Israel Palestine conflict Haifa war memories जागतिक इतिहासात २३ सप्टेंबर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, या दिवशी भारतीय आणि इस्रायली सरकारी अधिकारी हैफा युद्धाच्या स्मरणार्थ परदेशातील ‘हैफा युद्ध स्मशानभूमीत’ युद्धात शहीद झालेल्या आणि जखमी झालेल्या भारतीय सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी एकत्र येतात. २३ सप्टेंबर १९१८ हैफाचा विजय दिन असून याच दिवसाचे स्मरण दिन म्हणून या परंपरेचे पालन केले जाते. यावर्षी इस्रायलमधील भारताचे राजदूत आणि हैफाचे महापौर यांनी हैफा मुक्त करणाऱ्या शूर भारतीय सैनिकांना हैफाच्या लढाईच्या १०५ व्या वर्धापन दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. हैफाच्या लढाईत लढलेले भारतीय सैनिक नऊ दशकांहून अधिक काळ ब्रिटिश साम्राज्याच्या पायदळाचा एक महत्त्वपूर्ण भाग होते. असे असले तरी, हा इतिहास केवळ कुठल्यातरी पुस्तकाच्या पानांमध्ये दडून गेला आहे. असे निवृत्त ब्रिगेडिअर आणि ‘द स्टोरी ऑफ द जोधपूर लान्सर्स’ या पुस्तकाचे लेखक डॉ. एम एस जोधा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. जोधा यांनी सांगितल्याप्रमाणे, “२०१० पर्यंत हैफा दिवस साजरा झाला नाही, कारण लोकांना यामागचा इतिहासचं माहीत नव्हता. पण जोधा या लढाईचे किस्से ऐकत मोठे झाले होते. हे युद्ध सुमारे ४००० किलोमीटर दूर एका अनोळखी भूमीत झाले होते, यामागील मुख्य कारण म्हणजे त्यांचे आजोबा लेफ्टनंट कर्नल अमन सिंग (OBI, IOM) हे होते, ज्यांनी जोधपूर लान्सर्सच्या प्रसिद्ध घोडदळाचे नेतृत्व केले होते. जोधा यांच्या आजोबांसारख्या अनेक भारतीय वीरांमुळे २३ सप्टेंबर १९१८ रोजी हैफा येथे ब्रिटिश साम्राज्याचा निर्णायक विजय झाला. त्यानंतर, २० वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेल्या जोधा यांच्या संशोधनामुळे भारतीय आणि इस्रायली दोन्ही सरकारांकडून भारतीय सैनिकांच्या योगदानाला मान्यता मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐतिहासिक पार्श्वभूमी

हैफाची लढाई पहिल्या महायुद्धादरम्यान सिनाई आणि पॅलेस्टाईन मोहिमेचा एक भाग म्हणून लढली गेली, जिथे ब्रिटिश साम्राज्य, इटलीचे राज्य आणि फ्रेंच तिसरे प्रजासत्ताक, अरब बंडाच्या बरोबरीने ऑटोमन साम्राज्य, ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्य आणि जर्मन साम्राज्य यांच्या विरोधात लढले. पहिल्या महायुद्धादरम्यानच्या इतर लढायांच्या तुलनेत या युद्धाकडे ऐतिहासिकदृष्ट्या कमी लक्ष वेधले गेले असले तरी, ते महत्त्वपूर्ण होते कारण त्याचा दीर्घकालीन प्रभाव झाला. या युद्धाची परिणीती ऑटोमन साम्राज्याच्या फाळणीत झाली, ज्यामुळे १९२३ साली तुर्कीच्या प्रजासत्ताकाची, त्यानंतर १९३२ मध्ये इराकची, १९४३ मध्ये लेबनीज प्रजासत्ताकाची, १९४६ मध्ये जॉर्डन आणि सीरियन अरब प्रजासत्ताक आणि १९४८ मध्ये इस्रायल राज्याची निर्मिती झाली.

