पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमासने गाझा पट्टीतून इस्रायलवर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल इस्रायलनेही पॅलेस्टाईनवर क्षेपणास्त्र डागले आहेत. या हल्ल्यामुळे आता इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात युद्ध सुरू झाले असून दोन्ही बाजूंनी मोठी जीवित आणि वित्तहानी होत आहे. या युद्धामुळे इस्रायलमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. इस्रायलमध्ये रुग्णसेवक, रुग्णसेविका म्हणून नोकरी करणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. भारतीय नागरिक असलेली शीजा आनंद नावाची अशीच एक रुग्णसेविका जखमी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक इस्त्रायलमध्ये रुग्णसेवक, रुग्णसेविका म्हणून का जातात? इस्त्रायलमध्ये काय सुविधा मिळतात? हे जाणून घेऊ या..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इस्रायलमध्ये १८ हजार भारतीय

सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत इस्त्रायलचे ७०० पेक्षा अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत, तर १५० नागरिकांना हमास या अतिरेकी संघटनेने ओलीस धरले आहे. याच कारणामुळे इस्रायलमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या भारताचे अंदाजे १८ हजार नागरिक इस्रायलमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. यातील साधारण १४ हजार भारतीय नागरिक हे इस्रायलमध्ये रुग्णसेवक म्हणून नोकरी करतात. वृद्ध तसेच इतर लोकांची काळजी घेण्याची या रुग्णसेवकांची जबाबदारी असते.

भारतीय नागरिक इस्रायलमध्ये रुग्णसेवक म्हणून का जातात?

पाश्चात्य देशात रुग्णसेवक, रुग्णसेविका म्हणून करिअर करण्याची उत्तम संधी मिळते. मात्र, इस्रायलमध्ये रुग्णसेवेची नोकरी तुलनेने अधिक फायदेशीर ठरते. कारण अशा प्रकारच्या नोकरीसाठी इस्रायलमध्ये अनेक सोईसुविधा मिळतात. तसेच या नोकरीसाठी इस्रायलमध्ये चांगला पगार मिळतो. इस्रायलमध्ये रुग्णसेवकांना दिला जाणारा पगार तसेच इतर सुविधा अन्य देशांत मिळत नाहीत. याच कारणामुळे भारतातील अनेक नागरिक रुग्णसेवक किंवा रुग्णसेविका म्हणून इस्रायलमध्ये नोकरीसाठी जातात.

प्रतिमहिना १.२५ लाख रुपये पगार मिळतो

इस्रायलमध्ये रुग्णसेवक, रुग्णसेविकेला साधारण प्रतिमहिना १.२५ लाख रुपये पगार मिळतो. यासह जेवणाची, राहण्याचीही व्यवस्था केली जाते. तसेच रुग्णसेवकाला इतर आरोग्यविषयक सुविधाही पुरवल्या जातात. विशेष म्हणजे कामाच्या तासांव्यतिरिक्त अधिक काम केल्यास त्याचा पगारही मिळतो. रुग्णसेवक, रुग्णसेविकांना इस्रायलमध्ये नियमानुसार सुट्टीदेखील मिळते. याच कारणामुळे या देशात भारत तसेच अन्य देशांतील नागरिक रुग्णसेवक म्हणून नोकरी करतात.

रुग्णाच्या घरी जाऊन काळजी घ्यावी लागते

अशा प्रकारच्या कामासाठी रुग्णसेवक व्हिसा (केअरगिव्हर व्हिसा) दिला जातो. हा व्हिसा चार वर्षे आणि तीन महिन्यांच्या कालावधीसाठी असतो. कालावधी संपल्यानंतर व्हिसाचे नूतनीकरण करता येते. इस्रायलमध्ये रुग्णसेवक म्हणून गेल्यास तेथील काही नियम पाळावे लागतात. नोकरीवर रुजू झाल्यानंतर रुग्णाच्या घरी जाऊन त्याची काळजी घ्यावी लागते. रुग्णाच्या घरी रुग्णसेवकांची वेगळी सोय केलेली असते. इस्रायलमध्ये नोकरी करणाऱ्या रुग्णसेवक, रुग्णसेविकांना फक्त रुग्णाचीच काळजी घ्यावी लागते. अन्य देशांत मात्र कामाचा अधिक भार असतो. मध्येच रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णसेवकाला दुसरी नोकरी शोधण्याची परवानगी असते. यासह रुग्णसेवेचे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही रुग्णसेवकाला दुसरी नोकरी शोधण्यास मोकळीक असते.

