सध्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने इस्रायलचा झळकणारा राष्ट्रध्वज, विशेष लक्ष वेधून घेत आहे. दोन निळ्या पट्ट्यांमधील पांढरा भाग आणि त्यावरील हेक्साग्रामचे चित्रण अशी इस्रायलच्या राष्ट्रध्वजाची ओळख आहे. इस्त्रायली राष्ट्रध्वजाचे अधिकृत मोजमाप १६०× २२० सेमी आहे. हा राष्ट्रध्वज इस्रायलने, देशाच्या स्थापनेनंतर पाच महिन्यांनी अधिकृतरित्या स्वीकारला. इस्रायलने झिओनिस्ट चळवळीचा ध्वज (Flag of Zion), त्या चळवळीच्या स्मरणार्थ आणि प्रतिकात्मक म्हणून स्वीकारला होता. इस्रायलच्या या राष्ट्रध्वजाला आकार प्राप्त झाला तो, १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात  उदयास आलेल्या झिओनिझम चळवळीमुळे.

राष्ट्रध्वजाची प्राथमिक पाळेमुळे 

इस्रायलचा सध्याचा राष्ट्रध्वज नक्की कुठल्या पहिल्या ध्वजावर आधारित आहेत, या विषयी अभ्यासकांमध्ये मतमतांतरे आढळतात. असे असले तरी, इस्रायलच्या राष्ट्रध्वजाची प्राथमिक आवृत्ती ही १८८५ साली रिशॉन लेझिऑनच्या (इस्रायलमधील एक शहर) तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त काढलेल्या मिरवणुकीत प्रदर्शित करण्यात आली होती, असे मानले जाते. रिशॉन लेझिऑन या कृषीप्रधान गावाने तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त काढलेल्या मिरवणुकीत, इस्त्रायल बेलकिंड आणि फॅनी अब्रामोविच यांनी डिझाइन केलेला डेव्हिडचा तारा असलेला निळा आणि पांढरा ध्वज वापरला. याच सारखा दुसरा ध्वज २० जुलै १८९१ रोजी बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथील बनाई झिऑन (B’nai Zion) एज्युकेशनल सोसायटीच्या हॉलमध्ये प्रदर्शित करण्यात आला. हा ध्वज रबाई जेकब बारुच आस्कोविथ यांनी ‘बोस्टन’ मध्ये स्थानिक ज्यू समाजाच्या संघटनेसाठी तयार केला होता. या संदर्भातून अमेरिका आणि ज्यू समाजाचा संबंध समजण्यास मदत होते. 

syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Bashar al-Assad
Bashar al-Assad: सीरियाचा नेता की क्रूर राजवटीचा चेहरा? बशर अल-असद कोण आहे?
dubai visa policy
दुबईचा व्हिसा मिळवताना भारतीय पर्यटकांना अडचणी का येत आहेत? काय आहेत नवे नियम?
Syria, Abu Mohammad Al Jolani, dictatorship Syria,
विश्लेषण : जिहादीचा बनला प्रशासक… कोण आहे सीरियाचा नवा शासक अबू मोहम्मद अल जोलानी?
Image of BJP MLA T Raja Singh.
T Raja Singh : भाजपा आमदाराने भर कार्यक्रमात फाडला बांगलादेशचा ध्वज, गोव्यात नेमकं काय घडलं?
Prime Minister announces free elections in Syria
सीरियात असादपर्वाची अखेर सत्ता उलथवण्यात बंडखोरांना यश; पंतप्रधानांची मुक्त निवडणुकांची घोषणा
Syria
Syria Civil War 2024 : कोणी उलथवली अल-असाद कुटुंबांची कित्येक दशकांची राजवट? सीरियातील गृहयुद्धात नेमकं काय घडलं?

आणखी वाचा: इस्रायलमध्ये स्थलांतर भारतीय ज्यूंसाठी (बेने इस्रायली) सोपे का नव्हते?

