हमासला धडा शिकवण्यासाठी इस्रायलने गाझापट्टीवर बॉम्बहल्ले सुरू केल्यानंतर उत्तर गाझामधील लोकांना तो भाग सोडून दक्षिणेच्या दिशेला जाण्याचे फर्मान सोडण्यात आले. जीवाची भीती असतानाही उत्तर भागातील अनेक लोक दक्षिणेला जायला तयार नाहीत, त्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे दक्षिणेकडे जाण्यासाठी लागणारा खर्च आणि दुसरे म्हणजे तिथेही जीव वाचण्याची कोणतीही शाश्वती नाही. द न्यूयॉर्क टाइम्सने याविषयावर एक सविस्तर लेख लिहिला आहे. इस्रायल-हमास यांच्या युद्धाला दोन आठवड्यांहून अधिकचा वेळ लागल्यानंतर सद्यपरिस्थिती काय आहे? याचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इस्रायल लष्कराने शनिवारी रात्री सांगितल्याप्रमाणे बॉम्बहल्ल्यानंतर आता जमिनीवरील हल्ल्याची तयारी केली जात आहे. यासाठी शनिवारी गाझापट्टीत अरेबिक भाषेतील पत्रके फेकण्यात आली. जे लोक दक्षिण दिशेकडे मार्गक्रमण करणार नाहीत, त्यांना दहशतवादी संघटनेचे साथीदार मानण्यात येईल, अशा धमकीचा इशारा या पत्रकाद्वारे देण्यात आला.

हे वाचा >> स्वतःच्याच देशात परके झालेले पॅलेस्टिनी नागरिक नेमके कोण आहेत? 

दक्षिण दिशेकडे जाण्यास पैसे नाहीत

उत्तर गाझामधील जबालिया शहरात राहणाऱ्या अमानी अबू ओदेह म्हणाल्या की, रस्त्यांवर इस्रायली हल्ल्याचा धोका असल्यामुळे प्रवासाचा खर्च प्रचंड वाढला आहे. एका कुटुंबाला दक्षिण दिशेला नेण्यासाठी २०० ते ३०० डॉलर्स मागितले जात आहेत. युद्ध सुरू होण्यापूर्वी एका व्यक्तीला दक्षिणेकडे जाण्यासाठी फक्त तीन डॉलर लागत होते. “आमच्याकडे सध्या खाण्याच्या वस्तू घेण्यासाठीही पैसे नाहीत, तर मग प्रवासासाठी पैसे कुठून आणायचे?” अशी खंत ओदेह व्यक्त करतात. दक्षिण दिशेला जाण्यापेक्षा त्यांनी कुटुंबासह घरातच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

गाझापट्टीला अन्न, पाणी आणि इतर अत्यावश्यक वस्तूंची मोठी कमतरता भासत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गाझामधील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. युद्ध चालू झाल्यानंतर इस्रायलने गाझाभोवतीचा फास आणखी घट्ट आवळला, त्यामुळे गाझाला दोन आठवडे मानवी मदतीचा पुरवठा होऊ शकला नाही. गेल्या दोन दिवसांपासून इजिप्तच्या दिशेला असलेल्या राफा सीमेवरून काही मदत पुरविण्यात येत असली तरी ती अद्याप सर्व ठिकाणी पोहोचलेली नाही.

इस्रायलने हवाई हल्ले सुरू केल्यानंतर मुंबईपेक्षा लहान असलेल्या गाझापट्टीतील तब्बल वीस लाख लोक आपल्या घरा-दारातून विस्थापित होऊन शहराच्या दुसऱ्या टोकाला जीवाच्या आकांताने प्रवास करत आहेत. त्यातही उत्तर भागात इस्रायलकडून भिरकावण्यात आलेल्या पत्रकाबद्दल संयुक्त राष्ट्राच्या पॅलेस्टाईनमधील प्रतिनिधी फ्रान्सेस्का अल्बानेज यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हे वाचा >> विश्लेषण : गाझा पट्टीतील मुलांची दुरवस्था का झाली? युद्धाचा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?

संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींकडून इस्रायलचा निषेध

फ्रान्सेस्का अल्बानेज यांनी एक्स या सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करताना म्हटले की, उत्तरेकडून दक्षिणेकडे अनेक अडचणींमुळे प्रवास करू न शकणाऱ्या हजारो सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांना दहशतवाद्यांचे साथीदार मानून त्यांना शिक्षा देण्याची धमकी देणे पूर्णपणे चुकीचे आहे किंवा गाझापट्टीत वांशिक हिंसाचार करण्याचा हा प्रयत्न आहे. अल्बानेज पुढे म्हणाल्या की, सामान्य नागरिकांना जाणूनबुजून लक्ष्य करणे हा युद्ध गुन्हा आहे.

द न्यूयॉर्क टाइम्सने इस्रायलच्या लष्कराला काही प्रश्न विचारले असता लष्कराच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, गाझापट्टीच्या उत्तरेकडून जे लोक दक्षिणेकडे जाणार नाहीत, त्यांना दहशतवादी गटांचा भाग मानण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. आम्ही सामान्य नागरिकांना या पद्धतीने दक्षिणेकडे जायला सांगतोय, याचा अर्थ आम्ही त्यांना लक्ष्य करतोय असे होत नाही. तसेच इस्रायलच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, गाझापट्टीतील नागरिकांना विस्थापित होण्याची सूचना देणे म्हणजे आम्हाला त्यांचा वांशिक खात्मा करायचा आहे, असे म्हणणे साफ चुकीचे आहे.

इस्रायलने पॅलेस्टिनी नागरिकांना दक्षिणेकडे जायला सांगतिले असले तरी त्या ठिकाणीही हवाई हल्ले चालू आहेत. इस्रायलच्या लष्कराचे प्रवक्ते डॅनिअल हगारी यांनी शनिवारी सांगितले की, युद्धाचा पुढचा टप्पा चालू झाला असून गाझापट्टीतील अनेक भागांवर हल्ले चढविण्यात येणार आहेत. यावरून लवकरच जमिनीवरील हल्ले सुरू होणार असल्याचा संदर्भ त्यांनी दिला.

मरण पत्करू, पण दक्षिणेकडे जाणार नाही

गाझापट्टीवर मानवतावादी संकट कोसळले असताना गाझापट्टीतील नागरिक दक्षिणेकडे कूच न करण्यास अनेक कारणे आहेत, ज्याची वर चर्चा करण्यात आलेली आहे. यासर शबान या ५७ वर्षीय नागरी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले, “मी दक्षिणेकडे अजिबात जाणार नाही. आमचे तिथे कुणीही नाही. मग तिथे जाऊन आम्ही काय करायचे? आम्ही इथेच आमच्या घरातच मरण पत्करू.”

आणखी वाचा >> अन्न, औषध, विजेचा तुटवडा, पॅलेस्टिनींपुढे संकटांचा डोंगर; गाझा पट्टीची सद्यस्थिती काय?

शबान पुढे म्हणाले, “७ ऑक्टोबरला जेव्हा हमासने इस्रायलवर हल्ला केला आणि त्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल हवाई हल्ले सुरू केले, तेव्हा त्यांच्या चुलत भावाने त्याच्या कुटुंबासह दक्षिणेकडे पलायन केले. पण, आठवड्याभरापूर्वीच दक्षिणकेडील खान युनिस या ठिकाणी जिथे त्यांचा चुलत भाऊ राहत होता, तिथेही इस्रायलने हवाई हल्ला केला. या हल्ल्यात चुलत भावाची बायको आणि दोन मुली मारल्या गेल्या. या हल्ल्यानंतर त्यांचा चुलत भाऊ पुन्हा एकदा उरलेल्या कुटुंबासह उत्तर दिशेला आपल्या घरी परतला आहे. त्याचा मुलगा आणि बहीण यांना गंभीर दुखापत झाली आहे, ते आता अल शिफा रुग्णालयात उपचार घेत आहेत.”

“इस्रायलकडून आता काही पत्रके भिरकविण्यात आली. ज्यात म्हटले की, जे लोक दक्षिण दिशेला जाणार नाहीत, त्यांना हमासचे साथीदार मानन्यात येईल. काहीही असले तरी आम्ही दक्षिणेकडे जाणार नाहीत”, असा ठाम निर्धार शबान यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel wants civilians to flee northern gaza why thats not an option for many kvg