ISRO 3D Printed Rocket Engine गेल्या वर्षभरात इस्रोने अनेक मोहिमा फत्ते केल्यात. चांद्रयान, आदित्य एल १, गगनयान यांसारख्या मोहिमांनी जगभरात भारताची मान उंचावली. आता पुन्हा एकदा इस्रोने आपल्या नावे एक नवा विक्रम केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने गुरुवारी (९ मे) ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार केल्या गेलेल्या लिक्विड रॉकेट इंजिनाची यशस्वी चाचणी केली. त्याला सामान्यतः थ्रीडी प्रिंटिंग म्हणून ओळखले जाते.
ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV) हे चार टप्प्यांचे रॉकेट आहे. लिक्विड रॉकेट इंजिन हे PSLV च्या वरील टप्प्याचे PS4 इंजिन आहे. थ्रीडी प्रिंटिंग वापरून उत्पादनासाठी इस्रोने PS4ला पुन्हा डिझाइन केले होते; ज्याची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. थ्रीडी प्रिंटिंग म्हणजे काय? ते कसे कार्य करते आणि इस्रोने या तंत्रज्ञानाचा वापर करून, इंजिन का तयार केले? याबद्दल जाणून घेऊ या.
हेही वाचा : भारतानेही अनुभवली नॉर्दर्न आणि सदर्न लाइट्सची जादू; याची निर्मिती नक्की कशी होते?
थ्रीडी प्रिंटिंग म्हणजे काय आणि ते कसे काम करते?
थ्रीडी प्रिंटिंग ही अशी एक प्रक्रिया आहे; जी संगणकाद्वारे तयार केलेल्या डिझाइनचा वापर करून, एकावर एक स्तर लावून वस्तू तयार करते. ही एक जोड प्रक्रिया आहे; ज्यामध्ये प्लास्टिक, संमिश्र किंवा जैव-सामग्रीचा वापर करून, विविध आकार आणि रंगांच्या श्रेणीतील वस्तू तयार केल्या जातात.
थ्रीडी प्रिंटिंग करण्यासाठी थ्रीडी प्रिंटरशी जोडलेले वैयक्तिक संगणक आवश्यक असते. त्यात केवळ कॉम्प्युटर-एड डिझाइन (CAD) सॉफ्टवेअरवर आवश्यक ऑब्जेक्टचे थ्रीडी मॉडेल डिझाइन करून, ‘प्रिंट’ बटण दाबावे लागते आणि उर्वरित काम थ्रीडी प्रिंटर करते. थ्रीडी प्रिंटर लेयरिंग पद्धत वापरून, हवी ती वस्तू तयार करते.
थ्रीडी प्रिंटिंग प्रक्रियेमध्ये थ्रीडी प्रिंटर सामान्यत: पारंपरिक इंकजेट प्रिंटरप्रमाणेच कार्य करते, जिथे मेण किंवा प्लास्टिकसदृश पॉलिमरचा वापर होतो. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान बॉल किंवा चमचासारख्या सामान्य वस्तूंपासून चाकांसारख्या गुंतागुंतीच्या आणि हलणाऱ्या वस्तूंपर्यंत काहीही मुद्रित करण्यास सक्षम आहे. “तुम्ही संपूर्ण बाइक प्रिंट करू शकता. त्यात हॅण्डल बार, चाके, ब्रेक, पेडल व चेन तयार करू शकता, तेही कोणतीही साधने न वापरता,” असे ‘इंडिपेंडंट’ने एका अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा : पुतिन यांना रशियाच्या पंतप्रधानपदी मिशुस्तिनच का हवेत; कोण आहेत मिखाईल मिशुस्तिन?
PS4 इंजिन तयार करण्यासाठी इस्रोने थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर का केला?
थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानामुळे इस्रोला इंजिनामधील भागांची संख्या १४ वरून एकवर आणण्यात मदत झाली. त्यामुळे स्पेस एजन्सी १९ वेल्ड जॉइंट्स काढून टाकण्यात आले आणि ९७ टक्के कच्च्या मालाची बचत झाली. त्यामुळे उत्पादनासाठीचा एकूण वेळ ६० टक्क्यांनी कमी झाला. इंजिनची ६६५ सेकंदांच्या कालावधीसाठी यशस्वी चाचणी करण्यात आली होती. चाचणीत हे इंजिन सर्व मापदंडांवर बसत असल्याचे स्पष्ट झाले.