सध्या पॅलेस्टाईनमधील हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर या युद्धाला अधिकृतपणे सुरुवात झालेली आहे. या युद्धादरम्यान हमासने अनेक इस्रायली नागरिकांना कैद केले आहे. इस्रायलकडून या ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे. मात्र हमासने या लोकांना नेमके कोठे ठेवले आहे, याची माहिती इस्रायला मिळत नाहीये. याच कारणामुळे आता इस्रायलाने पॅलेस्टिनींना एक आवाहन केले आहे. हे आवाहन काय आहे? इस्रायली सरकार पॅलेस्टिनींना पैसे का देत आहे? हे जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पॅलेस्टिनी नागरिकांना प्रलोभन

हमासने कैद केलेल्या नागरिकांना कोठे ठेवले आहे, याची निश्चित माहिती इस्रायली सैन्याकडे नाही. इस्रायली सरकार ओलिस ठेवेलेल्या या लोकांचा जमेल त्या मार्गाने शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अद्याप यात कोणतेही यश आलेले नाही. मात्र आता इस्रायलने पॅलेस्टिनी नागरिकांना प्रलोभन देण्यास सुरुवात केली आहे. आम्हाला कैद केलेल्या लोकांना कोठे ठेवण्यात आले आहे याची माहिती द्यावी, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. तुमचे नाव गुप्त ठेवू. तुमच्या घराची, कुटुंबाची तसेच तुमच्या सुरक्षेची हमी घेऊ, असे इस्रायल सरकारकडून सांगितले जात आहे. हा संदेश पॅलेस्टिनी नागरिकांपर्यंत पोहोचावा म्हणून इस्रायली लष्कराने बक्षीसाची हमी देणारी पत्रके हेलिकॉप्टरच्या माध्यमातून गाझा पट्टीत फेकली आहेत. तसे वृत्त फ्रान्समधील एएफपी नावाच्या वृत्तसंस्थेने दिले आहे. इस्रायलने गाझावर हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांत आतापर्यंत ५००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, असा दावा हमासकडून केला जात आहे. हे आरोप होत असतानाच इस्रायलने ओलिस ठेवलेल्यांची माहिती द्यावी, आम्ही बक्षीस देऊ असा संदेश देणारी पत्रके हेलिकॉप्टरमधून फेकली आहेत.

पत्रकांत नेमके काय आहे?

ओलिस ठेवलेल्यांची माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवण्यात येईल. तसेच त्याला पूर्ण सुरक्षा देण्यात येईल, अशी हमी इस्रायल डिफेन्स फोर्सने दिली आहे. “तुम्हाला तुमचे आणि तुमच्या मुलांचे भविष्य चांगले असावे असे वाटत असेल तर आम्हाला ओलिस असलेल्या लोकांना नेमके कोठे ठेवले आहे हे सांगा. आम्हाला सुरक्षित आणि उपयोगात येणारी माहिती द्या,” असे आवाहन इस्रायली डिफेन्स फोर्सने या पत्रकांच्या माध्यमातून केले आहे. “तुमचे नाव गुप्त ठेवले जाईल. तसेच तुमच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल. तुम्हाला आर्थिक स्वरुपात बक्षीसही दिले जाईल. आम्ही तुमच्या सुरक्षेची हमी घेतो,” असेही या संदेश पत्रकात म्हणण्यात आले आहे.

इस्रायली डिफेन्स फोर्सने गाझा पट्टीत टाकलेल्या या पत्रकांत एक टेलिफोन नंबर देण्यात आला आहे. यासह टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, सिग्नल मेसेजिंग अॅपशी संबंधित तपशील देण्यात आला आहे. तसेच या तपशीलाची मदत घेऊन आमच्याशी संपर्क साधावा, असेही या पत्रकात नमूद आहे.

इस्रायली लष्करानेदेखील पत्रके फेकल्याची दिली पुष्टी

इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF)अशा प्रकारची पत्रके फेकल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. या मोहिमेबाबत इस्रायल डिफेन्स फोर्सने एक्सच्या (पूर्वीचे ट्विटर) माध्यमातून प्रतिक्रिया दिली. “इस्रायली नागरिक आणि काही परदेशी नागरिकांना हमास या दहशतवादी संघटनेने ओलिस ठेवले आहे. त्यांची सुटका करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज गाझा येथील रहिवाशांशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. ओलिस ठेवलेल्या लोकांना कोठे ठेवण्यात आले आहे याची माहिती द्यावी, असा संदेश त्यांना देण्यात आला आहे,” असे इस्रायलच्या लष्कारने आपल्या निवेदनात सांगितले.

