इराणच्या इस्रायलवरील क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे आधुनिक युद्धपद्धतीमध्ये क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. जगात मोजक्या देशांकडे हे तंत्रज्ञान असून, भारतातही ते विकसित होत आहे. त्याचा हा आढावा…

क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेची चर्चा का ?

इस्रायल सध्या युद्धाच्या खाईत आहे. गाझा पट्टीसह लेबनॉनमध्ये इस्रायलने युद्धाची आघाडी उघडली आहे. रॉकेट्सचा अव्याहत मारा इस्रायलवर होत आहे. इराणनेही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी इस्रायलला लक्ष्य केले. या क्षेपणास्त्रांना, रॉकेट्सना निकामी करण्याचे शिवधनुष्य पेलले आहे, ते इस्रायलच्या क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेने. या यंत्रणेमुळे इस्रायलमध्ये हजारो जणांचे प्राण वाचले आहेत. इस्रायलची क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा बहुस्तरीय असून, विविध उंचीवरील आणि अंतरावरील क्षेपणास्त्रे, रॉकेट भेदण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्रे आहेत. शत्रूने मारा केल्यानंतर ही यंत्रणा क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्र सोडते आणि शत्रूच्या क्षेपणास्त्राचा, रॉकेटला निकामी करते. ॲरो क्षेपणास्त्र यंत्रणा, डेव्हिड स्लिंग क्षेपणास्त्र यंत्रणा, आणि आयर्न डोम यंत्रणा अशा तीन स्तरांवर इस्रायलची सुरक्षा यंत्रणा काम करते. क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्रयंत्रणा असलेले अमेरिका, रशिया, चीन हे प्रमुख देश आहेत. भारतासह इतर काही देशांत ही यंत्रणा विकसनाच्या टप्प्यावर आहे.

हेही वाचा : ‘या’ देशात वाढतोय ‘प्लेजर मॅरेज’चा ट्रेंड; पर्यटकांबरोबर अल्प कालावधीसाठी का केले जाते लग्न?

क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेसमोर आव्हाने

लक्ष्य समोर ठेवून क्षेपणास्त्रांचा मारा करणे या क्षेपणास्त्रांना भेदण्यापेक्षा तुलनेने सोपे आहे. आज हायपरसॉनिक वेगाने मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत. एकाच वेळी अनेक लक्ष्ये भेदू शकणारी एमआयआरव्ही तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी क्षेपणास्त्रेही आहेत. वातावरणाच्या बाहेर जाऊन पुन्हा आत येणारी, थेट मारा करणारी, कमी उंचावरून मारा करणारी अशी वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्रे, रॉकेट्स अस्तित्वात आहे. वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांना भेदण्यासाठी तशाच प्रकारची भेदक क्षेपणास्त्रे आणि तीदेखील विविध प्रकारच्या उंचीवरील आणि अंतरावरील क्षेपणास्त्रांचा अंदाज घेऊन सज्ज ठेवावी लागतात. इराणने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्रांच्या माऱ्यामुळे इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेची एक प्रकारे सत्त्वपरीक्षाच झाली असावी. इराणने डागलेली काही क्षेपणास्त्रे इस्रायलवर कोसळल्याचीही वृत्ते आहेत. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रेही इराणने डागली असल्याची माहिती आहे. अशी क्षेपणास्त्रे भेदणे हे अतिशय कठीण असते. इराणच्या या हल्ल्यानंतर इस्रायल त्यांच्या यंत्रणेतील कमकुवत दुवे ओळखून येत्या काळात ही यंत्रणा अधिक सुसज्ज करील.

भारतासमोरील आव्हाने वेगळी

भारत आणि इस्रायलची परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. या दोन देशांची तुलनाच होऊ शकत नाही. भौगोलिक आकार, लोकसंख्या, जनसांख्यिकी आदी बाबतीत भारतासमोरील आव्हाने खूप वेगळी असून, त्याचा वेगळ्या परीप्रेक्ष्यात विचार करावा लागेल. भारताची तुलना इस्रायलशी करण्याचा अनेकांना मोह होतो. पण, परिस्थिती तशी नाही. क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेच्या बाबतीत विचार केला, तर भारतामध्ये पृथ्वी हवाई सुरक्षा (पीएडी) आणि अॅडव्हान्स्ड् हवाई सुरक्षा (एएडी) यंत्रणा आहेत. त्या विकसनाच्या टप्प्यावर आहेत. रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्रयंत्रणा आपण खरेदी केली आहे. त्यातील काही एस-४०० क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा दाखल झाल्या आहेत. उर्वरित पुरवठ्याच्या टप्प्यावर आहेत. याखेरीज आकाश, बराक अशी क्षेपणास्त्रे कमी उंचावरील लक्ष्यांना भेदण्यासाठी वापरता येऊ शकतात.

हेही वाचा : पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांची हत्या; चिनी प्रकल्पांवर का होतायत हल्ले?

पूर्ण सुरक्षेसाठी काय करावे?

क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा अतिशय खर्चिक आहे. क्षेपणास्त्रनिर्मितीपेक्षा क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेचा खर्च अधिक आहे. तसेच, भारताचा विचार केला, तर या यंत्रणेने संपूर्ण देश सुरक्षित करायचा झाल्यास, त्याचा खर्च आवाक्यापलीकडचा असेल. धोक्याची ठिकाणे ओळखून, शत्रूपासून धोक्यांचा आवश्यक तो अंदाज घेऊन अशी यंत्रणा उभारावी लागेल. युद्धशास्त्रामध्ये शत्रूला जेरीस आणण्याच्या अनेक पद्धती आहेत. राष्ट्रहित आणि देशाचे सर्वांगीण सुरक्षेचे धोरण काय आहे, यावर प्रत्यक्षातील नीती ठरते. देशात सामरिक संस्कृतीचा जागर कितपत आहे, त्यावरही सुरक्षेची धोरणे अवलंबून असतात. भारताला आणखी बराच मोठा पल्ला त्यासाठी पार करायचा आहे.
prasad.kulkarni@expressindia.com