अमोल परांजपे
जगभरची नव्हे, तरी किमान पश्चिम आशिया आणि युरोपमधील सर्वात बलाढय़ गुप्तहेर संस्था म्हणजे इस्रायलची ‘मोसाद’. अनेक कथा, कादंबऱ्या, चित्रपटांना कथानके पुरविणाऱ्या, जगभरात, विशेषत: गाझा पट्टीमध्ये गुप्तहेरांचे जाळे असलेल्या मोसादला शनिवारी झालेल्या भीषण हल्ल्याचा तसूभरही सुगावा लागला नाही. हमासचे शेकडो अतिरेकी २० ठिकाणांवरून इस्रायलमध्ये घुसले आणि बेसावध जनता, लष्कराचे शिरकाण करून, किमान दोन डझन इस्रायली नागरिकांचे अपहरण करून परतही गेले. या घटनेमुळे मोसादच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे, नव्हे भगदाड पडले आहे.
इस्रायल गाफील का राहिला?
गाझा पट्टीतून ‘हमास’चे अतिरेकी एवढा मोठा हल्ला करतील, याची तिळभरही शक्यता इस्रायली जनतेला वाटत नव्हती. याची दोन प्रमुख कारणे आहेत. एक तर इस्रायलवर मोठय़ा प्रमाणात सीमापार हल्ला केला, तर त्याच्या किती तरी पटींनी अधिक प्रतिहल्ले होतील आणि हमासच नव्हे, तर गाझा पट्टीतील हजारो नागरिकांना त्याची किंमत चुकवावी लागेल. याची कल्पना ‘हमास’लाही असल्यामुळे ते मोठा हल्ला करण्यास धजावणार नाहीत, या संभ्रमात इस्रायली नागरिक होते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आपले सरकार, लष्कर आणि ‘शिन बेत’ या देशांतर्गत आणि ‘मोसाद’ या आंतरराष्ट्रीय गुप्तहेर संस्थांच्या कार्यक्षमतेवर असलेला भाबडा विश्वास.. हमासच्या एका धाडसी हल्ल्याने तो विश्वास पार धुळीला मिळवला आहे.
हेही वाचा >>> अग्रलेख:पहिली परीक्षा
इस्रायलची सज्जता कशी आहे?
इस्रायल सुरक्षेच्या बाबतीत जगात सगळय़ात सावध देश मानला जातो. त्यांच्याकडे आखातामधील सर्वात सज्ज लष्कर आहे. ‘शिन बेत’ आणि ‘मोसाद’चे जाळे एवढे मोठे आहे, की देशातील आणि देशाबाहेरील कोणतीही मोठी घटना या गुप्तहेर संस्थांच्या नजरेतून सुटणे अशक्य असल्याचे मानले जाते. (किंवा आजवर मानले जात होते.) गाझा पट्टीतील ‘हमास’ आणि लेबनॉनमधील ‘हेजबोला’ या इराण समर्थित दहशतवादी गटांसोबत इस्रायली लष्कराचे सातत्याने खटके उडत असल्यामुळे त्या सीमांवर तर अधिक सज्जता बाळगली जाते. गाझा पट्टी आणि इस्रायलच्या सीमेवर अत्यंत मजबूत तटबंदी, तारांची कुंपणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, २४ तास खडा पहारा असा जामानिमा आहे.
हमासने हल्ल्यासाठी ही वेळ का निवडली?
हमासने हा हल्ला करण्यासाठी अत्यंत अचूक वेळ साधल्याचे म्हणावे लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘योम किप्पूर’च्या सुट्टय़ा असल्यामुळे बहुतांश ज्यू जनता बेसावध असताना हा हल्ला करण्यात आला. बिन्यामिन नेतान्याहू यांच्या अतिउजव्या सरकारने देशातील न्याययंत्रणेत मोठे बदल घडविण्याचा घाट घातला. याला इस्रायली जनताच नव्हे, तर विचारवंत, माजी लष्करी अधिकारी आणि सैन्य दलांतील राखीव सैनिकांनीही जाहीर विरोध केला. गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ इस्रायलच्या रस्त्यांवर निदर्शने सुरू आहेत. एका अर्थी, इतिहासात प्रथमच इस्रायलचा ज्यू समाज हा दुभंगलेला आहे. अशा वेळी एखादा मोठा लष्करी हल्ला मनोबल तोडू शकतो, असे गणित हमासने मांडले असावे. ‘शिन बेत’ या गुप्तहेर संस्थेची काही ताकद कायदेबदलाच्या विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी वापरली जातच नसेल असे मानण्याचे कारण नाही. तर ‘मोसाद’चे सगळे लक्ष सध्या इराणचा अणू कार्यक्रम कसा रोखता येईल, याकडे लागल्याचे मानले जाते. या दोन्ही महत्त्वाच्या संस्थांची संसाधने अन्यत्र गुंतल्यामुळे ‘हमास’कडे दुर्लक्ष झाले असू शकते.
गुप्तहेर यंत्रणांचे अपयश काय?
गाझा पट्टी संघर्षांबाबत गेली अनेक वर्षे अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते ‘ऑपरेशन अल अक्सा फ्लड’ या मोहिमेची आखणी काही महिने आधी झाली असावी. हल्ल्यामागे प्रचंड नियोजन, परिस्थितीचा अभ्यास केला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. शस्त्रास्त्रे, मनुष्यबळ, वाहने यांची मोठी जमवाजमव केली. तब्बल पाच हजारांवर क्षेपणास्त्रे तैनात केली. या कशाचाच पत्ता ‘मोसाद’ला नव्हता. गेले दोन महिने गाझा पट्टीत इस्रायलच्या तटबंदीसमोर येऊन पॅलेस्टिनी नागरिकांची आंदोलने सुरू होती. तज्ज्ञांच्या मते या निदर्शनांच्या आडून ‘हमास’च्या खबऱ्यांनी तटबंदीची टेहळणी केली आणि कच्चे दुवे हेरले असावेत. याची खबरही मोसाद किंवा शिन बेतला लागली नाही. १९७३ सालच्या योम किप्पूर युद्धानंतरही इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी उजेडात आल्या होत्या. त्या तुलनेत आता किती तरी अद्ययावत झालेल्या ‘मोसाद’ला हमासने पुन्हा बेसावध गाठले. अर्थात, याही अपयशाची चौकशी होईल, सुधारणाही होतील. मात्र या क्षणी ‘मोसाद’च्या अकार्यक्षमतेची लक्तरे इस्रायलच्या सीमेवर टांगली गेली आहेत. amol.paranjpe@expressindia.com