हमासने चार जणांची सुटका केली

दरम्यान, हमासने ओलिस ठेवलेल्यांपैकी चार जणांची सुटका केली आहे. या सुटकेसाठी कतार देशाने मध्यस्थी केली. आणखी ५० जणांची सुटका करण्यासाठीही कतारतर्फे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे इस्रायली लष्कर ओलिस ठेवलेल्यांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत आहे. यामध्ये पाळत ठेवणे, विशेष सैनिकांच्या मदतीने छापेमारी करणे, हमास संघटनेतील पकडलेल्या दहशतवाद्यांची चौकशी करणे आदी प्रयत्न इस्रायली लष्कराकडून केले जात आहेत. मात्र अद्याप इस्रायला ओलिस ठेवलेल्या नागरिकांचे नेमके ठिकाण समजू शकलेले नाही.

पॅलेस्टिनी नागरिकांनी पत्रके फाडून टाकली

गाझा पट्टीत पत्रके टाकून इस्रायली सैनिक ओलीस ठेवलेल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यासह या पत्रकांच्या माध्यमातून गाझा पट्टीत अनिश्चितता, अस्थिरता निर्माण करण्याचाही प्रयत्न इस्रायलकडून केला जात आहे. मात्र गाझामधील अनेकांनी ही पत्रके फाडून टाकली आहेत. गार्डियनने तसे वृत्त दिले आहे. यातील दक्षिण गाझा येथील एका रुग्णालयात थांबलेल्या पॅलेस्टिनी नागरिकाने पत्रके फाडताना प्रतिक्रिया दिली. आम्हाला तुमच्यावरून काहीही देणेघेणे नाही. तुम्हाला जे करायचे आहे, ते करा. गाझातील आम्ही सर्वजण पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत तुमचा प्रतिकार करत आहोत, असे या निर्वासिताने म्हटले.

शोधमोहीम राबवणे कठीण का आहे?

ओलिस ठेवलेल्या नागरिकांचा शोध घेणे तसे कठीण आहे. असे असले तरी इस्रायली सैनिक गाझा पट्टीच्या सीमेवर तळ ठोकून आहेत. आदेश मिळताच हे सैनिक हमास या संघटनेचा नायनाट करण्याच्या तयारीत आहेत. यासह ते गाझा पट्टीवर ताबादेखील मिळवणार आहेत. मात्र ओलिस नागरिकांना नेमके कोठे ठेवण्यात आलेले आहे, हे अद्याप इस्रायली लष्कराला समजू शकलेले नाही. इस्रायलच्या म्हणण्यानुसार ओलिस ठेवलेल्यांमध्ये इस्रायलींसह अन्य देशांच्या नागरिकांचाही समावेश आहे. गाझामध्ये तयार करण्यात आलेल्या बोगद्यांमध्ये कैद करण्यात आलेल्या नागरिकांना कोठे ठेवण्यात आले असावे, असा अंदाज बांधला जात आहे. नुकतेच हमासने काही लोकांची सुटका केली आहे. यामध्ये ८५ वर्षीय योचेव्हड लिफशिट्झ या वृद्ध महिलेचा समावेश आहे. गाझामध्ये नेताना या महिलेला काठीने मारण्यात आले होते. या महिलेच्या माहितीनुसार कैद केलेल्यांना जमिनीतील बोगद्यांत ठेवण्यात आले आहे.

ओलीस ठेवलेल्यांमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश?

विशेष म्हणजे हमास या एकट्या संघटनेनेच सर्व नागरिकांना कैद केलेले आहे का? याबाबतही निश्चित माहिती उपलब्ध नाही. काही नागरिकांना अन्य दहशतवादी गटाने तसेच गुन्हेगारी टोळ्यांनी कैद केल्याचा दावा केला जातो. कैद करण्यात आलेल्यांमध्ये काही काही लोक अन्य देशांचे असल्यामुळेदेखील हे प्रकरण अधिक संवेदनशील तसेच किचकट झाले आहे. सध्या फ्रान्सचे ७, थायलंडचे १७ जर्मनी तसेच अमेरिकेचे काही नागरिक बेपत्ता असल्याचा दावा केला जात आहे. तसे वृत्त गार्डियनने दिले आहे. दरम्यान, इस्रायली सरकारच्या म्हणण्यानुसार २२० पेक्षा जास्त इस्रायली नागरिक, दुहेरी नागरिकत्व असणारे तसेच अन्य परदेशी नागरिकांचे हमासच्या हल्ल्यादरम्यान अपहरण करण्यात आले. ७ ऑक्टोबर रोजी हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात इस्रायचे १४०० पेक्षा अधिक नागरिक मृत्युमुखी पडल्याचा दावा इस्रायली सरकारने केला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel trying to get information on hostages by throwing leaflets at gaza strip know detail information prd
Show comments