चांद्रयान-३ च्या यशानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने आपला मोर्चा सूर्याकडे वळवला आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्त्रो अंतराळात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका खास मोहिमेला सुरुवात करणार आहे. या मोहिमेंतर्गत ‘आदित्य एल-१’ हे यान अवकाशात पाठवण्यात येणार असून ते सूर्याचा अभ्यास करणार आहे. सूर्याचं तापमान, अतिनील किरणाचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर, अंतराळातील हवामान, सौरवादळं, सौरज्वाला अशा सर्व बाबींचा अभ्यास या मोहिमेत करण्यात येणार आहे. दरम्यान, सूर्याचा अभ्यास करणारा भारत हा पहिला देश नाही. या आधी अनके देशांनी सूर्याचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते देश कोणते? वेगवेगळ्या देशांनी सूर्यावर अभ्यास करण्यासाठी कोण-कोणत्या मोहिमा राबवलेल्या आहेत? याचा घेतलेला हा आढावा….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिका : अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (NASA) या अंतराळ संशोधन संस्थेनेही सूर्याचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नासाने ऑगस्ट २०१८ मध्ये ‘पार्कर सोलार प्रोब’ नावाचे यान अंतराळात पाठवले होते. डिसेंबर २०२१ मध्ये हे यान कोरोना (सूर्याच्या वातावरणातील सर्वात बाहेरच्या भागाला करोना म्हणतात) भागातून गेले होते. अंतराळ संशोधनाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचे यान सूर्याच्या सर्वाधिक जवळ गेले होते. तसा दावा नासाकडून केला जातो.

फेब्रुवारी २०२० मध्ये नासाने युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ईएसए) सहाय्याने सोलार ऑरबीटर नावाचे अंतराळ यान अवकाशात पाठवले होते. या मोहिमेच्या माध्यमातून सूर्याची निर्मिती कशी झाली. सूर्यमालेतील सातत्याने बदलणाऱ्या परिस्थितीवर, हवामानावर सूर्य कशा प्रकारे नियंत्रण ठेवतो? अशा काही प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

यासह अमेरिकेने १९९७ साली ‘ॲडव्हान्स कोम्पोझिशन एक्सप्लोरर’, ऑक्टोबर २००६ मध्ये ‘टेरेस्ट्रियल रिलेशन्स ऑब्झर्व्हेटरी’, फेब्रुवारी २०१० मध्ये ‘सोलार डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरी’, जून २०१३ मध्ये ‘इंटरफेस रिजन इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफ’, अशा वेगवेगळ्या मोहिमा राबवलेल्या आहेत. अमेरिकेने सूर्याच्या अभ्यासासाठी ईएसए, जाक्सा (JAXA- जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी) या अंतराळ संशोधन संस्थांच्या सहकार्याने सोलार अँड हेलिओस्फेरिक ऑब्झर्व्हेटरी (SOHO) अंतराळ यान अवकाशात पाठवले होते.

जपान : जाक्सा (JAXA) जपानची अंतराळ संशोधन संस्था आहे. जाक्साने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी १९८१ साली हिनोटोरी (ASTRO-A) नावाचे अंतराळ यान अवकाशात पाठवले होते. एक्स-रेच्या माध्यमातून सौर ज्वालांचा अभ्यास करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. याव्यतिरिक्त जाक्साने १९९१ साली योहकोह (SOLAR-A), १९९५ साली SOHO (नासा आणि ईएसएच्या सहाय्याने) तसेच १९९८ साली नासाच्या मदतीने ट्रान्सिएंट रिजन अँड कोरोना एक्सप्लोरर (TRACE) मोहीम राबवली होती.

योहकोह (SOLAR-A) मोहिमेच्या पुढचा भाग म्हणून २००६ साली जपानने अमेरिका आणि ब्रिटनच्या सहकार्याने हिनोडे (SOLAR-B) मोहीम राबवली होती. हिनोडे एक ऑब्झर्व्हेटरी उपग्रह होता. सूर्याचा पृथ्वीवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास या मोहिमेतून करण्यात आला होता.

युरोप : ईएसएने १९९० सालच्या ऑक्टोबर महिन्यात Ulysses नावाने सूर्याचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. या मोहिमेच्या माध्यमातून सूर्याच्या ध्रुवांच्या खाली आणि वर कसे वातावरण आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याव्यतिरिक्त ईएसएने २००१ सालच्या ऑक्टोबर महिन्यातील प्रोबा-२ (Proba-२, प्रोजेक्ट फॉर ऑनबोर्ड ऑटोनॉमी) नावाचे ऑरबीटर अवकाशात पाठवले होते. प्रोबा-१ ऑरबीटच्या यशानंतर साधारण आठ वर्षांनी प्रोबा-२ ही मोहीम राबवण्यात आली होती. प्रोबा-१ च्या मोहिमेत सूर्याचा अभ्यास करण्यात आला नव्हता. मात्र, प्रोबा-२ ऑरबिटरच्या मदतीने सूर्याचा अभ्यास करण्याचे ठरवण्यात आले होते.

ईएसए सूर्याच्या अभ्यासासाठी भविष्यात २०२४ साली प्रोबा-३ नावाची मोहीम राबवणार आहे; तर २०२५ साली स्माईल (Smile) नावाची मोहीम राबवणार आहे.

चीन : चीनच्या नॅशनल स्पेस सायन्स सेंटर चायजीज अकॅडमी ऑफ सायन्सेस (सीएएस) तर्फे ८ ऑक्टोबर २०२२ रोजी ॲडव्हान्स स्पेस बेस्ड सोलार ऑब्झर्व्हेटरी (ASO-S) मोहीम राबवण्यात आली होती.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro to launch aditya l1 know how many countries so far launches spacecraft and studied sun prd
Show comments