चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आता सूर्याची रहस्ये उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी इस्रोकडून ‘आदित्य एल-१’ हे अंतराळयान श्रीहरिकोटा येथून आज (२ सप्टेंबर) प्रक्षेपित करण्यात आले आहे. लाँचिंगनंतर १२७ दिवसांनी हे यान आपल्या निश्चित स्थळी पोहोचणार आहे. त्यानंतर इस्रोला सूर्याच्या अभ्यासाद्वारे आकाशगंगेतील, तसेच इतर आकाशगंगांमधील ताऱ्यांबाबत बरीच माहिती मिळवता येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सूर्याच्या आवरणाचा म्हणजेच कोरोनाचाही (सूर्याच्या वातावरणातील सर्वांत बाहेरच्या भागाला ‘कोरोना’ म्हणतात) अभ्यास करण्यात येणार आहे. मात्र, कोरोना म्हणजे नेमके काय आहे? त्याचा अभ्यास का केला जाणार आहे? यावर नजर टाकू या …
भारताचे ‘आदित्य एल-१’ उलगडणार सूर्याची अनेक रहस्ये
इस्रोने ‘एल १’च्या अभ्यासासाठी अवकाशयान पाठवले आहे. ‘एल-१’ हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील एक बिंदू आहे. तिथपर्यंत हे यान जाणार आहे. हा बिंदू पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर आहे म्हणजे आदित्य एल-१ हे यान तब्बल १५ लाख किलोमीटर दूर जाणार आहे. पूर्णपणे भारतीय बनावटीचे हे अवकाशयान सूर्याच्या दिशेने पाठवून सूर्याभोवतालची परिस्थिती आणि इतर संशोधन केले जाईल. त्यामध्ये कोरोनाचाही अभ्यास करण्यासाठी या यानामध्ये सात वेगवेगळी उपकरणे बसवण्यात आली आहेत.
कोरोना म्हणजे नेमके काय?
सूर्याच्या वातावरणात वेगवेगळे वायू आहेत. सूर्याभोवती या वायूंमुळे एक वेगळे वातावरण निर्माण झालेले आहे. या वातावरणाच्या सर्वांत बाहेरच्या भागाला ‘कोरोना’ म्हणतात. सूर्यपृष्ठावरील प्रखर प्रकाशामुळे कोरोना हे आवरण दिसत नाही. असे असले तरी विशेष उपकरणांच्या मदतीने हे आवरण पाहता येते. सूर्यग्रहण म्हणजेच खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळीही सूर्याचे कोरोना आवरण दिसते. त्यावेळी चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधून जातो. त्यामुळे सूर्यापासून निघणारे सूर्यकिरण चंद्राच्या अडथळ्यामुळे पृथ्वीपर्यंत पोहोचत नाहीत. याच काळात ग्रहण लागलेल्या सूर्याभोवती ‘कोरोना’ दिसू शकतो.
कोरोना आवरण सूर्याप्रमाणे प्रखर का नाही?
कोरोना आवरणाचे तापमान खूप आहे. असे असले तरी हे आवरण तुलनेने अंधुक दिसते. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे या आवरणाची घनता ही सूर्यपृष्ठापेक्षा साधारण १० दशलक्ष कमी आहे. सूर्याच्या तुलनेत कोरोनाची घनता कमी असल्यामुळे ते तुलनेने मंद, कमी प्रखर भासते.
सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा कोरोनाचे तापमान अधिक
कोरोना हे सूर्याभोवतालच्या वातावरणाच्या सर्वांत बाहेरचे आवरण असूनही तेथे उच्च तापमान का असते, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. खरे पाहायचे झाले, तर ते एक रहस्यच आहे, असे म्हणावे लागेल. समजा, तुम्ही एखाद्या शेकोटीजवळ बसलेला आहात. या शेकोटीजवळ बसल्यानंतर तुम्हाला उबदार आणि गरम वाटते. तुम्ही शेकोटीपासून जसजसे दूर जाल तसतसे तुम्हाला थंडी वाजू लागते. सूर्याच्या बाबतीत मात्र हे अगदी विरुद्ध आहे. सूर्याच्या पृष्ठभापासून तुम्ही जेवढे दूर जाल तेवढे तापमान वाढते. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान जेवढे आहे, त्याच्या शेकडो पट अधिक तापमान हे कोरोनाचे आहे. अनेक वर्षांपासून अंतराळवीर हे गूढ उकलण्याचा प्रयत्न करीत आहेत.
कोरोनाचे अतिशय उष्ण असण्याचे कारण काय?
अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने IRIS या मोहिमेच्या माध्यमातून हे गूढ उकलण्याचा प्रयत्न केला होता. या मोहिमेनंतर नासाने कोरोना एवढा उष्ण का? याचे संभाव्य उत्तर दिलेले आहे. या मोहिमेत कोरोना आवरणात अतिशय गरम अशी छोटी छोटी पॉकेट्स सापडली आहेत. या छोट्या छोट्या पॉकेट्सना नासाने ‘हीट बॉम्ब’, असे नाव दिले आहे. हे हीट बॉम्ब सूर्यापासून कोरोना आवरणात प्रवास करतात. कोरोना आवरणात आल्यानंतर या हीट बॉम्बचा स्फोट होतो. स्फोटानंतर त्यातून मोठ्या प्रमाणात उष्णता, ऊर्जा बाहेर पडते. याच कारणामुळे कोरोना आवरण सूर्यपृष्ठापेक्षा कितीतरी पट अधिक गरम आणि उष्ण असते, अशी मांडणी नासाच्या संशोधकांनी केलेली आहे. कोरोना उष्ण असण्याचे हीट बॉम्ब हे एकमेव कारण नसल्याचेही नासाच्या संशोधकांकडून सांगितले जाते.
चुंबकीय क्षेत्रामुळे कोरोनात निर्माण होतात वेगवेगळ्या आकारांच्या कड्या
सूर्याचा पृष्ठभाग हा चुंबकीय क्षेत्राने (Magnetic Fields) व्यापलेला आहे. या चुंबकीय क्षेत्राचा कोरोना आवरणावरही प्रभाव पडतो. या चुंबकीय क्षेत्रामुळे कोरोना आवरणात वेगवेगळ्या आकाराच्या कड्या तयार होतात. या कड्या स्ट्रीमर्स (Streamers), लूप्स (Loops), प्लुम्स (Plumes) असतात. विशेष दुर्बिणीच्या माध्यमातून आपल्याला या आकृत्या पाहता येतात.
कोरोनामुळे सौर वारे कसे निर्माण होतात?
कोरोनाची व्याप्ती ही अवकाशात खूप दूरवर आहे. अवकाशात सौर वारे तयार होण्यास कोरोना कारणीभूत आहे. कोरोना आवरण हे अतिशय उष्ण असल्यामुळे त्यातून निघणारा प्रत्येक कण हा कमी-अधिक प्रमाणात तेवढाच उष्ण असतो. या कणांची गती सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षाही जास्त असते. हे कण खूप वेगात प्रवास करीत असल्याने सौर वारे निर्माण होतात. हे सौर वारे पुढे सूर्यमालेतही प्रवास करतात.