इंग्रज भारतात आले, त्यांनी १५० वर्ष भारतावर राज्यही केले. त्याचाच परिणाम म्हणजे भारतीय भाषांवर पडलेला इंग्रजीचा प्रभाव. आज जागतिकीकरणामुळे (ग्लोबलायझेश) भारतातील कुठलीही भाषा असो, चार शब्दांमागे एक इंग्रजी शब्द वापरलाच जातो. परंतु १८ व्या- १९ व्या शतकात झालेली ही देवाणघेवाण केवळ एकतर्फी नव्हती. इंग्रजांना भारतीय संस्कृतीचे विशेष आकर्षण होते. इथली संस्कृती, परंपरा यांचा प्रभाव त्यांच्यावर चांगलाच होता. त्याचेच द्योतक म्हणून त्यांनी आपल्या भाषांमधील अनेक शब्दांचा स्वीकार केला. परंतु देवाण- घेवाणीची सुरुवात इंग्रज येण्यापूर्वी अनेक शतकं आधी सुरु झाली होती. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे ओडिशातील जगन्नाथ पुरीची यात्रा. ही यात्रा केवळ भारतीय भाविकांसाठी महत्त्वाची नाही तर इंग्रजी शब्दसंभारालाही या यात्रेने आपले योगदान दिलेले आहे.
अधिक वाचा: ‘या’ गुजराती तांडेलाने ‘वास्को द गामा’ला भारतात आणले; इतिहास नेमके काय सांगतो?
जगन्नाथ ते जग्गनॉट
दरवर्षी जून- जुलै (आषाढ) महिन्यात ओडिशातील पुरी या मंदिरात (रथयात्रा) रथोत्सव साजरा केला जातो. भगवान जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक संपूर्ण मंदिरात गर्दी करतात. भगवान जगन्नाथ, त्यांची बहीण सुभद्रा आणि भाऊ बलभद्र यांच्या लाकडी प्रतिमा मोठ्या रथात गुंडीचा मंदिरात त्यांच्या मावशीला भेट देण्यासाठी नेल्या जातात. दरवर्षी या भावंडांसाठी प्रचंड आकाराचे मोठे लाकडी रथ तयार करण्यात येतात. याच यात्रेच्या निमित्ताने इंग्रजी भाषेत एका शब्दाची नव्याने ओळख झाली. तो शब्द म्हणजे ‘जग्गनॉट’ (Juggernaut).
जग्गनॉट म्हणजे काय?
मरियम वेबस्टर या शब्दकोशात ‘जग्ग(र)नॉट’ या शब्दाची व्याख्या एक प्रचंड अक्षम्य शक्ती, मोहीम, हालचाल किंवा वस्तू जी वाटेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला चिरडून टाकते असा दिला आहे. हा शब्द इंग्रजी असला तरी त्याची व्युत्पत्ती पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेतून झाली आहे. या इंग्रजी शब्दाचा उगम एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात झाल्याचे मानले जात होते.
रेव्ह. क्लॉडियस बुकानन
मध्ययुगीन काळापासून, पुरी येथील रथयात्रेच्या वृत्तान्ताने युरोपीय लोकांना भुरळ घातली होती. भारतातून युरोपात पोहचलेल्या कथांमध्ये असे सांगितले जात होते की, भाविक स्वतःला मंदिराच्या रथाच्या चाकाखाली झोकून देतात. रेव्ह. क्लॉडियस बुकानन यांनी १८ व्या शतकाच्या प्रारंभिक कालखंडात ब्रिटन आणि अमेरिकेत “द जग्गनॉट” ची ओळख करून दिली आणि या शब्दाची ओळख करून देणारा पहिला ब्रिटीश अधिकारी होण्याचा मान मिळवला. “Christian Researches in Asia” या त्यांच्या पुस्तकात बुकानन यांनी भक्तांना जग्गनॉटच्या रथांच्या चाकाखाली झोकून देत असल्याचे म्हटले आहे. परिणामी, “जग्गनॉट” हिंसा किंवा धोक्याचे वैशिष्ट्य असलेल्या कोणत्याही शक्तीचे प्रतिनिधित्व करणारी संज्ञा म्हणून विकसित होऊ लागली. त्यानंतरच्या दशकांमध्ये, युरोपियन लोकांमध्ये भारत आणि हिंदू धर्माबद्दलची समज वाढवल्यामुळे, ‘जग्गनॉट’ चे खरे महत्त्व त्यांना समजले.
अधिक वाचा: मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ‘हा’ ब्रिटिश अधिकारी नक्की कोण होता?
१४ व्या शतकातील संदर्भ
शब्दाची उत्पत्ती १९ व्या शतकातील असली तरी १४ व्या शतकात काही युरोपियन देशांमध्ये जगन्नाथ यात्रेची संकल्पना पोहोचली होती. यामागे एक रंजक कथा सांगितली जाते. १४ व्या शतकाच्या सुरुवातीस, फ्रान्सिस्कन मिशनरी फ्रियर ‘ओडोरिक’ यांनी एका प्रचंड भारतीय गाडीची कथा युरोपमध्ये नेली. त्याने सांगितलेल्या कथेनुसार या गाडीत हिंदू देव विष्णूची प्रतिमा होती. ज्याचे नाव जगन्नाथ होते (अर्थ ‘जगाचा स्वामी’). ही गाडी भारतीय रस्त्यावर धार्मिक मिरवणुकीत सामील झाली होती. ही कथा संपूर्ण युरोपमध्ये पसरली. या कथेने इंग्लिश वाचकांचे रथयात्रा या संकल्पनेकडे लक्ष वेधले आणि १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात, ते कोणत्याही मोठ्या वाहनाचा (स्टीम लोकोमोटिव्ह) किंवा शक्तिशाली क्रशिंग क्षमता असलेल्या (मरियम वेबस्टर) इतर कोणत्याही मोठ्या घटकाचा संदर्भ देण्यासाठी जग्गनॉट शब्दाचा वापरत करत होते. एकूणच ‘जग्गनॉट’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ निर्दयी विध्वंसक आणि अनावरोध असा असला तरी त्याची उत्पत्ती रथोत्सवातील रथाच्या आणि यात्रेच्या भव्यतेतून झाली आहे.