सध्या पॅलेस्टाईनमधील हमास ही अतिरेकी संघटना आणि इस्रायल यांच्यातील युद्धात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर इस्रायलने हमास या संघटनेला समूळ नष्ट करण्याचा चंग बांधला आहे. दरम्यान, इस्रायलने केलेल्या प्रतिहलल्यात गाझा पट्टीतील हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. येथील लोक वैद्यकीय मदत, मूलभूत गरजांच्या पुरवठ्याची मागणी करत आहेत. दरम्यान, गाझा पट्टी आणि इजिप्त यांच्यात असलेली रफाह सीमा पहिल्यांदाच खुली करण्यात आली आहे. या सीमेतूनच पॅलेस्टिनी लोकांना मदत पुरवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर या सीमेचे महत्त्व काय आहे? ही सीमा बंद का असते? हे जाणून घेऊ या….
मदतीसाठी रफाह ही एकमेव सीमा
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरमायन इजिप्त आणि गाझा पट्टी यांच्याील रफाह सीमा खुली करण्यात आली आहे. ही सीमा खुली झाल्यानंतर या युद्धादरम्यान पहिल्यांदाच १ नोव्हेंबर रोजी गाझातील सात जखमी नागरिकांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून इजिप्तमध्ये आणण्यात आले आहे. रफाह सीमा हे इजिप्त आणि गाझा यांच्यात येण्या-जाण्यासाठीचे मुख्य प्रवेशद्वार आहे. ही सीमा इजिप्तकडून नियंत्रित केली जाते. विशेष म्हणजे सध्या इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या या युद्धात रफाह सीमा हा एकमेव मार्ग आहे, ज्याच्या माध्यमातून पॅलेस्टिनींना मदत पोहोचवली जाऊ शकते. हमासने हल्ला केल्यानंतर ही सीमा पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
रफाह सीमा नेमकी काय आहे?
इजिप्तचा सिनाई द्विपकल्प आणि गाझा यांच्या सीमेवर रफाह सीमा आहे. सध्या गाझातून बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्यासाठी रफाह सीमेव्यतिरिक्त आणखी दोन सीमामार्ग उपलब्ध आहेत. करेम शालोम सीमा आणि एरेज सीमा हे दोन मार्ग इस्रायलकडून नियंत्रित केले जातात. यातील एरेज या सीमेतून लोकांची ये-जा होते. तर केरेम शालोम या सीमेतून मालवाहतूक होते. शनिवारी (७ ऑक्टोबर) हमासचा हल्ला झाल्यानंतर एरेज आणि केरेम शालोम हो दोन्ही सीमामार्ग बंद करण्यात आले आहेत.
सध्या सीमेवर परिस्थिती काय आहे?
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अद्याप थांबलेले नाही. हमासने इस्रायलच्या काही लोकांना ओलीस ठेवलेले असून या लोकांची सुटका करावी अशी मागणी इस्रायलकडून केली जात आहे. तर दुसरीकडे इस्रायलकडून बेछूट हल्ले केले जात आहेत. क्षेपणास्त्र डागली जात आहेत. यात हजारो पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे, असे हमास संघटनेचे म्हणणे आहे. गाझा पट्टीतील पॅलेस्टिनींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. येथे वीज नाही, जखमींवर उपचार करण्यासाठी औषधं नाहीत. अशा परिस्थितीत कतारच्या मध्यस्थीने इजिप्तमधील रफाह सीमा खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. कतारने इस्रायल, हमास आणि इजिप्तशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी एक करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत युद्धात जखमी झालेल्या अणि नाजूक प्रकृती असलेल्या ८८ पॅलेस्टिनींना तसेच ५०० परदेशी नागरिकांना इजिप्तमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
सीमा किती दिवस खुली राहणार, याबाबत अस्पष्टता
परदेशी पासपोर्ट असलल्या लोकांना गाझातून बाहेर येऊ देण्यावर इस्रायल आणि इजिप्त यांच्यात सहमती झालेली आहे. त्यासाठी इजिप्त देशाला इस्रायल सहकार्य करत आहे. रॉयडर्सने दिलेल्या वृत्तानुसार गाझा पट्टीत रफाह सीमेवर १ नोव्हेंबर रोजी साधारण २०० लोक उभे होते. आणखी किती काळ ही सीमा खुली राहील हे सध्यातरी अस्पष्ट आहे.
