साधारण एका महिन्यापसून पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत साधारण ११ हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. मृतांमध्ये साधारण दोन तृतीयांश महिला तसेच अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश आहे. दरम्यान इस्रायली सैन्याने हमासच्या कमांडरला ठार केले आहे. याच पार्श्वभूमीवर इस्रायलचा मारला गेलेला कमांडर कोण होता? इस्रायल गाझातील रुग्णालयांना लक्ष्य का करत आहे? हे जाणून घेऊ या…
“आतापर्यंत ११ हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू”
हमास संघटनेने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. तेव्हापासून इस्रायलमधील साधारण १२०० लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. तर हमासचे नियंत्रण असलेल्या गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत ११ हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने हमास या संघटनेला समूळ नष्ट करण्याचा निश्चय केला आहे. इस्रायली लष्कराकडून गाझा पट्टीत रोजच हल्ले केले जात आहेत. याच कारणामुळे गाझा पट्टीत मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कोण होता अहमद सियाम?
इस्रायली लष्कराने हमासचा कमांडर अहमद सियाम याला ठार केल्याचा दावा केला आहे. सियाम याने रांतिसी रुग्णालयात एकूण १ हजार लोकांना ओलीस ठेवले होते, असा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. “इस्रायली लष्कराच्या विमानाने नुकतेच अहमद सियाम याला ठार केले. त्याने गाझातील रहिवासी तसेच रांतिसी रुग्णालयातील काही रुग्णांना मिळून एकूण १ हजार लोकांना ओलीस ठेवले होते. सियाम या ओलीस ठेवलेल्या लोकांची सुटका करत नव्हता तसेच लोकांच्या दक्षिणेकडील स्थालांतरास अडथळा निर्माण करत होता,” अशी इस्रायलच्या लष्कराने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) माहिती दिली.
“सियामला ठार करण्यासाठी लढाऊ विमानांची मदत”
इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार इस्रायली सुरक्षा रक्षक दल ‘शिन बेट’ तसेच मिलिटरी इंटेलिजन्स डायरेक्टोरेटने सियामच्या ठावठिकाण्याची माहिती दिली होती. या माहितीनुसार लष्कराच्या गिवाती ब्रिगेड तुकडीने अहमद सियाम याला ठार करण्यासाठी लढाऊ विमानांची मदत घेतली.
“बुराक शाळेत हमासचे अतिरेकी”
इस्रायली सैन्याने उत्तर गाझातील अल नस्र परिसरातील बुराक शाळेवरही हल्ला केल्याचे कबूल केले आहे. या बुराक शाळेत कमांडर सियाम तसेच हमासचे अतिरेकी होते, असा दावा इस्रायली सैन्याने केलेला आहे. दोन दिवसांपूर्वी इस्रायली सैन्याने सियाम एक हजार पॅलेस्टिनींना रांतिसी रुग्णालयातून बाहेर पडण्यापासून रोखत आहे, असा आरोप केला होता. त्यानंतर आता इस्रायलने रांतिसी रुग्णालय तसेच बुराक शाळेवर हल्ला केला आहे.
शाळेतील हल्ल्यात कित्येक लोकांचा मृत्यू
इस्रायली सैन्याने गाझा शहरातील बराक शाळेवर केलेल्या हल्ल्यात कित्येक लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यांबाबत अल शिफा रुग्णालयाचे प्रमुख मोहम्मद अबू सालमिया यांनी माहिती दिली आहे. “अल-नसर परिसरातील अल-लबाबिदी रस्त्यावरील अल-बुराक शाळेतून साधारण ५० मृतदेह बाहेर काढण्यात आले. या शाळेवर क्षेपणास्त्र आणि तोफगोळे डागण्यात आले,” असे सालमिया म्हणाले.
“हमासकडून नागरिकांचा ढालीप्रमाणे वापर”
गेल्या काही दिवसांत इस्रायलने गाझा पट्टीतील अनेक रुग्णालये, वस्त्या, निर्वासितांची शिबिरे तसेच गाझा पट्टीतील प्रार्थना स्थळांवही हल्ले केले आहेत. हमास संघटनेकडून सामान्य नागरिकांचा एका ढालीप्रमाणे वापर केला जात आहे, असे म्हणत इस्रायलने या हल्ल्यांचे समर्थन केले आहे. रुग्णालय परिसरातील बोगद्यांत हमास आपल्या लष्करी कारवाया करत आहे, असा दावा इस्रायलकडून केला जात आहे. तर रुग्णालय परिसरात तसेच रुग्णालयाच्या खाली आमचे कमांड सेंटर्स नाहीत, असा दावा हमासने केला आहे.