आणखी वाचा : जेरुसलेम: एका शहराच्या तीन कथा … ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम

भारतीय लान्सर्सचा सहभाग

जोधा यांच्या संशोधनानुसार, जुलै १९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय उपखंडातील जोधपूर या संस्थानात बातमी पोहोचली. त्यामुळे सर प्रताप सिंग (एक ब्रिटीश भारतीय सैन्य अधिकारी), इदर (आधुनिक गुजरात) या संस्थानाचे महाराजा आणि जोधपूरचे प्रशासक आणि रीजेंट यांनी इंग्रजांना आश्वासन देण्यास प्रवृत्त केले की संस्थानाच्या संसाधनांचा युद्धासाठी वापर केला जाईल.
त्यानंतर ब्रिटीश भारतीय सरकारने उपखंडातील इतर संस्थानांना जोधपूर सारखे सैन्य उपखंडाच्या बाहेर पाठवण्याचे आवाहन केले. ब्रिटिश इंडियन आर्मीच्या अंतर्गत सेवा करून ब्रिटीश इंडियन आर्मीचा गणवेश परिधान करून, युद्धात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा वापरण्याचे हे आवाहन होते.
हैफाच्या लढाईच्या बाबतीत, जमवाजमव झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर, जोधपूर संस्थानाने स्वखर्चाने घोडे, वाहतूक तंबू, काठी, कपडे आणि इतर उपकरणे पुरवली. जोधा यांच्या संशोधनानुसार, पहिल्या महायुद्धाच्या उद्देशाने जोधपूर लान्सर्सच्या दोन्ही रेजिमेंट एकत्र करून एक युनिट तयार करण्यात आले.
जोधा आपल्या संशोधनात नमूद करतात की, इजिप्शियन एक्स्पिडिशनरी फोर्सचे ब्रिटीश कमांडर जनरल एडमंड अ‍ॅलेन्बी यांच्या नेतृत्वाखाली हैफा या ठिकाणाचे महत्त्व जाणून घेतले. “हैफा हे एक महत्त्वाचे बंदर आणि रेल्वेमार्ग होते , हे महत्त्व जाणून हा भाग ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला गेला.

हैफाची लढाई

त्याच वर्षी २२ सप्टेंबर रोजी हैफा ऑटोमन सैन्याने ताब्यात घेतल्याची बातमी आली होती. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी, २३ सप्टेंबर रोजी, १३, १४ आणि १५ घोडदळ ब्रिगेडचा समावेश असलेल्या ५ व्या घोडदळ विभागाला हैफा ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले. १५ कॅव्हलरी ब्रिगेडमध्ये जोधपूर लान्सर्स, म्हैसूर आणि हैदराबाद लान्सर्सचा समावेश होता. त्या दिवशी हैदराबाद लान्सर्स ५०-६० किमी मागे होते, आणि जोधपूर लान्सर्स आघाडीवर होते, त्यात त्यांना म्हैसूर लान्सर्सची साथ मिळाली होती, त्यांनी एकत्रित हैफाला सुरक्षित केले होते,” असे जोधा नमूद करतात. वर्षानुवर्षे गोळा केलेल्या माहितीचा वापर करून, जोधा यांनी जोधपूर लान्सर्सच्या दृष्टीकोनातून लढाई कशी झाली याचे तपशील संकलित केले आहेत. जोधपूर लान्सर्स यांच्याकडे घोडदळाचा ताबा होता. या युद्धात मशीन गन आणि फील्ड आर्टिलरी गन यांसारख्या आधुनिक शस्त्रांचा वापर केला.

त्याच काळात या घोडदळात नवे शस्त्र सामील झाले. हे शस्त्र बारा फूट लांब होते. बांबू आणि तलवार अशी एकत्रित रचना केलेली होती. या शस्त्राचे नाव ‘लान्सर्स’ होते. या शस्त्राच्या नावावरून या भारतीय सैनिकांना ‘लान्सर्स’ म्हणून संबोधले गेले. हे शस्त्र वेगाने येते, आपल्या शत्रूला गुंतवून ठेवते. हे शस्त्र लांबून देखील शत्रूला घातक ठरते. त्याच प्रमाणे भारतीय सैनिक वेगाने येतात आणि शत्रुंना मारतात. त्यांची शस्त्रे एक भाला आणि तलवार होती, ते जमिनीवर होते तर ऑटोमन तुर्क हे रायफल, मशीन गन आणि फील्ड आर्टिलरीसह उंचावर होते,” असे जोधा सांगतात.

आणखी वाचा : इस्रायलमध्ये स्थलांतर भारतीय ज्यूंसाठी (बेने इस्रायली) सोपे का नव्हते?

