढत चालला आहे. गाझाप्रमाणेच लेबनॉनमध्ये सैन्य घुसवून इस्रायल आणखी एका आघाडीवर युद्ध छेडणार का? युद्ध झालेच, तर त्याचा परिणाम काय होईल? हे युद्ध इस्रायलला आणि जगाला परवडेल का? इस्रायलच्या मित्रराष्ट्रांची भूमिका काय असेल? या आणि अशा प्रश्नांचा वेध घेऊया…

इस्रायल-हेजबोला संघर्ष का?

इस्रायलच्या उत्तर सीमेवरील लेबनॉन या देशातील हेजबोला ही शक्तिशाली दहशतवादी संघटना आहे. इस्रायल आणि हेजबोलामध्ये अधूनमधून खटके उडतच असतात. या सीमेवर कायमच तणाव असतो आणि त्यामुळे इस्रायली सैन्याचा मोठा वावर या परिसरात आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी गाझा पट्टीचा ताबा असलेल्या हमास या अतिरेकी संघटनेने इस्रायलवर अचानक हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझामध्ये सैन्य घुसवले. हमासच्या नावाखाली आतापर्यंत किमान ३७ हजार पॅलेस्टिनींचा या युद्धात बळी गेला आहे. या हल्ल्याचा जोर कमी करण्यासाठी, त्यांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी हेजबोलाने इस्रायलवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढविले. इस्रायलला आपली आणखी कुमक उत्तरेकडे वळविण्यास भाग पाडावे, हा या हल्ल्यांमागचा हेतू आहे. खरे म्हणजे हमास ही सुन्नीबहूल संघटना असून हेजबोलामध्ये शिया मुस्लिमांचे प्राबल्य आहे. मात्र दोन्ही संघटना ‘मुस्लिम ब्रदरहूड’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी विचारांच्या संघटनेचेच अपत्य असून दोघींनाही इराणची सक्रिय मदत होत असते. त्यामुळेच गाझावरील हल्ल्यांची तीव्रता कमी करण्यासाठी हेजबोलाने इस्रायलवरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. आता गाझा पट्टीची पुरती चाळण केल्यानंतर इस्रायलने हेजबोला आणि लेबनॉनला धमक्या देणे सुरू केले आहे.

हेही वाचा >>> भारत वि. दक्षिण आफ्रिका…दोन्ही संघ ठरवले गेले ‘चोकर्स’…अंतिम फेरीत बाजी कोणाची?

तणावामध्ये आणखी भर कशामुळे?

२००६च्या ३४ दिवस चाललेल्या इस्रायल-लेबनॉन युद्धानंतर सीमेवर लहानसहान चकमकी होत असल्या तरी त्यांची तीव्रता कमी होती. साधारणत: सामान्य नागरिकांचा बळी जाऊ नये, याची खबरदारी दोन्ही बाजूंकडून घेतली जात होती. मात्र गाझा युद्धानंतर परिस्थिती वेगाने बदलली आहे. दोन्ही देश सीमांमध्ये आतपर्यंत घुसून हल्ले करीत आहेत. ५ जून रोजी हेजबोलाने एका इस्रायली गावावर आत्मघातकी ड्रोनने हल्ला केला. यात दोन सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला तर ११ जण जखमी झाले. सीमावर्ती भागांत हेजबोलाच्या हल्ल्यांमुळे लागलेल्या आगी विझविताना इस्रायली अग्निशमन दल मेटाकुटीला आले आहे. लेबनॉनमधून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्लेही होत आहेत. दोन दिवसांपूर्वी हेजबोलाचा बालेकिल्ला असलेले ऐता-एल-शब हे गाव इस्रायलने हवाई हल्ले करून बेचिराख केले आहे. २००६च्या युद्धात हे गाव हेजबोलाने दीर्घकाळ झुंजविले होते.

सर्वंकष युद्धाची शक्यता किती?

अलिकडेच वॉशिंग्टन दौऱ्यावर असलेले इस्रायलचे संरक्षणमंत्री योआव गॅलण्ट यांनी हेजबोलास थेट इशारा दिला. ‘लेबनॉनमधील या अतिरेकी संघटनेला थेट अश्मयुगात पाठविण्याइतकी इस्रायली सैन्याची ताकद आहे, मात्र आम्ही चर्चेतून प्रश्न सोडवू इच्छितो,’ असे गॅलण्ट यांचे म्हणणे आहे. ‘लेबनॉन सीमेवर तणाव वाढला असून व्यापक कारवाईसाठी आम्ही तयार आहोत,’ अशी धमकी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी दिली आहे. तत्पूर्वी अतिउजव्या विचारसरणीचे मंत्री इतामन बेन-गविर यांनी लेबनॉन सीमेवरील युद्धग्रस्त गावांना भेट दिली आणि हेजबोलाचे लेबनॉनमधील सर्व तळ पेटवून दिले पाहिजेत, असे विधान केले. त्यामुळे इस्रायलचे सैन्य कोणत्याही क्षणी लेबनॉनची सीमा ओलांडेल अशी हवा आहे. मात्र लेबनॉन-इस्रायल संबंधांच्या अभ्यासकांना सध्या तरी ही शक्यता वाटत नाही. एकतर गाझामधील युद्धात इस्रायलची बरीच ताकद लागली आहे. जॉर्डन आणि सीरियाच्या सीमांवरील कुमक कमी करता येणार नाही. शिवाय उजवे पक्ष युद्धाची भाषा करीत असले, तरी इस्रायलमधील अंतर्गत राजकीय परिस्थितीही आणखी एका युद्धासाठी पोषक नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तरीही दोन्ही देशांनी सीमेनजिकची गावे रिकामी करण्यास सुरूवात केल्यामुुळे युद्धाचे ढग अधिक गडद झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> कॉलेजमधील हिजाबबंदीचं मुंबई उच्च न्यायालयाने का केलं समर्थन?

हमास आणि लेबनॉन युद्धांत फरक काय?

सर्वांत मोठा फरक आहे भूराजकीय परिस्थितीचा… हमासच्या गाझावरील ताब्याला आंतरराष्ट्रीय मान्यता नाही. गाझा पट्टी हा जगाच्या दृष्टीने वादग्रस्त प्रदेश आहे. हेजबोलाचे तसे नाही. लेबनॉन हे स्वतंत्र राष्ट्र आहे. त्यामुळे हमासचा नायनाट करण्याच्या वल्गना करून गाझामध्ये शिरणे इस्रायलला सोपे होते. लेबनॉनमध्ये सैन्य घुसविले तर ती ‘लष्करी कारवाई’ न राहता ‘युद्ध’च मानले जाईल. इस्रायलचे पाठिराखे अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन हे याला तयार होण्याची शक्यता नाही. लेबनॉनमध्ये युद्ध छेडल्यास जगातील अन्य अनेक देश इस्रायलच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. पण यापेक्षा महत्त्वाचा फरक म्हणजे हमास आणि हेजबोलामध्ये फरक आहे. हमास ही काहीशी विखुरलेली, दुबळे नेतृत्व असलेली संघटना आहे. हेजबोला मात्र अधिक शिस्तबद्ध आहे. शिवाय त्यांच्याकडे हमासच्या तुलनेत अधिक अत्याधुनिक, घातक शस्त्रसाठा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे कितीही धमक्या दिल्या तरी लेबनॉनवर हल्ला करण्यापूर्वी इस्रायलला १०० वेळा विचार करावाच लागेल…

amol.paranjpe@expressindia.com