हमासच्या अनेक सदस्यांना केले ठार
इस्रायलने आतापर्यंत हमासच्या अहमद सियामसह ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याशी संबंधित असलेल्या अली कादी, मुएताज ईद, झकारिया अबू मामर, जोआद अबू शामलाह, बेलाल अलकाद्रा आणि मेराद अबू मेराद अशा अनेक पदाधिकाऱ्यांना ठार केलेले आहे.
“रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून वीज नाही”
गाझा शहरात अल शिफा नावाचे सर्वांत मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयातील उपचाराचे काम ठप्प पडले आहे. या रुग्णालयाच्या बाहेर पॅलेस्टिनी अतिरेकी आणि इस्रायली सैन्यात युद्ध सुरू आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार न घेताच अनेक रुग्णांना रुग्णालयातून बाहेर पडावे लागलेले आहे. तसेच युद्धामुळे विस्थापित झालेले शेकडो रुग्ण आणि इतर लोक या रुग्णालयात अडकून पाडले आहेत. या रुग्णालयाच्या स्थितीबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी अधिक माहिती दिली आहे. या रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून वीज नाही. पाणीदेखील संपले आहे. या रुग्णालयाच्या बाहेर बॉम्बफेक केली जात आहे. रुग्णालयात अगोदरच भीषण परिस्थिती आहे. या हल्ल्यांमुळे ही स्थिती जास्तच भीषण झाली आहे. रुग्णालयात उपचार करता येत नाहीयेत, असे ग्रेबेयसस यांनी सांगितले.
“लहान मुलांना बाहेर काढण्यास तयार”
दुसरीकडे अल शिफा रुग्णालयातील स्थितीबद्दल इस्रायलनेदेखील प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही या रुग्णालयात अडकलेल्या लहान मुलांना बाहेर काढण्यास तयार आहोत, असे इस्रायलने म्हटले आहे. “बालरोग विभागातील छोट्या बाळांना बाहेर काढण्यासाठी आम्ही रुग्णालय प्रशासनाची मदत करण्यास तयार आहोत. बाळांची सुटका करण्यासाठी आम्ही आवश्यक ती सर्व मदत करू,” असे इस्रायलच्या लष्कराचे प्रवक्ते अॅडमिरल डॅनियल हगरी यांनी सांगितले.
आतापर्यंत ३२ रुग्ण तसेच ३ छोट्या मुलांचा मृत्यू
हामासचे नियंत्रण असलेल्या आरोग्य मंत्रालयानुसार इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत ३२ रुग्ण तसेच ३ छोट्या मुलांचा मृत्यू झालेला आहे. गेल्या तीन दिवसांत हे मृत्यू झाले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. यूएन पॅलेस्टिनी रेफ्युजी एजन्सीनेही १३ नोव्हेंबर रोजी इस्रायलच्या सध्याच्या हल्ल्याविषयी माहिती दिली. गाझा शहारातील इंधन डेपो बंद आहेत. रुग्णालयांना इंधन पुरवठा करणे शक्य नाही. रुग्णालयातील सांडपाणी काढणे तसेच पिण्याचे पाणी पुरवणे सध्या शक्य नाही, असे या एजन्सीने सांगितले.
रुग्णवाहिका, रुग्णालयांच्या कामांवर गंभीर परिणाम होणार
यूएन पॅलेस्टिनी रेफ्युजी एजन्सीचे कमिशनर जनरल फिलिप राझारिनी यांनीही इस्रायलच्या या ताज्या हल्ल्यांवर प्रतिक्रिया दिली. या हल्ल्यांमुळे रुग्णवाहिका आणि रुग्णालयांच्या कामांवर गंभीर परिणाम पडणार आहे. काही रुग्णालयांकडे सौरउर्जेची व्यवस्था आहे. मात्र काही तुरळक रुग्णालयांतच तशी व्यवस्था आहे, असे फिलिप लाझारिनी यांनी सांगितले. इस्रायलमधील रुग्णालयांची स्थिती सध्या गंभीर आहे. भविष्यात ही परिस्थिती अतिशय भीषण होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.