इस्रायलमध्ये रुग्णसेवक म्हणून जाण्यास काय शिक्षण हवे?

वयोवृद्ध तसेच अपंगांची काळजी घेण्यासाठी इस्रायलमध्ये रुग्णसेवक, रुग्णसेविका म्हणून नोकरी मिळते. हे रुग्णसेवक शिक्षित आणि प्रशिक्षित असतात. एखाद्या भारतीय व्यक्तीला इस्रायलमध्ये रुग्णसेवक, रुग्णसेविका म्हणून नोकरी करायची असेल तर संबंधित व्यक्तीने नर्सिंगची पदवी तसेच एएनएम, जीएनएम असे कोर्सेस केलेले असणे बंधनकारक असते. इस्रायलमध्ये रुग्णसेवक म्हणून नोकरी करायची असल्यास हिब्रू भाषा समजावी म्हणून एका महिन्याचा विशेष कोर्स करावा लागतो. अन्य देशांत अशा प्रकारची नोकरी हवी असल्यास आयईएलटीएस (इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टीम) किंवा ओईटी (ओक्यूपेशनल इंग्लिश टेस्ट) या परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे असते. इस्रायलमध्ये मात्र अशी कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही. नोकरी मिळण्यापूर्वी भारतातील इस्त्रायली दूतावासातर्फे हिब्रू भाषेच्या ज्ञानासंदर्भात एक चाचणी घेतली जाते.

इस्रायलमध्ये रुग्णसेवक म्हणून नोकरी कशी मिळते?

१९९० च्या मध्यात इस्रायलमध्ये रुग्णसेवक, रुग्णसेविका म्हणून जाणाऱ्यांची संख्या वाढली. १९८६ साली इस्रायलच्या सरकारने एक कायदा लागू केला होता. या कायद्यानुसार वृद्ध किंवा अपंग व्यक्तींना त्यांच्या राहत्या घरी उपचार तसेच काळजी घेण्याचा अधिकार देण्यात आला. पुढे इस्रायलमधील वृद्ध, अपंग व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून स्थानिक प्रशासनाकडे रुग्णसेवकांची मागणी केली जाऊ लागली. त्यामुळे कालांतराने रुग्णसेवकांची काळजी घेण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जाऊ लागली. सरकारने एखाद्या व्यक्तीला रुग्णसेवक मिळण्यास परवानगी दिल्यास त्या व्यक्तीचे कुटुंबीय नियुक्त केलेल्या एजन्सीकडे त्यासंबंधी मागणी करतात. या एजन्सी नंतर भारत तसेच इतर देशांत मागणीनुसार भरती प्रक्रिया राबवतात. भारतासह, फिलीपिन्समधील नर्सेसही इस्रायलमध्ये रुग्णसेवक, रुग्णसेविका म्हणून नोकरी करतात.

भारतात रुग्णसेवक म्हणून मिळतो कमी पगार

भारतातील कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यांतील नर्सेस रुग्णसेवक, रुग्णसेविका म्हणून इस्रायलमध्ये जातात. भारतात नर्सिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांना कमी वेतन दिले जाते. या क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांत महिलांचे प्रमाण अधिक आहे. लग्न तसेच मूल झाल्यानंतर महिला काही काळासाठी ब्रेक घेतात. त्यानंतर याच महिलांना पुन्हा नोकरी मिळणे अवघड होते. एएनएम तसेच जीएनएम डिप्लोमा केलेल्यांना भारतात खूप कमी वेतन मिळते. केरळमध्ये तर वेतनाचे प्रमाण खूपच कमी आहे. इस्रायलमध्ये रुग्णसेवक म्हणून नोकरी हवी असल्यास वेगवेगळ्या प्रक्रियेसाठी तसेच एजंट्सवर साधारण आठ लाख रुपयांपर्यंतच खर्च होतो. मात्र, एकदा नोकरी लागल्यानंतर हा खर्च भरून काढणे अगदी सोपे आणि सहज शक्य होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel palestine war know why indian nurses go to israel for job of caregivers prd