कमांडिंग ऑफिसर मेजर दलपतसिंग शेखावत असले तरी हैफा बंदर ताब्यात घेतल्यानंतर हैफाच्या लढाईच्या सुरुवातीला ते युद्धात मारले गेले. जोधा यांचे आजोबा लेफ्टनंट कर्नल अमन सिंग हे पुढील वरिष्ठ अधिकारी होते आणि हल्ल्याचे नेतृत्व करणारे पुढचे कमांडिंग अधिकारी ठरले.
“या सैन्याचे नेतृत्व तेव्हा माझ्या आजोबांनी केले होते. पहिल्या महायुद्धात शस्त्र म्हणून मशीन गनचा वापर करण्यात आला आणि त्याचा त्या युद्धावर विनाशकारी परिणाम झाला. या मशीन गनची रेंज सुमारे १२००-१५०० यार्ड होती,” असे जोधा सांगतात.

जोधपूर लान्सर्सनी त्यांचा हल्ला दुपारी २ वाजता सुरू केला, त्यांच्या घोडदळाने आणि त्यांच्या वेगाने ऑटोमन तुर्कांना आश्चर्यचकित केले, आणि त्यामुळेच ते मोठ्या प्रमाणात जमिनीवर ताबा मिळवू शकले. शेकडोच्या संख्येने ते गोळीबार करू शकतील अशी परिस्थिती असताना जोधपूर लान्सर्सच्या रेजिमेंटने ऑटोमन तुर्क आणि त्यांच्या मित्रपक्षांचे ८० सैनिक मारले आणि अनेक शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा तसेच १३५० कैद्यांना ताब्यात घेतले. भारतीय ब्रिगेडची वाताहत तुलनेने कमी होती, असे जोधा लिहितात, ऑपरेशनचे स्वरूप पाहता, यात सात अधिकारी मारले गेले आणि ३४ जखमी झाले, ६० घोडे मारले गेले आणि ८३ जखमी झाले. जोधपूर लान्सर्सपैकी सहा ठार झाले, तर २१ पुरुष जखमी झाले. मेजर दलपतसिंग दुखापतीतून सावरू शकले नाहीत.

हैफा दिवस

१५ व्या घोडदळ विभागाने विजय मिळविल्यानंतर, तेव्हापासून हा विजयी हैफा दिवस म्हणून साजरा केला जातो. “भारत सरकारला या लढाईची माहिती नव्हती तसेच इस्त्रायलकडेही फारशी माहिती नव्हती. संरक्षण मंत्रालयानेही फारसे संशोधन केले नव्हते,” असे जोधा सांगतात. त्यानंतरच्या काही वर्षांत भारतीय सैनिकांचा विजय आणि भूमिका हळूहळू विस्मरणात गेली. १९४७ साली भारताच्या स्वातंत्र्यानंतर, जोधपूर लान्सर्स, हैदराबाद लान्सर्स आणि म्हैसूर लान्सर्स सारख्या पूर्वीच्या संस्थानांच्या रेजिमेंट्स इतर रेजिमेंटमध्ये विलीन झाल्या किंवा विसर्जित केल्या गेल्या. “पण पंतप्रधान नेहरू म्हणाले होते की, आमच्याकडे औपचारिक आणि क्रीडा हेतूंसाठी यापैकी किमान एक रेजिमेंट असली पाहिजे. म्हणून १९५३ साली, त्यांनी एक नवीन घोडदळ रेजिमेंट तयार केली, त्यात जोधपूर, ग्वाल्हेर, म्हैसूर, हैद्राबाद या रेजिमेंटस विलीन करण्यात आल्या आणि त्याला ६१ वे घोडदळ रेजिमेंट म्हणतात, ते आता जयपूरमध्ये असते,” असे जोधा सांगतात. तेव्हापासून, ६१ व्या घोडदळ रेजिमेंटने हैफा दिवसाचे स्मरण राखले आहे. ६१ वे घोडदळ वर्षानुवर्षे या विजयाचे स्मरण करत असले तरी त्याची फारशी ओळख नव्हती. फक्त रेजिमेंट त्यांच्याच युनिटमध्ये तो साजरा करत होती,” असे जोधा सांगतात. दरवर्षी या दिवशी, युनिट एक बडाखाना आयोजित करते, जिथे अधिकारी खाण्यापिण्यासाठी एकत्र येतात आणि लढाईतील विजयाचे स्मरण करतात.

आणखी वाचा : इस्रायल माझ्या हृदयात आहे, भारत माझ्या रक्तात आहे; भारतातील ज्यू समाज !