राष्ट्रध्वजाच्या डिझाइन्स

रबाई जेकब बारुच आस्कोविथ यांनी तयार केलेला ध्वज पारंपारिक ‘टॅलिट’ (Tallit) किंवा ‘ज्यू प्रार्थना शाली’च्या संकल्पनेवर आधारित होता. हा ध्वज मूलतः पांढऱ्या रंगात होता आणि त्यावर ध्वजाच्या वर-खाली किनारी भागात अरुंद निळ्या पट्ट्या होत्या तसेच मध्यभागी निळ्या अक्षरात ‘मॅकाबी’ हा शब्द (मॅकाबी या शब्दात ग्रीक लोकांविरुद्ध जेरुसलेमचे रक्षण करणाऱ्या प्रसिद्ध ज्यू योद्धा कुटुंबाचा संदर्भ आहे)असलेली डेव्हिडची प्राचीन सहा-बिंदू असलेली ढाल होती (Shield of David). बोस्टनच्या आयझॅक हॅरिस यांनी १८९७ साली पहिल्या आंतरराष्ट्रीय झिओनिस्ट काँग्रेससमोर अशाच स्वरूपाच्या ध्वजाची कल्पना मांडली आणि डेव्हिड वुल्फसोनसह इतरांनीही अशाच प्रकारच्या डिझाइन्स समोर आणल्या. असे असले तरी, झिओनिस्ट चळवळीद्वारे आणि दुसर्‍या महायुद्धात ब्रिटीश सैन्याच्या ज्यू ब्रिगेड गटाद्वारे वापरल्या गेलेल्या ध्वजात भिन्नता आढळून येते. एकूणच आताचा राष्ट्रध्वज पूर्णत्वाला येण्यापूर्वी, तो अनेक परिवर्तनांतून गेल्याचे लक्षात येते. 

पहिला राष्ट्रध्वज पॅलेस्टाईनमध्ये

१४ मे १९४८ रोजी इस्रायलने स्वातंत्र्य घोषित केले, त्यावेळेस  झिओनिस्ट ध्वज पॅलेस्टाईनमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. त्याच वर्षी १२ नोव्हेंबर रोजी इस्रायलच्या संसदेने झिओनिस्ट ध्वजाला अधिकृत राष्ट्रीय म्हणून मान्यता देऊन राष्ट्रध्वज कायदा लागू केला. राष्ट्रध्वजासाठी कोणत्या रंगाची अचूक छटा असावी या संदर्भात इस्रायली कायद्यामध्ये काही निश्चित सांगितलेले नाही. असे असले तरी, इस्रायलच्या माहिती कार्यालयाच्या नोटिशीमध्ये (१८फेब्रुवारी, १९५०) निळ्या रंगाच्या गडद छटेचे वर्णन केलेले आहे. निळ्या रंगाच्या फिकट छटा पूर्वीच्या ध्वजांमध्ये वापरल्या जात होत्या आणि अजूनही काही इस्रायली संस्था त्या वापरतात. 

आणखी वाचा: इस्रायल माझ्या हृदयात आहे, भारत माझ्या रक्तात आहे; भारतातील ज्यू समाज !

पवित्र शालीवरून राष्ट्रध्वजाने घेतला आकार 

राष्ट्रध्वजाची मूलभूत रचना ज्यू धर्मातील ‘टॅलिट’ या पवित्र शालीवरून घेण्यात आली आहे. ही शाल पांढऱ्या रंगाची असून त्यावर काळ्या-निळ्या रंगाच्या पट्ट्या असतात, आणि मध्यभागी स्टार ऑफ डेव्हिडचे चिन्ह असते. ही शाल पूजेच्या दरम्यान सेवा करणारा पुरुष  साधक पांघरतो. ही शाल कोणत्या सेवेदरम्यान पांघरावी यासाठी काही नियम आहेत. ही शाल आयताकृती आकाराची असते, बायबल मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यावर काळ्या-निळ्या पट्ट्या असतात, या शालीच्या पुढे आणि मागे झालर असते, बऱ्याचदा कॉलरवर आशीर्वादाचे श्लोक लिहिलेले असतात, धार्मिक ज्यूला बहुतेकदा त्याच्या या प्रार्थनेच्या शालीत दफन केले जाते, दफन करताना शालीची झालर काढून टाकली जाते.