सध्याच्या संघर्षात रफाह सीमा महत्त्वाची का आहे?
हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये घुसून हल्ला केला होता. या हल्यात १४०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इस्रायलनेही हमासला जशास तसे उत्तर दिले. विशेष म्हणजे हमासच्या या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझाची संपूर्ण नाकेबंदी केली. इस्रायलने आपल्या करेम शालोम आणि एरेज या दोन्ही सीमा अनिश्चित काळासाठी बंद केल्या. त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी या लोकांना गाझातून बाहेर पडण्यासाठी रफाह सीमा हा एकमेव पर्याय राहिला. सध्यातरी युद्धाने बेघर झालेल्या तसेच जखमींना मदत करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. याच कारणामुळे रफाह सीमेला फार महत्त्व आले आहे. गाझा पट्टीतील आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ७ ऑक्टोबरपासून या भागात ८७०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
इजिप्तने रफाह सीमा बंद का केलेली आहे?
इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. त्यामुळे इजिप्त देशानेदेखील योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. २०१३ साली इजिप्तला इस्लामिस्ट लोकांनी केलेल्या बंडखोरीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर इजिप्तकडून अधिक खबरदारी घेतली जाते. २००७ साली हमासने गाझावर ताबा मिळवला. त्यानंतर इस्रायलप्रमाणेच इजिप्तनेही आपल्या सीमेकडून नाकाबंदी करण्यास सुरुवात केली होती. इजिप्तने या सीमेतून लोकांच्या तसेच मालाच्या वाहतुकीवर निर्बंध आणले होते. २००८ साली हमासने रफाह सीमेलगत स्फोट घडवून आणला होता. या स्फोटानंतर गाझा आणि इजिप्त यांच्यातील तटबंदी ढासळली होती. त्यानंतर हजारो पॅलेस्टिनी नागरिकांनी सिनाईमध्ये प्रवेश केला होता. अशा घटना भविष्यात घडू नयेत म्हणून इजिप्त सरकारने या सीमेवर थेट दगडी आणि सिमेंटची भिंत उभारण्याचा निर्णय घेतला होता.
सीमेतून गंभीर जखमींनाच इजिप्तमध्ये येण्यास परवानगी
इस्रायल आणि पॅलेस्टिनींमध्ये सुरू असलेला संघर्ष थांबावा यासाठी इजिप्तने याआधी मध्यस्थाची भूमिका पार पडलेली आहे. मात्र सध्याच्या युद्धामुळे इजिप्तनेदेखील गाझाला लागून असलेली आपली सीमा बंद केली आहे. या सीमेतून गंभीर जखमींनाच इजिप्तमध्ये येण्यास परवानगी दिलेली आहे.
अरब देश पॅलेस्टिनींना का नाकारतात?
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे सध्या अरब राष्ट्रांत चिंतेचे वातावरण आहे. कारण या युद्धामुळे अनेक लोक कायमचे विस्थापित होऊ शकतात. या युद्धामुळे विस्थापितांची नवी लाट येऊ शकते. सध्या इजिप्त हा एकमेव अरब देश आहे, ज्याची एक सीमा गाझा या प्रदेशाशी लागून आहे. तर जॉर्डन या देशाची एक सीमा सध्या इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँक या प्रदेशाला लागून आहे. त्यामुळे इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे पॅलेस्टिनी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होईल, अशी भीती अरब राष्ट्रांना आहे. तसे होऊ नये म्हणून अरब देश योग्य ती खबरदारी घेतात.