तीन मूर्ती चौक

हैफा येथील विजयानंतर, ब्रिटिश भारतीय सैन्याचा एक भाग म्हणून लढण्यासाठी लान्सर्स पाठवणाऱ्या तीन महाराजांनी, ‘विजय आणि भारतीय सैनिकांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी राष्ट्रपती भवनापासून काही अंतरावर दिल्लीत एक स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला.
“महाराजांनी प्रत्येकी ३००० पौंडांचे योगदान दिले. हैदराबाद, म्हैसूर आणि जोधपूरच्या अज्ञात सैनिकांसाठी दिल्लीत तीन मूर्ती तयार करण्यात आल्या आणि मार्च १९२२ मध्ये व्हॉइसरॉयच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. ही गोष्ट फक्त एका छोट्या गटाला माहीत होती,” असे जोधा सांगतात. वर्षानुवर्षे, भारताच्या राजधानीच्या मध्यभागी हे पुतळे उभे आहेत, ज्यांना स्वातंत्र्यपूर्व भारताच्या इतिहासात त्याचे महत्त्व माहीत होते अशा मोजक्याच लोकांना याची जाणीव होती. हैफामध्ये आज, कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह्स कमिशन हैफा युद्ध स्मशानभूमीची देखरेख करते जेथे दोन्ही महायुद्धांतील मृत सैनिकांच्या कबरी आहेत. कमिशनने एक ऐतिहासिक नोंद सांगितली, त्या नोंदीनुसार “२३ सप्टेंबर १९१८ रोजी म्हैसूर आणि जोधपूर लान्सर्सने हैफा ताब्यात घेतले आणि ३३ वे संयुक्त क्लियरिंग हॉस्पिटल १५ ऑक्टोबर रोजी शहरात हलविण्यात आले. हैफा युद्ध स्मशानभूमी, जी मूळतः जर्मन स्मशानभूमीचा भाग होती, मुख्यतः रुग्णालयात दफन करण्यासाठी वापरली जात होती, परंतु येथे काही कबरी युद्धभूमीतून आणल्या गेल्या होत्या.
जोधा सांगतात, “ही १९१८ साली लढलेली लढाई होती आणि तिची कहाणी तेव्हा इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली होती. अनेक प्रकारे, दरवर्षी होणाऱ्या स्मरणोत्सवाचे बरेचसे श्रेय जोधा यांच्याकडे जाते, त्यांच्या संशोधनाशिवाय हैफाच्या लढाईत भारतीय सैनिकांच्या योगदानाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नव्हती.
“२००५ मध्ये, हैफामधील लोकांच्या एका गटाला शहराचा इतिहास शोधायचा होता. त्यावेळी त्यांना भारतीय सैनिकांविषयीचा संदर्भ एका वृत्तपत्राच्या कात्रणात सापडला. त्यानंतर या संदर्भात त्यांनी तेल अवीवमधील भारतीय राजदूत नवतेज सरना यांच्याकडे अधिक माहितीसाठी विचारले. सरना यांनी याबाबत परराष्ट्र मंत्रालयाला सांगितले आणि नंतर लष्कराच्या मुख्यालयातून अधिक माहिती मागितली. लष्कराच्या मुख्यालयाला ६१ वे घोडदळ हैफा दिवसाचे स्मरण करतात हे माहीत होते, ६१ वे घोडदळ आणि माझ्या संबंधाची जाणीव त्यांना होती कारण मी माझ्या संशोधनासाठी त्यांच्या मेस आणि ऑफिसमध्ये जात असे. ही गोष्ट २००८ मधली होती. म्हणून मी त्यांना बरेच तपशील दिले, त्यानंतर भारतीय दूतावासाने थेट माझ्याशी संपर्क साधला,” असे जोधा सांगतात. त्यांच्या संशोधनाचा उपयोग करून, २००९ साली इस्रायलमधील भारतीय दूतावासाने भारतीय सैनिकांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी २०१० मध्ये हैफा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. “म्हणून दोन-तीन वरिष्ठ अधिकारी आणि मी हैफाला गेलो, तिथे भाषणही केले. हैफाचे महापौर आणि इतर इस्रायली म्हणाले ‘आम्हाला हे माहीत नव्हते’ आणि आता ते दरवर्षी त्याचे स्मरण करतात,” असे जोधा सांगतात. २०१८ मध्ये, हैफाच्या लढाईच्या शताब्दी निमित्त तीन मूर्ती चौकाचे नाव बदलून तीन मूर्ती हैफा चौक असे करण्यात आले आणि त्याच वर्षी इस्रायलच्या अधिकृत भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, इस्रायलचे नेते पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह त्यांनी हैफातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel palestine conflict haifa war memories battle of haifa that battle of indian soldiers was decisive in the creation of israel svs