ज्यू धर्मातील निळ्या रंगाचे महत्त्व 

इस्रायलच्या राष्ट्रध्वजावरील निळ्या रंगाचे वर्णन “गडद आकाशी निळा” असे केले जाते, निळा आणि पांढरा रंग हा ज्यूंचा राष्ट्रीय रंग आहे, ही कल्पना ऑस्ट्रियन ज्यू कवी लुडविग ऑगस्ट फॉन फ्रँकल (१८१०-९४) यांनी मांडली होती. पारंपारिक ज्यू प्रार्थना शाल, टॅलिटवरील पट्ट्यांचा रंग निळा असतो, त्यावरूनच राष्ट्रध्वजावर हा रंग आला आहे. यहुदी धर्मात, निळा रंग देवाच्या गौरवाचे, शुद्धतेचे आणि गेव्हुराचे (God’s severity) प्रतीक आहे. तसेच पांढरा रंग चेस्डचे (Divine Benevolence) प्रतिनिधित्व करतो. इस्त्रायली लोक पूर्वी ‘टेखेलेट’ (Tekhelet) नावाचा निळा रंग वापरत असत; हा रंग सागरी गोगलगाय म्युरेक्स ट्रंक्युलसपासून तयार करण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवली जाते. बायबलमध्ये, इस्त्रायली लोकांना त्यांच्या शालीच्या कोपऱ्यात झालर लावण्याची आज्ञा देण्यात आली होती, झालरीचा एक धागा (Tzitzit -ट्झिट्झिट) टेखेलेटने रंगवण्याची आज्ञा देण्यात आली होती; “जेणेकरून त्यांनी ते पहावे, आणि परमेश्वराच्या सर्व आज्ञा लक्षात ठेवाव्यात आणि पाळाव्यात” (बायबल गणना १५:३९). टेखेलेट हे दैवी प्रकटीकरणाच्या रंगाशी संबंधित आहे (मिद्राश क्रमांक रबाई xv.). तालमूदिक युगाच्या (५००-६०० सीई) शेवटी कधीतरी हा रंग तयार करणारा उद्योग ठप्प झाला असावा, असे अभ्यासक सांगतात. त्यामुळे ज्यूंना आज्ञा पाळणे शक्य झाले नाही, तेंव्हा पासून त्यांचा शालीची झालर सफेद रंगातच ठेवण्याची परंपरा होती, परंतु कालपरत्त्वे गडद निळ्या रंगाची झालर पुन्हा वापरण्यास सुरुवात झाल्याचे आढळते. 

राष्ट्रध्वजावरील ‘स्टार ऑफ डेव्हिड’

‘स्टार ऑफ डेव्हिड’ हे ज्यूंचे पवित्र चिन्ह असून मध्ययुगीन प्रागमध्ये वापरले जात होते. मध्ययुगात हे चिन्ह गूढ शक्तींशी संबंधित  होते. पेंटाग्राम आणि हेक्साग्राम हे  दुष्ट आत्म्यांविरूद्ध संरक्षणाकरता तावीजमध्ये वापरले जात होते. एकेकाळी दोघांनाही “सील ऑफ सोलोमन” असे संबोधले जात होते, परंतु अखेरीस हे नाव पेंटाग्रामसाठी खास झाले, तर हेक्साग्राम “मॅगेन डेव्हिड”(Magen David) किंवा “डेव्हिडची ढाल”(Shield of David) म्हणून ओळखले जाऊ लागले. याशिवाय हे चिन्ह मॅगेन किंवा मोगेन म्हणूनही ओळखले जाते. हे ज्यू चिन्ह दोन आच्छादित समभुज त्रिकोणांनी आणि सहा-बिंदूंच्या ताऱ्याने तयार होते. सिनेगॉग, ज्यू थडगे आणि इस्रायलच्या ध्वजावर हे चिन्ह आढळते. 

आणखी वाचा: जेरुसलेम: एका शहराच्या तीन कथा … ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम

ताऱ्याचा स्वीकार

सुरुवातीच्या काळात हे चिन्ह फक्त ज्यू धर्मापुरते मर्यादित नव्हते, मध्ययुगीन काळात डेव्हिडचे चिन्ह म्हणून समोर येते, असे असले तरी तोपर्यंत त्याला धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले नव्हते, किंबहुना या चिन्हाचा आढळ मध्ययुगीन चर्चमध्येही दिसतो. मॅगेन डेव्हिड हा शब्द, मध्ययुगीन काळात प्रचलित झाल्याचे दिसते, डेव्हिडची ढाल यामधील ढाल, किंवा संरक्षक कवच हे देवाच्या शक्तीशी संबंधित आहे. प्रागच्या ज्यू समुदायाने डेव्हिडचा तारा अधिकृत चिन्ह म्हणून वापरला आणि १७ व्या शतकापासून सहा-बिंदू असलेला तारा अनेक ज्यू समुदायांचा अधिकृत चिन्ह ठरला. १९ व्या शतकात ज्यूंनी ख्रिश्चन धर्माच्या क्रॉसचे अनुकरण करून ज्यू धर्माचे एक आश्चर्यकारक आणि साधे प्रतिक म्हणून हा तारा  स्वीकारला होता. 

एकूणच ज्यू ध्वजावर निळा आणि पांढरा रंग आणि त्यावर हेक्साग्रामचे चिन्ह यांना ज्यू धर्मात अत्यंत पवित्र स्थान आहे. आणि याच सर्वांच्या एकत्रित मिश्रणाने तयार झालेला इस्रायलचा ध्वज ज्यूंच्या धर्मनिष्ठतेची आणि समर्पणाची कथा सांगत आहे.

Story img Loader